Sunday, December 1, 2024

बागलाण भ्रमंती

http://sahyadrichabhatakbhavanya.blogspot.com/2020/12/blog-post.html
 भाग १(किल्ले बिष्टा, कऱ्हा)

  बागलाण! सह्याद्रीला पडलेलं सुंदर स्वप्न! किल्ल्यांच्या बाबतीत नाशिक प्रांत हा सर्वात श्रीमंत प्रदेश त्यातल्या त्यात सेलबारी-डोलबारी, त्रिंबक आणि सातमाळा सारख्या डोंगररांगा म्हणजे अहाहा! त्यामानाने दुंधेश्वर/दोद्धेश्वर ही डोंगररांग आणि तेथील किल्ले काहीसे अपरिचित, गाळणा टेकड्यांबाबत देखील गाळणा किल्ला सोडला तरी बाकी किल्ल्यांबाबत तीच स्थिती. कोरोनाची भीती जरा दूर झाली आहे आणि लॉकडाऊनचा विळखा देखील थोडा सैल झाला आहे आणि म्हणूनच आता बाहेर पडून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे बागडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांबाबत झाडाझडती होऊ लागली.
वाट आड वळणांची । वाट चालावी वाकडी ।।

अखेर ओंकार ओक, स्वप्नील खोत यांसारख्या सह्याद्री पिंजून काढलेल्या दिग्गजांची मदत घेऊन दोद्धेश्वर रांगेतील बिष्टा,कऱ्हा,अजमेरा, दुंधा तर गाळणा टेकड्यांतील कंकराळा, गाळणा, सोनगीर, लळींग हे किल्ले आणि या सर्वांवर तुपाची धार म्हणून देवळाणे येथील जोगेश्वरी शिल्प मंदिर, दोद्धेश्वर मंदिर, तर झोडगे येथील माणकेश्वर मंदिर,चांदवडचं रेणुका माता मंदिर आणि मालेगावचा भुईकोट यांची भर घातली, आणि फायनल प्लॅन रेडी केला. इतक्या महिन्यांनी बाहेर पडतोय म्हणून प्लॅन जरा मोठाच बनवला होता. सुट्ट्यांचं समीकरण जुळवताना अखेर मी, अलंकार, पुष्कर, कल्पेश आणि सुशांत अशी टीम तयार झाली.कोरोनाच्या सावटामुळे आमच्या भटकंतीवर बंधने असणार होती, कारण किती काही झाले तरी आपण शहराकडचे, एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावर समोर येणारी व्यक्ती आपल्याला कशी सामोरी जाणार याबद्दल थोडे साशंकच होतो.

बिष्टा किल्ला 

इतक्या महिन्यांनी बाहेर पडत असल्यामुळे सामानावर अक्षरशः धूळ पडली होती, ती धूळ झटकत बुधवारी 2 डिसेंबरच्या रात्री बॅगेत सामान कोंबून घरातून प्रस्थान केलं. प्रस्थान केल्यानंतर देखील रवी प्रिसिलिया यांच्याकडून सामान गोळा करून रात्री सव्वा दहाच्या आसपास पनवेल सोडलं. पनवेल वरून निघून कळव्याच्या इथे सुशांतला उचलून पुढे नाशिक-सटाणा-कोटबेल असा प्रवास करून बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याशी कोटबेल गावातील राम मंदिरात पहाटे साडेचार वाजता पोचलो. सटाण्याच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला गाडी लावून काळोखात दिसणारी सातमाळा रांग नजरेत भरून घेताना मागे फेब्रुवारी मध्ये केलेला रेंज ट्रेक डोळ्यांसमोर आला. ती सातमाळा रांग न्याहाळताना मध्येच पडणाऱ्या उल्का विशेष आकर्षण ठरल्या. गावात पहाटे पोचल्यामुळे गावातल्या कुणालाही त्रास द्यायची तसदी न घेता मंदिरातच शांतपणे पथारी पसरून डोळे मिटून घेतले. जास्त नसली तरी बऱ्यापैकी थंडी जाणवत होती, आणि म्हणूनच मी आणि पुष्कर सोडून बाकीच्यांनी गाडीतच झोपायचा निर्णय घेतला.
मंदिराच्या बाजूला असलेल्या वीरगळी
मोबाईलच्या अलार्मला दिलेला साडेसहाचा ठेका त्याने यथोचित पार केला आणि कानाजवळ किर्रर्र अशा आवाजाने साखरझोपेचा बट्ट्याबोळ करून टाकला. बाकीच्यांना देखील आवाज देऊन पुढची तयारी करायला सांगून वाट दाखवण्यासाठी अविनाश खैरनार यांच्याशी अगोदरच संपर्क केला होता, त्यांच्या दुकानात जाऊन त्यांनी सांगितलेल्या वामन दादांशी भेट घेऊन आलो. इकडे मंदिरात येईपर्यंत कल्पेशने चहा नाश्ता करून ठेवला होता,त्याचा समारोप घेऊन बॅगा पाठीला लावून वामन दादाचं घर गाठलं आणि बिष्टा किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. एक नमूद करायचं राहील या राम मंदिराजवळच रस्त्याच्या बाजूला काही विरगळी अस्थाव्यस्थ पडलेल्या दिसल्या.

धरण आणि त्याचे दरवाजे 
काही वर्षांपूर्वी ओंकार जेव्हा या किल्ल्यावर आला होता तेव्हा त्याने कोटबेल मधूनच ट्रेक सुरू केला होता, परंतु अलीकडेच काही वर्षांपूर्वी बिष्टा किल्ल्याच्या बाजूच्या डोंगरावर दत्ताच मंदिर आणि मठ झाला असल्याने किल्ल्याच्या बऱ्यापैकी पायथ्यापर्यंत गाडी रस्ता जातो, ज्याचा आम्हाला फायदा झाला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याश्या धरणाच्या अलीकडे असलेल्या धनगर वस्तीपर्यंत हा कच्चा रस्ता जातो, तिथे एका झापाच्या शेजारी गाडी लावून पावणे नऊच्या सुमारास वामन दादा पुढे आणि त्याच्यामागे आम्ही पाच जण अशी पायगाडी चालू झाली. ट्रेकच्या सुरुवातीलाच लागलेल ते छोटंसं बंधारावजा धरण, त्याचे छोटे दरवाजे आणि त्या धरणाच्या पाण्यावर आजूबाजूला बहरलेली शेती यातून मार्ग काढताना सुखकर वाटत होते. वस्ती पार करून पुढची वाट एका सुक्या ओहोळातून होती, ओहोळ जरी सुकलेला असला तरी पूर्ण वाळूने भरला होता त्यामुळे पायांचा वेग वाढवण्यास मर्यादा येत होती.
बिष्टा किल्ल्याच्या वाटेवर 
ओहोळ संपून वाट आता वर चढून एका डोंगर धारेवर आली, इथून समोर बिष्टा किल्ला तर डावीकडे दत्त मंदिर आणि मठ असलेला डोंगर दिसत होता, त्या डोंगरावरील पांढऱ्या रंगातील मंदिर आणि पत्र्याचं उभारलेलं शेड देखील ओळखू येत होतं. किल्ल्यावर जास्त लोकांचा राबता नसल्याने वाट जास्त मळलेली नव्हती, परिणामतः सुक्या गवतातून वाट काढताना माझ्या बुटांच्या जाळीतून गवतातील कुसळ माझ्या पायांना टोचत होते, आणि ट्रेक सुरू होऊन अवघ्या अर्ध्या तासातच मला पहिल्या टेकडीवर थांबून बूट काढून त्यातील कुसळ काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. बाकीच्यांना मी माझ्यासाठी न थांबता पुढे जाण्यास सांगितले. वामन दादा त्या सर्वांना घेऊन बिष्टा किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याला एका झाडाखाली सावलीत थांबले होते, तिथे पोचेपर्यंत माझे बूट परत कुसळांनी भरले होते.
एकंदरीत तो धनगरवाडा, नंतर लागलेल धरण, पुढे वाळूने भरलेली ओढ्याची वाट आणि पहिला टेपाड चढून बिष्टा किल्ल्याच्या मुख्य चढाला लागलो. वाटेवरती बऱ्यापैकी स्क्री होती आणि वाट देखील मळलेली नव्हती, फक्त वामन दादांच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही चाललो होतो. बिष्टा किल्ल्याला डाव्या बाजूने वळसा मारत वाट वर चढली,चढ बऱ्यापैकी चांगलाच होता, ही वाट पुढे बिष्टा किल्ला आणि त्याच्या बाजूच्या डोंगराच्या घळीतून जाऊ लागली.
मध्ये असलेल्या निवडुंगाच्या इथे गुहा आहे,
डावीकडे झाडी वाढलीय तिथे देखील गुहा आहे 
एका ठिकाणी थांबून वामन दादाने एक झाड दाखवलं, दहिखुडी अस त्या झाडाचं नाव, या झाडाचं विशेष म्हणजे दुधात या झाडाचं चीक टाकलं की थोड्याच वेळात त्याच दही बनत. सव्वा तासाच्या चालीत मुख्य वाटेच्या उजव्या बाजूच्या कातळात असलेल्या गुहेपाशी पोचलो, यातील दोन गुहा निवडुंगांनी भरलेल्या होत्या. या गुहा चढताना कातळकडा काळजीपूर्वक चढावा लागतो. या गुहांमध्ये उतरण्यासाठी इथल्याच स्थानिकांनी गुहेच्या एका भागात दगडांची रास करून पायरीसारखं करून ठेवलं आहे. गुहा पाहून परत मूळ वाटेला येऊन पुढची चाल धरली आणि साडे दहाच्या सुमारास गडावरच्या टाक्याजवळ आम्ही पोहोचलो. टाक्यातून पाणी काढण्यासाठी पोहरा ठेवला होता.
पाण्याचे घोट घेत वामन दादा आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होता, मी तोवर माझे बूट कुसळातून मोकळे करत होते. किल्ल्यावर आम्ही पोचलो होतो,किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत, त्यांचा धांडोळा घेत गडमाथा जवळ केला. गडमाथा गाठल्यावर त्या पठारावर पसरलेलं ते गवत आणि मला झालेली कुसळांची जाणीव मी गडफेरी नाही करत, तुम्हींच करून या असच काहीसं सांगत होती, पण मला तिथे थांबण्यासाठी एखादा खडक देखील नव्हता. अखेर आलिया भोगासी म्हणत वाट धरली खरी, पण जी काय वाट लागली काय सांगू? किल्ला फिरायचा आहे, गवतातल्या वास्तू शोधायच्या आहेत पण पायांना टोचणारे कुसळ पूर्ण ब्रह्मांड दाखवत होते.
बिष्टा किल्ल्याच्या माथ्यावर 
डावीकडून मी, वामन, सुशांत, पुष्कर, कल्पेश, अलंकार 
गडाच्या उत्तर टोकावर कमी गवत आणि मोकळी जागा होती तिथे जाऊन बुड टेकवल आणि पहिला बूट-सॉक्स काढले. सुशांत मागून बोलतोय अरे माझ्या ते एक कुसळ लागलं पायाला म्हणून मी हळू चालतोय. त्याला एक टोचलाय तर अस, माझ्या इथे पन्नास-शंभर लागून पाय भरले होते अक्षरशः. गडमाथ्यावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना भारी वाटत होतं, इतक्या महिन्यांनी पुन्हा ट्रेक झाल्याचा आनंद होता. वामन दादा आजुबाजूच्या परिसराची माहिती सांगत होते. किल्ल्यावरून फोफिर डोंगर, बाजूचा दत्त मंदिर आणि मठ असलेला डोंगर, कऱ्हा किल्ला, तर पार दूरवर साल्हेर देखील नजरेच्या टप्प्यात दिसत होता. याच किल्ल्यावर येणारी बिजोटे गावातील वाट कुठून कशी येते, हे देखील वामन दादाने दाखवून दिलं.
माथ्यावरून दिसणारं दृश्य 
एखाद्या किल्ल्याला स्थानिक सोबत घेतल्याचा हा फायदा असतो, स्थानिकांशिवाय त्या परिसराची इत्यंभूत माहिती आपल्याला कोणीच नाही देऊ शकत.
आणलेल्या सुक्या खाऊ वर ताव मारत आणि माझ्या बूट आणि सॉक्समधील कुसळं काढायचा सामूहिक कार्यक्रम होऊन उर्वरीत गडफेरी करत टाक्याजवळ आलो. एक एक करून गवतात लपलेले अवशेष वामन दादा आम्हाला दाखवत होते. कुसळांमुळे इतका हैराण झालो होतो की बूट हातात घेऊनच मी गडफेरी केली, उतरताना शूज घातले खरे, पण नंतर परत सॉक्स काढून बॅगेत टाकले आणि तसाच उतरत होतो, चढताना स्क्रीवरून बऱ्यापैकी वेगात चढलो असलो तरी उतरताना आता गंमत होती. सुशांत चा वेग जरा कमी झाला होता, त्याच्यासाठी मी थांबून बाकीच्यांना पुढे जायला सांगितलं, एव्हाना मी माझ्या पायांभोवती प्लास्टिक च्या पिशव्या गुंडाळल्या होत्या😂, आणि ट्रेक करत होतो. बिष्टा किल्ला उतरून खालच्या टेपाडावर पोचून पुढे ओढ्याची वाट धरली.
त्या ओढ्यातून येताना एका ठिकाणी बोकडांचा कळप होता, त्यातला एक जरी अंगावर आला तर आपलं काही खर नाही, त्यांना घाबरत घाबरत पुढे आलो. हे सर्व जण धरणाच्या अलीकडे फ्रेश होऊन थांबले होते. तिथून लगोलग निघून गाडीजवळ आलो आणि कोटबेल गाव जवळ केलं. येताना वाटेत एका ठिकाणी पत्र्याची शेड केलेलं मारुतीचं मंदिर लागलं, या मारुतीला लावलेले रंग खास आकर्षित करत होते, थांबून त्याचा फोटो काढला. साधारणत: देवापुढे नारळ ठेवला जातो, पण इथे कांदे ठेवले होते.
कोटबेल गावात पोचलो, वामन दादांची बिदागी दिली आणि ज्या अविनाश दादांशी संपर्क होऊन त्यांनी आमच्यासोबत वामन दादांना पाठवलं होतं त्यांचे सुद्धा आभार मानून कोटबेल गावाचा निरोप घेतला. घडाळ्यात एक वाजले होते, पद्धतशीर जेवायची वेळ झाली होती. कऱ्हा किल्ल्याचा पायथा असलेल्या कोळीपाड्याच्या पुढे दोधेश्वर मंदिर गाठून दुपारची पोटपूजा आटोपली.
दोधेश्वर मंदिर,बाहेरील गोमुख असलेली पुष्करणी, शंकराची पिंडी व नंदी 
या मंदिराच्या नावावरूनच या रांगेला दोधेश्वर हे नाव पडलं आहे. मंदिराचा परिसर एकदम आल्हाददायक होता. मंदिराच्या खांबावरून मंदिर पुरातन असल्याची खात्री पटत असली तरी त्याचा जीर्णोद्धार करून त्याला नवीन साज चढवला होता जो की आपल्या डोळ्यांना कधीच आवडत नाही. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना मोठ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर सुरुवातीला नंदीसाठी वेगळं मंदिर उभारलं आहे. गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या आवारात एक साधू महाराज वास्तव्यास होते. मंदिराच्या बाहेर एक गोमुख असलेली पुष्करणी आणि बाजूला शंकराची पिंडी आणि नंदीदेखील आहे. इथेच एक पडी मारावी असा मनात आलेला विचार मनातच ठेवून गाडी कऱ्हा किल्ल्याच्या दिशेने पळवली.
कऱ्हा किल्ला 
कोळीपाडा गावाच्या इथे असलेल्या डॅमच्या कडेनेच कऱ्हा किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी जाते. तिथे भेटलेल्या एका गावकऱ्याकडून वाट समजून घेऊन किल्ल्याची वाट धरली. ढोरवाटा भरपूर फुटल्या असल्या कारणाने योग्य वाट कोणती हे निश्चित करणे अवघड असल्याने नकाशाच्या आधारे वर जायची दिशा ठरवून मार्गक्रमण चालू होते. ट्रेकक्षितिज संस्थेचे यासाठी खास आभार कारण त्यांनी http://trekshitiz.com/ या संकेतस्थळाद्वारे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहीत आणि नकाशे तमाम भटक्यांसाठी उपलब्ध करून दिले, आनंद पाळंदे यांच्या डोंगरयात्रा तसेच सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकांची देखील मदत होते.
वाटेत लागलेल्या पायऱ्या,तटबंदी, पडकी गुहा 
अर्धा तास पायपीट करतोय पण गडाचं गडपण दाखवणारी एकही वास्तू नजरेस पडत नसल्याने बरोबर वाटेवर आहोत की नाही याबद्दल साशंकच होतो, त्यामुळे मी वेगळ्या वाटेने आणि बाकीचे वेगळ्या वाटेने चालले होते. नकाशा हातात घेऊन ट्रेक करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नकाशावरील प्रत्येक वास्तू डोळ्यांखालून घातलीच पाहिजे अस आमचं एकमत झालं होतं.या सर्वांना वाट चढताना एका ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या आणि एकंदरीतच योग्य वाटेवर असल्याची पुष्टी देखील झाली,नकाशातील पहिली गडवास्तू दिसल्याचा आनंद काही वेगळाच होता. थोडेच वर गेल्यावर तटबंदी आणि पुढे पुन्हा पायऱ्या आणि परत एक तुटलेली गुहा अशी मालिकाच चालू झाली. मी देखील आता त्याच वाटेवरून एक एक अवशेषांचे फोटो काढत पुढे पाय रेटत होतो. इतिहासाच्या पाऊलखुणांची नोंद घेता घेता पायथ्यापासून तासाभराच्या चालीत गडमाथा गाठला देखील.
भवानी माता मंदीर 
माथ्यावर भवानीमातेचं नव्यानं बांधलेलं मंदिर आहे, बाजूलाच असलेल्या कठड्यावर बॅग मोकळी करून वारा अनुभवण्यात वेगळीच मजा होती.
मंदीरामागील पाण्याची टाकी 
मंदिराच्या मागेच दोन पाण्याची टाकी आहेत त्यातली एका टाक्यात पाणवनस्पतींची दाटी झाली होती तर दुसऱ्या टाक्यातील पाणी स्वच्छ आणि थंडगार होतं, फक्त त्यातून पाणी काढताना कसरत करावी लागत होती. टाक्यांच्या इथून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकापाशी पोहोचतो,इथे खाली गुहा आहेत असं वाचनात आलं होतं पण तो कातळ उतरण्यासाठी प्रस्तरारोहणाचं साहित्य असणं आवश्यक आहे. माथ्यावरून दिसणारा फोफिर डोंगर लक्षवेधी होता तर अजमेरा आणि बिष्टा हे किल्ले देखील माना काढून आपली ओळख पटवत होते. बाकी दिसणाऱ्या डोंगरांची नाव माहीत नसली तरी नजरेच्या टप्प्यात होती. माघारी येऊन टाक्यांपाशी येऊन पडी मारली, अन त्या भर्राट वाऱ्याच्या झोकात कधी डोळा लागला कळलंच नाही. अलंकार ने आवाज देऊन जागं केलं खर पण ते जे काही मिनिटांचं सुख होत अगदी अवर्णनीय!
आंतरजालावरून प्रत्येक किल्ल्याची माहिती मिळते, त्या त्या किल्ल्यावर जाऊन ती माहिती वाचून इतिहासात डोकावण्याचा थोडाफार प्रयत्न आम्ही करत असतो, मंदिरापाशी येऊन इथे देखील माहिती वाचन केलं असता एक टाकं आपल्याला दिसलं नाही याची रुखरुख लागली आणि आता गडउतार व्हायच्या अगोदर ते टाकं बघायचं ठरवलं. तोवर मंदिराच्या इथेच बसून आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवून घेण्याची जणू स्पर्धाच लागली होती, मंदिरातील देवीच्या जवळ ठेवलेला नारळ फोडून त्याला आमच्या पोटात स्थान दिलं होतं. घडाळ्यात पाहिलं तर काटा साडेपाच वर आला होता, आता मात्र निघायला हवं म्हणत शूजच्या लेस आवळल्या आणि परतीच्या वाटेवर लागलो. आता पहिला वेध होते ते न पाहिलेला टाका पाहण्याचे, मंदिराजवळून उतरताना आता उतरायची योग्य वाट गवसल्यामुळे ते पाण्याचं टाकं देखील लगेच दिसलं, हे टाकं देखील पाणवनस्पतींनी पूर्ण भरलं होत. संध्याकाळ झाली होती आणि योग्य वाटेवर लागलो होतो त्यामुळे पायांनी आपसूकच वेग घेतला होता, वेळेच्या बाबतीत काटेकोर चालत असल्याने खाली असणारा जलाशय आम्हाला आता खुणावत होता.
मावळतीच्या रंगानी न्हाऊन निघालेला जलाशय आणि आजूबाजूचा परिसर 

आज मस्त अंघोळ मिळणार या विचारानेच मन प्रसन्न होत होत. उतरत असताना एक दगड बघून पाय स्थिरावले, त्या दगडावर कोरीव काम केलेलं दिसत होतं, विशेषतः त्यातील गणपतीची प्रतिमा नीट स्पष्ट होत होती, इतर बाजूच्या प्रतिमा नीट ओळखू येत नव्हत्या. इतकी वर्षे ऊन वारा पाऊस झेलल्याने साहजिकच त्या अस्पष्ट झाल्या होत्या पण अशा पुरातन अवशेषांचे योग्य रीतीने जतन आणि संवर्धन होणे गरजेचं आहे. तिथे दरवाजा असावा आणि त्यातीलच ते एक शिल्प आहे हे घरी आल्यानंतर कळलं होतं. पश्चिमेला आता रंग सोहळा सुरू झाला होता. भास्कररावांची आणि निळ्या नभाची अशी काही मैफिल भरली होती की ते रंग डोळ्यात साठवत पायांनी असा काही फेर धरला की थांबायला डायरेक्ट खालच्या त्या धरणाचा आधार घ्यावा लागला. अंगावर शिरशिरी आणणाऱ्या गार पाण्याचा स्पर्श झाल्यावर दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळाला. शक्तीचा तो स्रोत जरी दिसेनासा झाला असला तरी त्याच्या रंगरूपी संवेदना सर्व चराचराला घराकडे परतण्याचा इशारा देत होता.
रंगोत्सव 
आम्ही देखील आमची अंघोळ आटोपून गाडीत बसलो आणि थर्मास मध्ये आणलेल्या चहाचे घोट घेत मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झालो. आजचा मुक्काम हा अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पहाडेश्वर मंदिरात होता. मंदिराजवळ पोचून तिथे असणाऱ्या दत्ता भामरे यांच्याशी बोलून मंदिरात आमचा डेरा टाकला.
रात्रभर केलेला पनवेल ते कोटबेल प्रवास, कुसळांमुळे कायम लक्षात राहिलेला बिष्टा किल्ला, दोधेश्वर मंदिर, कऱ्हा किल्ला आणि मावळत्या दिनकराच्या साक्षीने धरणात केलेली अंघोळ आणि पहाडेश्वर मंदिरात येऊन ट्रेकच्या पहिल्या दिवसाची योग्य प्रकारे सांगता झाली होती.
क्रमशः

दिवस दुसरा 
पहाडेश्वर मंदिर आणि मागे अजमेरा किल्ला 
          पहिल्या दिवसाची सांगता योग्य वेळेत झाली होती, मुक्कामासाठी निवडलेली जागा देखील उत्तम होती. पहाडेश्वर मंदिर आणि वनराईने नटलेला आजुबाजूचा परिसर आणि हवेतील गारवा यामुळे रात्रीची जेवणं उरकून कधी स्लीपिंग बॅग मध्ये गेलो ते समजलच नाही. पहाटे लवकर उठून चहा नाश्ता उरकून घेतला. पहाडेश्वर मंदिराच्या पुढे एक मारुती मंदिर होत यात मारुती समोर नंदी आणि कासव होते परंतु शंकराची पिंडी कुठे नजरेस आली नाही, हे अस पहिल्यांदाच पाहण्यात आलं होतं. आजच्या दिवसाचं गणित जरा मोठं असल्याने सकाळी सात वाजताच ट्रेक ची सुरुवात झाली.
माऊली 
 पहाडेश्वर मंदिराच्या बाजूनेच अजमेरा किल्ला डावीकडे ठेवत सरळ चालत जाणारी वाट गडाकडे जाते. पण स्थानिक लोक त्यांच्या सोईनुसार पहाडेश्वर मंदिराच्या इथूनच सरळ वर चढतात, आम्हाला देखील तिथल्या स्थानिकांनी ती वाट सांगितली परंतु आम्ही आपले मुख्य वाटेनेच जायचं ठरवलं. अजमेरा किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालत पंधरा मिनिटांच्या चालीने एका शेंदूर लावलेल्या मोठ्या दगडापाशी आलो याला माऊली म्हणतात,असं वाचनात आले होतं, याच्यासाठी पत्र्याचं शेड देखील उभारलं आहे, तसेच इथे खडकावर त्रिशुळ देखील दिसून येतो. 
अजमेरा किल्ल्याच्या वाटेवर 
          माऊलीच्या स्थानापासून पुढची वाट झाडीत शिरते, इथे देखील वाटेवर राबता नसल्याने गवताच रान माजलं होतं, दगडांची शाकारणी केली असली तरी गवत होतंच, परिणामतः माझा आणि कुसळांचा सामना आज देखील रंगणार याची पुरती जाणीव मला झाली होती. वाट नीट समजत नसल्याने अलंकार सुशांत कड्याच्या बाजूने तर पुष्कर कल्पेश झाडीतून वाट काढत चालले होते, तर मी आपला मागे कुसळं काढत  ज्यांची वाट योग्य असेल त्यांच्या दिशेने जाऊ अस ठरवून हळू हळू चालत होतो. पुष्कर ने वाट असल्याची पुष्टी दिली आणि मी तिकडे निघालो, तर इकडे अलंकार कड्याला भिडतच वर चढला, त्याच्या मागावर सुशांत देखील तिकडूनच वर चढला. मी पुष्कर आमची वाट अजमेरा किल्ला आणि बाजूच्या डोंगऱ्या देवाच्या डोंगराच्या घळीतून वर सरकत मोकळ्या पठारावर पोचली. पाऊण तासात एवढा पल्ला गाठला होता. बऱ्यापैकी चढ संपला असला तरी माथा गाठला नव्हता आणि आता वाट देखील नीट दिसत नसल्याने त्या गवतातून वाट काढत हळू हळू वर चढत होतो. सुकलेलं गवत आणी घसारा यामुळे चढण्यापेक्षा उतरताना काय होईल याचे विचार येत होते. वाट चढताना समोर काही तटबंदीचे अवशेष समोर आले, एकंदरीत गडावर आमचा प्रवेश झाला होता. समोर दिसणाऱ्या टेपाडावर न जाता त्याला डाव्या बाजूने वळसा मारून पुढे गेलो असता समोर भगवा ध्वज फडकताना दिसला. पावले आपोआप झेंड्याच्या दिशेने वळली, झेंड्याच्या अगोदर डाव्या बाजूला खाली एक सुकलेला तलाव दृष्टीस पडला.  तसाच पुढे जाऊन झेंड्याच्या इथे गेल्यावर तिथे शिव मंदिर असल्याच्या खुणा स्पष्ट होत होत्या. उघड्यावर असलेला नंदी समोर शंकराची पिंडी त्यावर वेटोळे घालून लावलेला तांब्याचा नाग आणि वर अभिषेकासाठी अडकवलेला तांब्या आणि ध्वजाला लावलेल्या काही घंटा आणि पिंडीच्या आजूबाजूला पसरलेली धोत्र्याची फळे हे सार पाहून मन चलबिचल झाले. कधी काळी या मंदिराचा काय रुबाब असेल आणि आता काय परिस्थिती आहे. 
शिवाचं स्थान 
भग्न जात्यासदृश्य अवशेष 

          ज्या उंचावट्याला वळसा घातला होता त्याच भागावर अगोदर जाऊ म्हणत वाट उजवीकडे वळवली हा किल्ल्याचा पश्चिम भाग होता. येथे झुडुपांमध्ये काही जुने अवशेष लपलेले दिसत होते गवतात एका ठिकाणी भंग झालेल्या जात्याचे तुकडे देखील नजरेस दिसले. गडमाथा छोटा असल्याने गडफेरी लवकर होणार हे साहजिकच होतं, किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाताना दोन टाकी लागतात. लांबवर पसरलेलं किल्ल्याच पठार, सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे पिवळट सोनेरी रंगाच दिसणार सुकलेल गवत, आणि वर पसरलेली निळ्याशार आकाशाची छटा आणि या सर्वात ते पाण्याने भरलेलं टाकं यामुळे नेत्रकमळ सुखावून जात होते. दुरून दिसणाऱ्या या अशा नजाऱ्यामुळे कधी पावले त्या पाण्याच्या टाक्याजवळ पोचली आणि त्या पाण्याचे घोट घशाखाली उतरवले हे आता इथे मांडता देखील येत नाही.
किल्ल्यावरील पाण्याचं एकमेव टाकं 
इथे दोन टाकी आहेत, परंतु एक बुजलेल आहे. इथूनच पुढे असणाऱ्या किल्ल्याच्या दक्षिण टोकाच्या उंचवट्यावर भगवा ध्वज फडकताना दिसत होता, त्याच्याकडे मोर्चा वळवला. त्या ध्वजाची जागा ही अजमेरा किल्ल्यावरील सर्वात उंच जागा होती, इथून सरळ खाली पाहिले असता पहाडेश्वर मंदिर दिसत होतं, याच घसाऱ्यावरून गावातील लोक येतात. वातावरण एकदम मोकळं नसलं तरी बऱ्यापैकी दूरवरचे डोंगर नजरेत येत होते. काल केलेले बिष्टा, कऱ्हा हे किल्ले आणि फोफिर डोंगर एवढेच काय ते ओळखू येत होते. 
अजमेरा माथा 
माझ्या पायातील शूज सॉक्स एव्हाना निघाले होते, कारण पूर्ण गवतातून चालताना कुसळांमुळे आज देखील माझा पुरता सत्कार समारंभ झाला होता. बाजूला असणाऱ्या एका झाडाखाली जरा विश्रांती साठी थांबलो. झाडाची पडलेली थंडगार सावली आणि उंचवट्यावर असल्यामुळे वाऱ्याचा आवेग असा काही होता की बस्स! पूर्ण किल्ल्यावर आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हत, त्यामुळे आणखीनच भारी वाटत होतं. सकाळी नाश्ता केला असला तरी आता परत आतड्यांना शांत करण्यासाठी गुळ-शेंगदाणे, संत्री, खजूर यांची आहुती दिली.
          वातावरणातील प्रसन्नता अगदी मनाला मोहून टाकणारी होती, त्यात अजून भर म्हणून लता दिदींच्या आवाजातील रुणू झुणू रुणू झुणू रे भ्रमरा हे गीत मोबाईलवर लावलं आणि त्या गीतात इतकं गुरफटून गेलो की हातात बूट घेऊन कुसळ काढतोय आणि त्या गीतपंक्ती गुणगुणतोय आणि हे सर्व पुष्कर ने मोबाईल मध्ये शूट केलं.
 त्या गार वाऱ्याचे झोत, आणि ती सावली तिथून हलू देत नव्हती, पण पुढचा सारा टप्पा लक्षात घेता पाय काढणं जरुरी होतं. किल्ल्याच्या पूर्वेकडे जाताना अजून एक कोरडं तलाव लागलं. गडफेरी आता झाली होती. उतरताना पुन्हा आलो त्याच वाटेने उतरण्यापेक्षा आता असलेल्या पूर्व टोकावरून खाली वाट उतरत असल्याचं दिसलं तीच वाट धरून स्क्री वरून चालत अर्ध्या पाऊण तासात पहाडेश्वर मंदिरात पोचलो देखील. स्क्री असली तरी कुसळं नव्हती त्यामुळे मला ही वाट विशेष आवडली. साडेतीन तासात पूर्ण गडदर्शन झालं होतं. मंदिराच्या आवारात जाऊन दत्तू दादांचे आभार मानून गाडीत बसलो आणि आता पुढचा टप्पा देवळाने येथील जोगेश्वरी शिल्प मंदिर.
          पहाडेश्वर पासून देवळाने गाव आठ किलोमीटर अंतरावर, गावात पोचून मंदिराचं ठिकाण विचारून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. तेराव्या शतकातील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली, त्यातीलच हे एक मंदिर.
जोगेश्वरी शिल्प मंदिर,देवळाणे 
महाराष्ट्रातील खजुराहो अशी या मंदिराची ओळख आहे. कळसाचं नंतर पुन्हा बांधकाम करून त्याला शेंद्री पिवळ्या रंगाने रंगवला आहे. आपला पुरातन ठेवा खूप दिवसांनी पाहताना अगदी स्तिमित व्हायला होत होतं. सुरुवातीला मंदिराच्या बाहेर बसूनच मंदिराची बाह्यरचना बघत होतो. मैथुनशिल्पे, नागशिल्पे, मकरशिल्प, भार पेलणारे यक्ष, कृष्ण-गोपिका मिलाप, वाद्य वाजवणारे वाजंत्री, शंकर पार्वती, गणपती, खांबांची नक्षीदार रचना, अंतराळ, सभामंडप,गर्भगृह,उप गर्भगृह या सर्वांवर अक्षरशः बारीक आणि नक्षीदार कलाकुसरीची रेलचेल होती. सभामंडपात कोरलेला सारीपाटाचा खेळ असो, युद्धाचे प्रसंग असो किंवा पाना-फुलांचे अथवा भौमितिक नक्षीकाम सार काही अद्भुत आणि विलोभनीय. 
१.मकरशिल्प २.कृष्ण आणि गोपिका
३.मैथुनशिल्प ४.मैथुनशिल्प आणि नागशिल्प 

नक्षीदार काम 
या मंदिराच्या साऱ्या रचनेवर बोलताना एक पूर्ण ब्लॉग होईल. याच मंदिरावरील दुर्गविहारी यांची एक अभ्यासपूर्ण पोस्ट वाचनात आली होती ती या दुव्यावर वाचा

          बारा वाजून गेले होते, आता पुढचं ठिकाण होतं दुंधा किल्ला.  आठ किमी च्या रस्त्याऐवजी गुगल मॅप ने दाखवलेला चार किमीचा शॉर्टकट घेतला आणि लागलेल्या कच्च्या रस्त्याने जे काय बारा वाजवले की बास. रस्ता संपता संपत नव्हता, मध्ये कुणाला वाटेत विचारायला चिटपाखरूही नव्हतं. एका ठिकाणी एक घर लागलं तिथे विचारलं असता त्यांनी समोरच असलेला दुंधा किल्ला दाखवला, ही किल्ल्याची वायव्य बाजू होती. या बाजूने देखील किल्ल्यावर चढायला वाट आहे हे तेथील माणसांकडून कळलं. परंतु मी या वाटेने जायचं नाकारलं आणि त्यांना दुंधेश्वर महाराजांच्या मठाकडून जाणारी वाट कुठे आहे हे विचारला. 
रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीरगळी 
किल्ल्याला अर्धा वळसा मारून तिकडे रस्ता जातो हे त्यांनी सांगितलं आणि पुढच्या दहा मिनिटात मठाच्या जवळ होतो. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला  एक एक वीरगळ ठेवली होती, अस दोन ठिकाणी होतं. मठाजवळ अंगणात कुठली तरी फळे ठेवली होती, विचारलं असता समजलं की ती गोरखचिंचेची फळं आहेत, त्याच्यापुढे असंही आम्हाला सांगितलं की किल्ल्यावरच्या झाडावरची फळे काढू नका ती कच्ची आहेत.  मठाजवळ थांबून कलिंगडावर यथेच्छ ताव मारून किल्ल्याची वाट धरली.
पायऱ्या 
          झाडीतून जाणारी वाट भर दुपारच्या उन्हातून चालताना उन्हाची झळ लागू देत नव्हती, दहा मिनिटांच्या चालीने कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी आलो इथे कातळाला बोल्ट मारून आधारासाठी साखळ्या लावलेल्या होत्या. एक वाजता चालू केलेली चढाई वीसेक मिनिटात गडावरील महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन आली. इथे मंदिराच्या बाहेर पितळेच्या आवरणाने वेष्टित नंदी होता बाहेर घंटा देखील लावलेल्या होत्या, तर मागे मोठं गोरखचिंचेचं झाड होतं.
शंकराचं मंदिर बाहेर नंदी, भांडी घासायचं टाकं 
किल्ल्यावरील घर 
 मंदिराच्या उजवीकडेच एक मठ होता. भामेश्वर महाराज मठ अस त्या मठाचं नाव, त्या मठात आता कोणी राहत नाही, परंतु येथे राहणाऱ्यांनी त्यांच्या सोईनुसार पाण्याच्या टाक्यांना नावे दिली होती. मंदिराच्या मागे एक टाकं होत ते भांडी घासायच टाकं. हे सगळं पाहून उजवीकडून गडफेरी करायला सुरुवात केली. निवडुंगाच्या झाडाचं अक्षरशः जंगल झालं होतं. बारा-पंधरा फूट उंच आणि तेवढ्याच घेऱ्याने निवडुंगाची झाडे वाढल्याने काही ठिकाणी जायला देखील रस्ता नव्हता. पुढे एक घर लागलं. घराच्या इथून पुढे जाताना एका ठिकाणी अर्धवट टाक्यासारखं काहीतरी कातळात खोदलेल दिसलं. 
अर्धवट सोडलेलं टाकं 
इथून पुढे येऊन आम्ही किल्ल्याच्या वायव्य टोकाला पोचलो. तासाभरापूर्वी ज्या घराच्या इथे आम्ही किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेबद्दल विचारलं होत, ते घर आम्हाला दिसत होतं. 
दुंधा किल्ल्यावरून दिसणारा परिसर 
इथेच पुढे खाली उतरणाऱ्या पायऱ्या देखील लागल्या, बहुधा ती माणसे जी वाट सांगत होते त्याच या पायऱ्या असाव्यात आणि ही वाट आता खालीच उतरते अस समजून आम्ही परत माघारी वळून त्या मंदिराजवळून डावी कडे जाऊ म्हणत मंदिरापाशी आलो. तर तिथे आम्ही ज्या घरात विचारलं होत तिथला एक वीस-बावीशीच्या आसपासचा मुलगा आणि त्यांच्या घरात काम करणारा गडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात कामानिमित्त आले होते, तर तिथून आम्हाला गड दाखवण्यासाठी म्हणून खास वर आले होते, अशी माणसे भेटणे म्हणजे भाग्यच! गडावर निवडुंग इतकं वाढलं होत आणि वाटा काही कळत नसल्यामुळे इथे काही आपल्याला दिसेल की नाही ही जी काही शंका होती ती या दोघांच्या येण्याने नाहीशी झाली होती. त्या मुलाच नाव सुनील, सुनीलने गड फेरी करताना सुरुवातीलाच गोरखचिंचेच्या झाडाची फळे दाखवत ही औषधासाठी वापरात डायरेक्ट खात नाहीत असं सांगून पुष्करने जो काही ही फळे काढायचीच असा निश्चय केला होता तो हाणून पाडला. 
          आता आमचा म्होरक्या सुनील असल्याने त्याच्या पावलांकडे लक्ष देत आम्ही पुढची वाट काढत होतो, वाट कुठून कशी निघते कुठे शिरते काही कळत नव्हतं. 
अंघोळीचं टाकं 
पाच सात मिनिटात आम्ही अंघोळीच्या टाक्यापाशी पोहोचलो. तोंडावर पाण्याचा हबकारा मारून तसाच पुढे चालू लागलो, एका ठिकाणी खाली उतरून पुढे जायचं होतं. गवत वाळलेलं असल्याने पाय थांबायचं नावच घेत नव्हते त्यामुळे जपुन सावरत तिथून उतरत किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या शेवाळी टाक्याजवळ पोचलो, खाली पाणी नितळ असलं तरी वर पूर्ण शेवाळीचा थर जमा झाला होता. कितीही पाऊस पडला, टाकं उलटून वाहू लागल तरी यात शेवाळ येतेच, इति: सुनील. 
शेवाळी टाकं 
शेवाळी टाक्याच्या पुढून वाट किल्ल्याच्या मागच्या पायऱ्यांपाशी आली ज्या पायऱ्या बघून आम्ही माघारी फिरलो होतो. हीच वाट खाली उतरते अस म्हणत त्या काही पायऱ्या खाली उतरलो तिथे निवडुंगाने गिळंकृत केलेल्या एका चौथऱ्याचे अवशेष दिसले. पुन्हा मूळ मार्गावर येऊन सुनील खाली उतरला आणि आम्हाला देखील बोलवलं, तिथं होती थंडगार पाण्याने भरलेली जोडटाकी नाव देव टाकं/पिण्याच्या पाण्याचं टाकं. 
देव टाकं /पिण्याच्या पाण्याचं टाकं 
याच टाक्याच्या वरून आम्ही मघाशी माघारी फिरून गेलो होतो. त्या थंडगार पाण्याच्या इथे जरा विसावून थोडाफार सुका खाऊ पोटात ढकलून पुढची गडफेरी आटोपून महादेव मंदिरापाशी आलो. सुनीलचे मनोमन आभार मानून त्याला काही देण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्याला सपशेल नकार दिला. इतक्या लांबून तुम्ही आमचा किल्ला बघायला आलात मग तो दाखवायचे कसले पैसे, उलट आम्हाला भारी वाटतय की इतक्या लांबून कोणी तरी येतंय इकडे. 
 सुनील सोबत 
सुनील ला तिथेच निरोप देऊन त्याला त्याच्या स्पीड ने पुढे व्हायला सांगितलं आणि आम्ही त्याच्या मागून आमची पायगाडी पिटाळली. पायऱ्यांच्या इथे एका ठिकाणी असलेली गुहा माझ्या नजरेस आली नव्हती ती गुहा पाहून पावले विसावली ती थेट गाडीजवळच. लिंबू सरबताच्या घोटांनी घसा ओला करून मठाच्या बाजूला असलेली अष्टकोनी विहिर बघून सव्वातीन वाजता दुंधा किल्ल्याला पाठमोरा होऊन कंकराळा किल्ल्याच्या मार्गाने रवाना झालो. 
अष्टकोनी विहीर 
          रावळगाव, अजेंग असा कंक्राळा किल्ल्याच्या दिशेने प्रवास करताना रावळगाव मध्ये खाल्लेले खव्याने भरलेले आणि तुपात तळलेले गोड समोसे खाताना मजा आली. विशेष म्हणजे तो समोसा तोंडात टाकून चावताना तुपाची धार अशी काही रेळायची की त्या आतल्या सारणातील खव्यावर जणू तुपाचा अभिषेक होतोय आणि ते सारं तोंडात विरघळताना, एका वेगळ्याच विश्वात जाऊन एकदम तृप्त झाल्याची भावना येत होती. किल्ले पाहण्याची भूक एवढी होती की साडेतीन वाजले होते तरी दुपारच्या जेवणाचा पत्ता नव्हता, शेवटी एका ठिकाणी थांबून अंडा भुर्जी आणि पावांवर ताव मारून लोकांना विचारत विचारत कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गरबड वस्तीत विसावलो. 
गरबड वस्तीतून दिसणारा कंक्राळा किल्ला 
किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात पांढरा रंग लावल्याने ते पार रस्त्यावरूनच ओळखू येतात. वस्तीतीलच माळी मामांनी वाट दाखवतो म्हणत पार घळी पर्यंत आणून सोडलं. इथे घळीत लागायच्या अगोदर एक हरणांचा कळप दृष्टीस पडला आणि हे भाग्य आमच्या पाच जणांच्यात फक्त मलाच लाभलं.

किल्ला चढायला सुरुवात केली तेव्हा साडेपाच वाजून गेले होते त्यामुळे सूर्य कलायला आला होता. घळीत पोचल्यामुळे सूर्यास्ताचे सोनेरी क्षण काही आठवणींच्या कुपीत बंद नसले करता आले तरी उजेडात वर पोचायचं म्हणून पावलांना वेग दिला होता.
 सीताफळाच्या झाडांनी भरलेली घळ सीताफळांच्या मोसमात आलो तर पिशव्या भरून सीताफळं घरी नेता येतील, असे विचार आमच्या मनात येत होते.
पांढरा रंग लावलाय तिथे असलेली पाण्याची टाकी आणि पीर 
          अर्ध्या तासाच्या चढाईनंतर त्या पांढऱ्या रंगापाशी आलो तिथे  एक बुजलेलं पाण्याचं टाकं, आणि दोन चांगली पाण्याची टाकी होती, खाली अजून एक टाकं दिसत होतं तिथे फक्त आम्ही पोचलो नाही. इथेच एका टाक्याच्या इथे नव्याने केलेला पीर देखील होता. घळीत पुन्हा न जाता बुजलेल्या टाक्याच्या इथूनच वर चढून गेलो असता तिथे कातळात खोदलेली अजून तीन पाण्याची टाकी होती तिथून अजून वर चढलो असता आम्ही गडमाथा जवळ केला होता. डिसेंबर महिना असल्याने सव्वा सहा वाजले असतानाच अंधारायला सुरुवात झाली होती. उजवीकडे वळून किल्ल्याच्या आग्नेय टोकाकडे पावले वळवली इथे एक पाण्याच टाकं होत. 
पाण्याचं टाकं 
तिथून पुढे आग्नेय टोकावर गेलो, खालच्या गावात दिवेलागण चालू होती तर अंधारल्यामुळे दूरचा असा प्रदेश नजरेत येत नव्हता. पुढे किल्ल्याच्या उत्तरेकडे जाताना पाच टाक्यांच्या समुहापाशी आलो, काठोकाठ भरलेल्या त्या पाण्याचे घोट घेऊन तृषा क्षमवली.
पाच टाक्यांचा समूह (अंधारामुळे फोटो नीट नाही काढता आला )
 वाऱ्याचे थंडगार झोत तिथेच बसायला सांगत होते, परंतु काळोख होत असल्याने पाय उचलावे लागले. पुढे आल्यावर एक काळ्या रंगाची तेल लावलेली शिळा आढळली, ते काय होत हे काही कळू शकलं नाही. पुढेच उघड्यावर एक मारुती, शंकराची पिंडी आणि भग्न नंदी होते.
किल्ल्यावरील देव 
तटबंदी 

          किल्ल्यावर चढताना घळीतून वर येऊन उजव्या बाजूच्या पठारावर आमची फेरी झाली होती, डाव्या बाजूच्या पठारावर थोडेच दूर जाऊन अंधार झाला असल्याने पावले माघारी वळवली. टाक्याच्या इथून वर चढल्यामुळे दरवाजाचे आणि तटबंदीचे अवशेष दिसले नव्हते ते पाहत घळीतून खाली उतरायची सुरुवात केली. टॉर्चच्या उजेडात उतरताना ज्या मामांनी आम्हाला किल्ल्याच्या वाटेवर लावलं होत, ते सारखे टॉर्च मारून इशारा देत होते, त्यामुळे पावलांना गती देत किल्ला उतरलो. आता माळावरून चालताना जिथे गाडी लावली होती त्या मामांचं घर शोधणं जिकरीच काम होतं.  गाडी लावलेली दिशा ठरवून त्या दिशेकडे जाताना एक छोटी लाईट दिसत होती, मामांनी ती आमच्या साठीच लावली होती हे आम्हाला तिथे गेल्यावर कळलं. 
माळावरून चालताना 
घड्याळात सात वाजले होते पण अंधार असा झाला होता की जणू काही रात्रीचे दहा वाजून गेले असावे. मामा चहा घेण्यासाठी आग्रह करत होते परंतु पुढचा टप्पा बघता जड मनाने त्यांना निरोप दिला. गावरहाळातल्या माणसांचं हे प्रेम बघून खरंच थिजल्यासारखं होतं. 
कंक्राळा किल्ला आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश 
          आजच्या दिवसाचा कोठा जरी संपला असला तरी उद्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं म्हणून लळींग किल्ल्याच्या पायथ्याच्या लळींग गावात कुठे तरी मुक्काम करू अस अगोदरच ठरवलं होतं आणि म्हणूनच कंकराळ्याच्या पायथ्याची गरबड वस्ती सोडून करांजगव्हाण-टोकोडे-झोडगे-लळींग असा पन्नासएक किलोमीटरचा प्रवास करून लळींग किल्ल्याच्या पायऱ्या जिथून सुरू होतात तिथे पोचलो. जाताना रस्त्यातील एका पेट्रोल पंपात पाण्याच्या बॉटल आणि गाडीत असलेला कॅन भरून घेतल्याचा इथे फायदा झाला. लळींग किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याने पन्नास साठ पायऱ्या चढल्यानंतर एक गोलाकार बुरुजासारखा भाग केला आहे तिथे आपण मुक्काम करू शकतो आणि पाण्याचा देखील प्रश्न सोडवला होता. 
लळींगच्या पायऱ्यांवर मुक्कामी 
त्यामुळे गाडी हायवेच्या कडेलाच लावून लळींग किल्ल्याच्या इथे मुक्काम करण्याचं ठरवलं. टेंट वगैरे लावून मस्त चिकन वर आडवा हात मारून आजच्या दिवसाचा आढावा घेताना पहाडेश्वर मंदिर-अजमेरा किल्ला-देवळाने येथील विस्मयकारक शिल्प मंदिर-दुंधा किल्ल्यावर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील धुंडाळलेली पाण्याची टाकी-संध्यासमयी कंक्राळा किल्ल्यावर केलेली थोड्या अंधारातील भटकंती-हरणांचा कळप-वेगवेगळ्या ठिकाणी मनात कायम घर करून बसलेली माणसे हे सर्व आठवताना कधी निद्रादेवीच्या अधीन झालो हे कळलं देखील नाही. 
          क्रमश:

फोटो साभार : अलंकार म्हात्रे, पुष्कर घरत, विशाल पाटील

साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या
(विशाल पाटील)

बागलाण भ्रमंती - भाग १ (किल्ले बिष्टा, कऱ्हा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा 

बागलाण भ्रमंती - भाग २ (किल्ले अजमेरा, दुंधा, कंक्राळा) वाचण्यासाठी या दुव्यावर जा 

दिवस तिसरा 

लळींग किल्ला

  एखाद्या किल्ल्याच्या कुशीत झोपणं यासारखं सुख नाही, कारण रात्री चांदण्यात न्हाऊन निघालेल्या किल्ल्याकडे बघत डोळे कधी मिटतात कळत देखील नाही आणि पहाटे जाग येताच समोर स्वप्नवत वाटावं असं किल्ल्याचं रांगड रूप आपल्याला हाक मारत असतं. आम्ही जिथे थांबलो होतो तिथून लळींग किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदीवरील चर्या बघून त्या स्वप्नांना लवकरच अलिंगण देणार यात तिळमात्र शंका नव्हती. सकाळच सर्व काही उरकून आजच्या म्हणजे शनिवारची सुरुवात झाली.बागलाण सोडून गाळणा टेकड्या या डोंगररांगेतील भटकंती कडे आम्ही कूच केली होती.सकाळच्या पोटापाण्याची व्यवस्था चांगलीच झाली होती. लळींग हा बागलाण भ्रमंतीतला सहावा किल्ला होता, ट्रेक सुरू झाला, नव्याने बांधलेल्या पायरी मार्गाने चढताना पुरती दमछाक होणार हे नक्की. गवत सुकल्यामुळे सगळीकडे पिवळट सोनेरी छटा दिसत होत्या.

लळींग किल्ल्यावर नव्याने बांधलेली प्रवेशद्वारासारखी कमान 

महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचे आवाज कानात गुंजत होते. तर सुर्यनारायणाची कोवळी किरणे देखील जरा आवेशात असल्यासारखी भासत होती. नव्याने बांधलेली दरवाजा रूपी कमान ओलांडून पायऱ्या चढायचा कंटाळा म्हणून पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून चालत होतो. या मोहिमेतील हा पहिलाच किल्ला ज्याला इतक्या पायऱ्या होत्या, त्यामुळे नको वाटत होतं.

पीर 
पायरी पायरी चढताना घामाने पार निथळून निघालो होतो, मध्येच कुठे लागणाऱ्या निवडुंगाच्या सावलीत उभ्या उभ्याच उसासे टाकत पुढची वाट धरत होतो. अर्ध्या तासाच्या चालीत एका पिराच्या थडग्यापाशी आलो, इथून एक कमी मळलेली वाट उजवीकडे जात होती तिच्याकडे लक्ष न देता मूळ वाटेवरच चालू लागलो.थोडं पुढे गेल्यावर जुन्या पायऱ्यांचा मार्ग आला. त्या पायऱ्यांवर एका ठिकाणी नक्षीदार दगड देखील लावला होता.
जुन्या पायऱ्या 
पायऱ्या चढून वर आल्यावर गुहा टाकं आणि आजूबाजूला गुहा लागल्या. गुहा टाक्याची खोली बघून अवाक व्हायला होतं होत. एव्हाना घामाने अंघोळ झाली होती, त्यामुळे टाक्याच्या इथेच वाटेवर निवडुंगाच्या सावलीत पाठीवरची बॅग मोकळी केली आणि पाण्याचे घोट घेत जमिनीवर विसावलो.
गुहा आणि पाण्याची टाकी 
एक एक करत सगळे आले, इथून गुहा टाक्याच्या डावीकडे जाणारी वाट कुठे जाते म्हणून अलंकार आणि मी तिकडे वळलो, तिकडे अजून काही गुहा होत्या तर पुढे किल्ल्याची अर्धी तुटलेली तटबंदी होती. तटबंदीच्या पुढे गेल्यावर किल्ल्यावर चालू असलेल्या संवर्धनाच्या कामासाठी खालच्या गावातून सामान वर पोचवण्यासाठी लावलेला रोपवे दिसत होता. माघारी वळून पुन्हा मूळ वाटेवर आलो, इथे गडावर काम करण्यासाठी रोजंदारीवर येणारी माणसे त्यांची शिदोरी घेऊन वर चढत असलेलं चित्र पाहण्यास मिळालं. पुन्हा नव्याने बांधलेल्या पायऱ्या आल्या या पायऱ्या आम्हाला किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी घेऊन गेल्या,प्रवेशद्वाराच्या बाजूचे बुरुज नव्याने बांधले गेलेले होते.पाऊण तासाच्या चालीत खड्या पायऱ्या चढताना घामाने चिंब भिजून अखेर गडावर आमचा प्रवेश झाला होता.
प्रवेशद्वार आणि बुरुज
भग्न प्रवेशद्वारातून प्रवेश केला असता समोर छोट्या देवळी होत्या तर उजवी कडे वर गेल्यावर महिरपी कमान केलेली दिसते, तिथे बसून दुरवर गेलेला महामार्ग आणि लळींग गाव व आजूबाजूचा परिसर एकदम विहंगम वाटत होता.
तोफ ठेवण्याचा उंचवटा 

वाऱ्याचे येणारे झोत घामाने भरलेल्या पूर्ण शरीराला सुखावून सोडत होते. पुढे असलेल्या बुरुजावर तोफे ठेवण्यासाठी उंचवटा केला होत्या याच्यामध्ये लोखंडी दांडा होता जेणेकरून तोफेचा मारा सर्व दिशांना करता येईल. बुरुजाच्या पुढे असलेली तटबंदी आणि त्या तटबंदीवरील चर्या सुस्थित होत्या. तटबंदीवरून माघारी वळून प्रवेशद्वार जवळ केलं आणि डाव्या बाजूला वळलो. इथे काही पाण्याची टाकी आहेत इथून पुढे गेल्यावर मोठं पाण्याचं टाकं, त्या टाक्याची रचना विशेष आवडली. आतमध्ये अशा खिडक्या आणि त्याच्यामध्ये दालन अशा स्वरूपातील हे पाण्याच टाकं. त्यातल्या काही भागात गाळ साचलाय तर काही दालनात पाणी आहे.
पाण्याचं आकर्षक टाकं 
पुढे तटबंदीवरुन चर्यांची नक्षीदार वळणे पाहत चालताना नजर हलत नाही. लळींग किल्ल्याचे संवर्धनाचे काम जोरात चालू असल्याचा हा पुरावा होता. पुढे गेल्यावर हे काम डोळ्यांनी पाहता आलं. खूप सारी माणसं काम करताना दिसली त्यातली काही छिन्नी हातोड्याने दगडाला आकार देत होते तर काही जण चुन्याच्या घाण्याच्या यंत्राजवळ काम करत होते तर काही जण सामान ने आण करण्यात व्यस्त होते.
नक्षीदार चर्या 
महिलावर्ग चुली पेटवून सकाळच्या न्याहारीची तयारी करतानाचे चित्र पाहायला मिळत होते. या संवर्धनाच्या कामामुळे त्या परिसरात दगड विटांचे तुकडे इतस्ततः पडलेले दिसत होते, त्यातून वाट काढत पुढचा टेकाड चढलो, इथे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत उभी असलेली दारू कोठराची वास्तू होती तर त्याच्या मागे अजून काही पाण्याची टाकी होती.
दारुकोठार आणि पाण्याची टाकी 
दारुकोठराच्या वरच्या अंगाला असलेल्या ललिता मातेच्या मंदिराजवळ जाऊन सावलीत बसलो,किल्ल्यावरून देवीला नाव पडलं की देवीवरून किल्ल्याला हे आम्हाला अज्ञातच आहे.
ललिता देवी मंदिर आणि आतील देवीची मूर्ती 

इथेच पोटात थोडाफार सुका खाऊ ढकलून ललिता मातेचं दर्शन घेऊन किल्ल्यासंदर्भात असलेल्या माहितीच पठण करून उर्वरित गडफेरी आरंभली.
जोत्याचे अवशेष 
मंदिराच्या बाजूलाच राजवाड्याच्या जोत्याचे अवशेष आहेत, गवताला आग लावल्या कारणाने ते अवशेष मोकळे झाले होते. गडमाथा असा फार मोठा नसला तरी बऱ्यापैकी दृश्य वरून पाहायला मिळतं, पण आम्ही गेलो तेव्हा धुक असल्याने जास्त दूरवरचं काही ओळखू येत नव्हतं. किल्ल्याला चोर दरवाजा आहे हे वाचलं होतं पण तो कुठे आहे हे अजून आम्हाला समजलं नव्हतं त्यामुळे त्याच्या शोधात आम्ही किल्ला फिरत होतो. एका ठिकाणी गवतात झाकलेले भुयारवजा काहीतरी दिसलं तिथे आत उतरण्याच्या पायऱ्या देखील गवताने भरल्या होत्या आणि आत कचऱ्याच साम्राज्य पसरलं होत. इथे गडाच्या संवर्धनाच काम करणाऱ्या लोकांनी याची कचराकुंडीच करून टाकली होती. आत अंधार दिसत असल्याने डोक्याला टॉर्च लावून खाली उतरलो, तर ते एक भुयारी टाकं होतं. गाळ, पाणी आणि वरून पडणारा कचरा यामुळे त्या सुंदर टाक्याची रयाच गेली होती. हा तर काही चोर दरवाजा नाही म्हणून पुन्हा त्या चोर दरवाजाच्या शोधात निघालो. त्या भुयारी टाक्याच्या इथून वर निघाल्यावर तटबंदी वरून खाली डोकावून पाहताना तटबंदीत असलेला दरवाजा दिसला आणि आपली शोधमोहीम सार्थक झाल्याचं समाधान मिळालं. पायऱ्या उतरून चोरदरवाजातून बाहेर उतरताना खालच्या टप्प्याला आधारासाठी एक लोखंडी वायर लावून ठेवली आहे.
चोर दरवाजा 
खांब  टाकं 
चोरदरवाजाच्या खालचा टप्पा काळजीपूर्वक उतरून पुढची वाट धरली इथे एक स्वच्छ पाण्याने भरलेलं खांब टाकं होतं. टाक्यातील थंडगार पाण्याने घसा ओला करून पुढे असलेल्या देवीच्या उध्वस्त मंदिरापाशी आलो. मंदिराच्या समोर असलेल्या भिंतीवर असलेल्या कमानी आणि मंदिर सार काही गवताने व्यापून टाकलं होतं.
उध्वस्त मंदिर 
आहे तीच वाट सरळ पकडून आम्ही लळींग किल्ल्याच्या माचीवर प्रवेश केला इथे एक मोठा कोरडा तलाव आणि तलावाच्या बाजूला एक घुमटी आहे. इथेच डावीकडे दूर एक मशीद देखील दिसत होती.
माचीवरील तलाव आणि बाजूची घुमटी 

तलावाला उजवीकडे ठेवून तशीच पुढची चाल धरून माचीवरून चालत छोट्या पायवाटेवरून पिराच्या थडग्यापाशी आलो. किल्ला चढताना थडग्यापाशी आल्यावर हीच वाट दिसली होती. एकंदरीत गडफेरी उत्तमरीत्या पूर्ण झाली होती,पावले आता गडउतार होत वेगाने खाली सरकत होती, पायऱ्या उतरताना गुडघे जरा बोलत होते. तीन तासात पूर्ण गडाचे दर्शन घेऊन गाडीत बसून पुढच्या किल्ल्याच्या दिशेने निघालो देखील.
पुढचा किल्ला होता लळींग पासून चाळीस किमी अंतरावरील सोनगीर किल्ला, धुळ्यावरून पुढे जाताना मध्ये नगावे इथे थांबून दोन-दोन नारळपाणी रिचवून सोनगीर गावात दाखल झालो. एखाद्या घराच्या पायऱ्या वाटाव्या अशा पद्धतीने सोनगीर किल्ल्याच्या पायऱ्यांची सुरुवात घरांच्या दाटीवाटीत गावातल्या रस्त्यावरून झालेली दिसते.
सोनगीर किल्ल्याच्या पायऱ्या 
गाडी पायऱ्यांपाशी जाते खरी पण घरांची गर्दी बघता गाडी कुठे लावावी आणि आपण लावलेल्या गाडीची इतरांना अडचण होणार नाही ना असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. दगडी पायऱ्यांची वाट बाजूला असलेले लाईटचे खांब आणि समोर दिसणारी किल्ल्याची भरभक्कम तटबंदी हे सर्व पाहताना अवघ्या पाच-सात मिनिटांच्या चढाईत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो देखील.
प्रवेशद्वार आणि ढासळलेले नक्षीदार खांब 
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची कमान नीट असली तरी बाजूचा भाग ढासळला आहे, इथेच काही नक्षीदार खांबांचे भाग उभे आहेत तरी काहींची पडझड झालेली दिसते. प्रवेशद्वारातून पुढे येऊन कातळकोरीव पायऱ्या चढून गडमाथा गाठला.उत्तर-दक्षिण पसरलेला गडमाथा उत्तरेच्या बाजूने फिरुया म्हणत उजव्या हाताच्या वाटेने चालू लागलो. दुरूनच एक खोलगट भाग दिसला त्या दिशेनेच उतरताना ती खोली जरा जास्तच भयानक भासू लागली. जपत जपत पावले टाकत जवळ गेल्यावर समजल की ती एक आयताकृती विहीर होती.पन्नासेक फुटांवर त्यात पाणी होत.
विहीर 
रांजण 
अजून खाली किती खोल असेल याचा काहीही मागमूस नव्हता. न जाणो जर चुकून कोणी यात पडलाच तर वर येण्यासाठी काहीही पर्याय नव्हता. या विहिरीच्या पुढेच एका वास्तूचे अवशेष होते, त्याच्या पुढे जात किल्ल्याचं उत्तर टोक गाठलं, उत्तर टोकावर असलेला बुरुज देखील पडलेला होता, तिथे असणारे काही चिरे त्या बुरुजाचे अस्तित्व दाखवत होते. गडाचा उत्तर भाग फिरून झालो होतो आता दक्षिणेकडे जाताना वाटेत दोन ठिकाणी दगडी रांजण दिसले. किल्ल्यावर अजून काही फारसे अवशेष दिसले नाही त्यामुळे दक्षिण टोक देखील लगेच गाठलं, तेथील बुरुज देखील नामशेष झाल्यात जमा होता.
उद्धवस्त बुरुज 
गडफेरी उरकून आल्या मार्गाने माघारी फिरून पायथा गाठला.चार दोन अवशेष का असेना पण वेगळं काहीतरी पाहण्यात आलं आणि भटकंतीच्या कप्प्यात अजून एका नव्या किल्ल्याची भर पडली हे आमच्या सारख्या भटक्यांसाठी सोन्याहून पिवळं असतं.
भटकंतीचा तिसरा दिवस असून देखील वेळेच्या बाबतीत एकदम काटेकोर होतो. तिसऱ्या दिवसाच्या दोन किल्ल्याचं दान पदरात पाडून आता तिसरा किल्ला गाळण्याच्या दिशेने आम्ही प्रस्थान केलं. धुळे-लळींग-अजनाळे-डोंगराळे-गाळणा असा साठ-पासष्ट किमीचा पल्ला ओलांडून दुपारच्या जेवणासाठी गाळणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गुरू गोरक्षनाथ आश्रम गाठलं. दुपारचं जेवण जरा रेंगाळत केल्याने किल्ल्याच्या वाटेवर लागायला जरा उशीरच झाला.
गाळणा किल्ला 
गुरू गोरक्षनाथ आश्रमाच्या उजव्या बाजूने किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत सिमेंट रस्ता जातो आणि नंतर चालू होतात त्या गाळणा किल्ल्याच्या प्रशस्त पायऱ्या. लळींग, सोनगीर यांच्या पायऱ्या चढून हैराण झालो होतो, त्यात अजून ही भर बहुधा. किल्ला चढताना दुरूनच दिसणारी भरभक्कम आणि अभेद्य तटबंदी,देखणे बुरुज आणि त्यावरील चर्या हे सर्व गाळणा किल्ला किती वैभवशाली आहे याची ओळख दुरूनच पटवून देत होते. अवघ्या दहा मिनिटांच्या चढाईत पहिला दरवाजा गाठला देखील,या दरवाजाच नाव परकोट दरवाजा, दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत.
परकोट दरवाजा 
इथून पुढे पाच एक मिनिटे पायरी मार्गाने चढाई केली असता आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोचतो. दरवाजाची तिहेरी कमान,वरच्या बाजूला असलेले कमळ आणि सार बांधकाम सुस्थितीत असल्यामुळे या दरवाजा वरून नजर हटत नाही. लोखंडी दरवाजा अस या दुसऱ्या दरवाजाचं नाव.याच दरवाजाच्या वर एक पर्शियन भाषेतील शिलालेख देखील लावलेला आहे.
लोखंडी दरवाजा 
एक एक पायरी वर चढतोय तस गाळणा किल्ला त्याच्या पोतडीतून एक नजराणा आमच्या समोर पेश करतोय असच काहीसं आम्हाला वाटत होतं.
बघता बघता तिसऱ्या दरवाजापाशी पोचलो देखील, इथे येताना आता तटबंदीच्या फांजीवरून चालत खालचं दृश्य बघत जात असताना तटबंदीत लावलेला एक शिलालेख पहावयास मिळाला, हा देखील पर्शियन भाषेतच होता.
तटबंदीवरील शिलालेख 
तिसऱ्या दरवाजा जवळ आलो, हा कोतवाल पीर दरवाजा.
कोतवाल पीर दरवाजा 
या दरवाजात चढायच्या अगोदर डाव्या बाजूला एक वाट जाते, ही वाट छोटी आणि कमी वाहिवाटीची होती. त्या वाटेवर गेलो असता वाटेच्या शेवटी तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा होता.
चोर दरवाजा 
या दरवाजातून पुढे जायला वाट नव्हती त्यामुळे माघारी फिरून कोतवाल पीर दरवाजातून प्रवेश केला. या दरवाजातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भिंतीत एक नव्यानेच केलेलं पीराच थडगं दिसून आलं. आणि तटबंदीच्या वर जशी नजर फेकली तस तोंडात आ वासून पाहतच राहावं अस दृश्य समोर आलं.
नक्षीदार सज्जे 
तटबंदी वर केलेले नक्षीदार सज्जे त्यांच्यावर केलेल्या बारीक कालाकुसरीमुळे लक्ष वेधून घेत होते. त्या सज्जांकडे बघत पुढचा दरवाजा गाठला, हा होता लाखा दरवाजा.
लाखा दरवाजा
आतापर्यंत परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा आणि हा लाखा दरवाजा असे मोठे आणि सुस्थितीतील दरवाजे तर एक चोर दरवाजा या अशा एकशे एक वास्तू बघून गाळण्यासाठी मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा तयार होत होती. लाखा दरवाजात प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या होत्या. या दरवाजाचं जीर्णोद्धार झालं असल्याच दिसत होतं, तसेच देवड्यांमध्ये देखील लाकडी खांब लावले होते.
लाखा दरवाजात पोचेपर्यंत पाच वाजले होते. गाळणा किल्ल्याचं वैभव बघून आमचा प्लॅन कोलमडल्यात जमा झाला होता, आणि महत्वाचं म्हणजे हा किल्ला धावत पळत बघण्यातला नव्हताच. आणि म्हणूनच आज फक्त सुर्यास्तासाठी मोक्याची जागा बघून ते कातरक्षण अनुभवावे, आणि किल्ला पाहण्यासाठी उद्या सकाळी परत यायचे, या मतावर कोणीही आढेवेढे न घेता सहमती दर्शवली.लाखा दरवाजातून पुढे आल्यावर तीन वाट फुटतात डावी-उजवी-सरळ यापैकी उजवीकडच्या वाटेवर जे सज्जे लक्ष वेधून घेत होते त्यांच्यावर धावती नजर टाकून ते दुसऱ्या दिवसासाठी राखीव ठेवले आणि सरळ वर जाणारी वाट पकडून किल्ल्याचा माथा गाठण्याच लक्ष निश्चित केले.
उद्धवस्त सज्जा 
पाण्याचं टाकं आणि दर्गा 
वर आल्यावर काही उध्वस्त वस्तूंचे अवशेष नजरेस पडत होते,तर एक पाण्याच टाकं देखील होत, त्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना होती, तर त्याच्या बाजूलाच एक दर्गा होता. तिथूनच गवतातून वर जाणारी छोटी वाट पकडून किल्ल्याच्या सर्वोच्च टेपाडावर आलो. पण झाडीने भरलेलं असल्यामुळे आम्हाला आता पश्चिम बाजू गाठायची होती. इथे बहुधा लोकांचा राबता कमी असावा म्हणूनच वाट बारीक, गवताने भरलेली आणि कमी मळलेली होती. या वाटेवरून चालत पश्चिमेकडे जाताना बऱ्याच ठिकाणी गवतात लपलेले थडग्यांचे अवशेष दिसत होते,काही मोठे थडगे देखील होते.
थडगी 
झाडीतून येणारी सूर्याची किरणे गवतावर जणू काही सुवर्णाभिषेक करत होते, सूर्याचे ते बदललेले तांबूस रूप आता एखादी जागा शोधा आणि बुड टेका असाच इशारा देत होते. एव्हाना किल्ल्याच्या पश्चिमेला आलो होतो, तिथे बैठक मारून समोर दिसणारं दृश्य आठवणींच्या कप्प्यात जपण्यासाठी सारे सज्ज झालो होतो. झाडीतून दिसणारं समोरच मोकळ दृश्य, मध्ये मध्ये उठावलेले छोटे छोटे डोंगर, सुर्यकिरणात चमकून निघणारे जलसाठे, त्यातील प्रतिबिंब, निळ्या निरभ्र आकाशात केशरी पिवळ्या रंगाचा पडलेला सडा आणि घराकडे निघालेले पाखरांचे थवे, सारं काही स्वप्नवत!

सोबत आणलेला छोटा गॅस पेटवून मस्त चहाला आधण आणलं, सूर्यास्ताचे ते कातर क्षण अनुभवत चहाचे घोट घेत आशाबाईंच्या आवाजातील सांज ये गोकुळी सावळी सावळी या गीतपंक्ती पुटपुटत तिथेच तल्लीन झालो होतो. एव्हाना सूर्यबिंब कधीच गुडूप झालं होतं, चहाचा कपदेखील रिता झाला होता, पश्चिमेचा रंगाविष्कार त्याचे पसरलेले रंग आवरत चंद्राकडे जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत होते. आम्हाला देखील आता पाय काढणं जरुरीचं होतं. अंधार पडायला लागल्यामुळे डोक्यावरच्या टोप्यांची जागा हेडटॉर्चने घेतली. आल्या वाटेने पावले माघारी वळली होती, वाट नीट असल्यामुळे अंधारात चाचपडण्याचा प्रश्नच नव्हता. वर चढताना बघितलेल्या वास्तूंकडे आता उतरताना बघताना एक प्रकारे उजळणीच चालू होती. वीस मिनिटात पायथ्याच आश्रम गाठलं होत. डोंगरभटकंती मुळे जुळलेली नाती कधी कुठे कशी उपयोगी पडतील याचा नेम नाही, ओंकार ओक याच्या एका फोनवर या आश्रमाचे विश्वस्त अप्पा चिंचोरे यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी व्यंकट महाराज यांना सांगून आमची आश्रमात राहण्यासाठी सोय केली. ऐसपैस रूम आणि पुरेपूर पाणी यामुळे आजच्या दिवसाची सांगता देखील यथोचित होणार यात शंका नव्हती. अंघोळ करून आश्रमात दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर पाहून रात्रीच जेवणं उरकली. आजचा मुक्काम भारी असल्यामुळे जेवणात देखील कांदा भजीचा बेत केला होता. जेवणानंतर सारेच पेंगले होते, त्या मुळे जो तो लगेच स्लीपिंग बॅग मध्ये घुसून आडवा झाला. लळींग, सोनगीर आणि गाळण्याच्या अविस्मरणीय भटकंतीचा आजचा दिवस सार्थकी लागला होता.
          क्रमश:
बागलाण भ्रमंती - भाग ४ अंतिम (गाळणा किल्ला, मालेगाव भुईकोट)
दिवस चौथा
गाळणा किल्ल्यावरील अप्रतिम सूर्योदय 
प्रत्येक किल्ल्याला काही तरी विशेषतः आहे जी तो मिरवू शकतो व तिचा अभिमान बाळगू शकतो, जस की हरिश्चंद्रगडाने कोकणकड्याच्या मुकुटमणी परिधान केला आहे, राजगडाला महाराजांच सर्वाधिक वास्तव्य राहिलं आहे, रायगडाने राजधानीचा मान पटकावला, जंजिऱ्याची अभेद्यता, माहुलीचा बेलाग सुळक्यांचा समूह, अलंग-मदन-कुलंगची धडकी भरवणारी चढाई, रतनगडाचं मनोहारी रूप, प्रतापगडावरचा शिवप्रताप तर साल्हेरचा उच्चतम बालेकिल्ला. या सर्वांसोबत गाळणा किल्ला देखील त्याच्यावर असलेल्या दुर्गश्रीमंतीचा गर्व करू शकतो,आणि म्हणूनच गाळण्याला नाशिकच नाक अस देखील म्हटलं जातं. याचा थोडासा परिचय कालच्या गाळणा चढाईत आला, आणि म्हणूनच पुढच्या प्लॅन मध्ये बदल करून आज देखील गाळणा फिरायचं ठरवलं होतं आणि त्यातही सूर्योदय बघायला किल्ल्यावर असलोच पाहिजे ही अट होती. आश्रमात मुक्कामाची सोय व्यवस्थित झाल्याने सर्वांना उत्तम आराम मिळाला होता यामुळेच सकाळी सव्वा सहा वाजता आश्रमातून निघून गाळण्याच्या दिशेने आमचा ट्रेक सुरू देखील झाला.
परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा,लाख दरवाजा असे एक एक दरवाजे मागे टाकत गार झुळूक अंगावर घेत आमची वाटचाल चालू होती. लाखा दरवाजातून प्रवेश केल्यावर ज्या तीन वाटा फुटतात त्यातील सरळ वाट पकडून काल गडमाथा धुंडाळला होता. आज त्यातलीच उजवीकडे वळून पूर्ण गडाला तटबंदी वरून वळसा मारणार होतो. तुर्तास सूर्योदय पाहणं हे उद्दिष्ट असल्याने डावीकडची वाट पकडून किल्ल्याच्या पूर्व भागात जाण्यासाठी निघालो. इकडे तटबंदीवरुन चालताना एका ठिकाणी पाण्याचा टाका दिसून आला. बहुधा या वाटेवर फिरणारे कमी लोकं असावेत म्हणूनच वाट छोटी आणि गवताने वेढलेली होती, पूर्व दिशेला असलेल्या बुरुजावर पोचलो आणि थकलो नसलो तरी बुड टेकवून खाली बसलो. पूर्वेच्या आसमंतात जो सहस्त्ररश्मी विलक्षण अशा रंगछटा उधळत होता की त्या पाहण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही एका जागेवर असणं गरजेचं होतं. बुरुजावर पोचायला सकाळचे पावणेसात झाले होते. या बुरुजाच्या मध्यभागी तोफेचा मारा सर्व दिशांना करता यावा यासाठी लोखंडी दांडा ठेवला होता. सूर्योदय पाहत असतानाच किल्ल्याची माहिती वाचून आणि पुन्हा एकदा नकाशा समजून घेतला.
पूर्वेकडील बुरुज 
चोर दरवाजा 
बुरुजाच्या पुढे तटबंदीवरुन फोटोंसाठी चांगला अँगल मिळेल म्हणून मी आणि पुष्कर जरा पुढे निघालो तर बाकीचे त्या बुरुजवरूनच आजूबाजूचा परिसर न्याहाळत राहिले, या बुरुजावर येताना काही ठिकाणी तटबंदी ढासळली होती त्यामुळे सावधपणे चालावं लागत होतं. त्या बुरुजावर पोचून पुष्कर फोटोग्राफी करत होता तर मी किल्ल्याची तटबंदी न्याहाळत होतो. या बाजूला एक चोर दरवाजा आहे पण तिकडे जायला वाट नाही हे वाचून होतो आणि ज्या अर्थी आता जिथे आहोत तिथपर्यंत वाटेत वाढलेलं गवत आणि तटबंदीवरून चालताना ढासळलेले दगड यावरून पुढे वाट नसणारच यावर शिक्कामोर्तब झाला होता. बुरुजावरून खाली बघताना एका ठिकाणी दरवाजा दिसला आणि तिथे सहज जाऊ शकतो हे देखील कळत होतं. अरे वा! हे तर एक सरप्राईजच मिळालं, मागच्याना काहीही न सांगता काय आहे ते आधी आपणच पाहुया म्हणून पुष्कर आणि मी तिकडे गेलो, जाताना उजवीकडे कड्यात खोदलेले पाण्याचे टाके होते, तटबंदीतून पायऱ्या उतरून तटबंदीच्या बाहेर आलो आणि आजच्या भटकंतीची सुरवात भन्नाट झालीय याची तो दरवाजा पाहून पोचपावती मिळवली. बाकीच्यांना पण लगेच आवाज देऊ बोलवलं, तटबंदीवरुन पुढे बघताना अजून एक दरवाजा लागला, पण तिकडे जायची वाट झाडीने भरलेली दिसत होती. बहुधा हा तोच दरवाजा असावा जिथे जायला वाट नाही. झाडीतून वाकून-ओणवे होऊन चोर दरवाजाच्या दिशेने गेलो असता लागलं ते नितळ पाण्याचं टाकं,टाक्यात उतरायला जागा नव्हती आणि त्या टाक्याच्या पलिकडेच चोर दरवाजा दिसत होता, तटबंदीवरुन जाणारी वाट असावी तर टाक्याच्या डाव्या बाजूचा तटबंदीचा पूर्ण भाग ढासळलेला दिसत होता. माघारी येऊन तटबंदीवर चढून त्या ढासळलेल्या भागाच्या इथे आलो पण निष्फळ!
पाण्याचं टाकं आणि पलीकडील चोर दरवाजा ,डाव्या बाजूला ढासळलेली तटबंदी 
आता मागे लाखा दरवाजाकडे जाऊन उजवीकडून तटबंदीवरुन गडफेरी करण्यापेक्षा आहे इकडूनच करूया म्हणत पावले पुढच्या दिशेनेच चालू लागली. वरच्या बाजूला पाहताना तटबंदीत कमानीसारखे बांधकाम नजरेस पडले बाजूलाच कड्यात खोदलेली पाण्याची टाकी दिसत होती. त्या कमानींपाशी गेल्यावर समजले कि त्या सैनिकांसाठीच्या देवड्या आहेत, वर परत अशाच देवड्या दिसल्या.
तटबंदीतील देवडी 
वरच्या टप्प्यात चढलो असता बांधकाम असलेली वास्तू दिसली त्याच्या अंतर्रचनेवरून ते बहुधा स्नानगृह असावं.
पर्शियन शिलालेख 
इथूनच किल्ल्याच्या वरच्या भागात जायला वाट होती, पण काल गडमाथा पाहून झाला असल्याने तिकडे न चढता डाव्या बाजूने गडफेरीच सुरु ठेवली. आम्ही आता किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे असू, तटबंदीवरुन चालताना इथल्या एका बुरुजावर पर्शियन भाषेतील शिलालेख आणि त्याच्या दोन्ही बाजूला व्याल कोरलेले लावलेले दिसले.दरवाजे आणि तटबंदीसोबत शिलालेखांची मालिका देखील चांगलीच चालू झाली होती, बाकी दिसणाऱ्या अवशेषांची तर काही गणतीच नव्हती. तटबंदीवरुन चालताना नक्षीदार चर्यांमध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी केलेल्या जंग्यादेखील दिसत होत्या. जशी तटबंदी किल्ल्याच्या समोरच्या म्हणजे दक्षिण भागात आहे तशी किल्ल्याच्या उत्तरेच्या भागात नाही, कारण या दिशेला डोंगराच्या उभ्या कड्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. त्यामुळे आता तटबंदीही नाही आणि फांजीही(तटबंदीवरुन चालायची जागा) नाही. वाट आता वाळलेल्या गवतातून पुढे जाऊ लागली, वाळलेल्या गवतावरून चालताना पाय सरकत असल्याने कड्यापासून अंतर ठेऊनच चालत होतो. वरच्या बाजूला उजवीकडे दिसणारा गडमाथा तर डावीकडे खाली दिसणारी गावे आणि समोरून आम्ही तुडवत असलेली पुसटशी वाट.
तटबंदी आणि बुरुज 
मध्येमध्ये काही ठिकाणी जिथे संरक्षक कडे नसतील तिथे तटबंदीचे अवशेष दिसत होते. काही ठिकाणी तटबंदी तुटली देखील होती आणि त्यातील सुटावलेल्या दगडांचा ढीग खाली काही ठिकाणी दिसत होता.
गवतातून वाट काढताना काही अवशेष नजरेतून सुटत असणार याची खंत होती. किल्ल्याच्या वायव्येस एक बुरुज दिसू लागला, इतक्या वेळानंतर एक बऱ्यापैकी चांगली वास्तू गवतातून डोकं वर काढून बघत असल्यासारखं भासत होतं.
गवतात लपलेला बुरुज 
देवडी

या बुरुजात कमानी असलेल्या देवड्या होत्या ज्यात आतून देखील कमानी होत्या. या बुरुजावर चढायला पायऱ्या होत्या. गवतातून वाट काढत त्या बुरुजावर चढलो इथून पश्चिमेला पाहिलं असता वाट खाली उतरते आणि त्या बाजूची तटबंदी आणि बुरुज शाबूत असलेले समजत होतं. त्या बाजूने जसजस चालू लागलो, तसा आमचा सामना पुन्हा गवताशी झाला, गवतातून तर काही ठिकाणी झाडोऱ्यातून वाट काढताना वाकून-ओणवे होत कसरत करत वाट चालावी लागत होती. इथे आता पुष्कर गवताचा शिकार झाला होती, त्याची पॅन्ट आता पूर्ण भरून निघाली होती. पश्चिम दिशेच्या तटबंदीवर देखील एक पर्शियन शिलालेख होता, या शिलालेखा खाली एक तोंडाच्या आकाराची शिल्पाकृती होती, थोडंच पुढे अजून एक शिलालेख तटबंदीच्या चर्येवर आढळून आला.
शिलालेख आणि खालील शिल्प 
तटबंदीवरुन चालताना आता ज्या चर्या होत्या त्यांची उंची साधारण आठ-नऊ फूट इतकी प्रचंड होती. जंजिरा, धोडप या किल्ल्यांवर ज्या चर्या बघितल्या होत्या त्या मानाने इथल्या कितीतरी पटीने मोठ्या होत्या.
चर्या 
गडफेरी आता होत आली होती कारण पश्चिम-नैऋत्य दिशेने जसे आणखी पुढे आलो तसा गाळण किल्ल्याचा समोरचा भाग आणि खालचं गाळणा गाव व आम्ही मुक्काम केलेला आश्रम इत्यादी पायथ्याचे दृश्य आम्हाला दिसू लागले.
गवताची वाट देखील आता बऱ्यापैकी चांगली मळलेली आली, इतक्या वेळानंतर पाण्याच्या टाक्याचे दर्शन झाले आणि वर असलेला रंग लावलेला दर्गा देखील आता वरच्या अंगाला दिसत होता. तटबंदीवरुन चालत असताना गाळणा किल्ल्याच्या खोदीव गुहांपाशी आलो. इथे गुहांची शृंखला चालू झाली होती, इतक्यात तटबंदीवरील चर्यांकडे लक्ष वेधलं गेलं, एका चर्येवर परत एकदा पर्शियन भाषेतील शिलालेख होता तर बाजूच्या दोन चर्यांवर व्याल शिल्प होते.
तटबंदीवरील चर्येवरील शिलालेख आणि व्याल शिल्प 
ते पाहून पुन्हा गुहा पाहत पुढे सरकू लागलो, यातील एक मंदिरवजा गुहा आहे, त्या गुहेच्या बाह्य भागावर वरच्या बाजूला मंदिराच्या कळसासारखं कोरीव शिखर केला आहे, आत मध्ये गणपती, शंकराची पिंड आणि मारुती आहेत.
गडदेवता 
गडदेवतांचं दर्शन घेऊन बाहेर आलो इथे तटबंदीवर लावलेला मराठा साम्राज्याचा भगवा निशाण डौलाने फडकत होता.
डौलाने फडकणारा भगवा 
थोड्याच पुढे आता ज्या ठिकाणाचे काल पासून दुरून दर्शन घेत होतो आणि आत्मीयतेने तेथे कधी पोचतोय अस झालं होतं, त्या नक्षीदार सज्जां जवळ आम्ही येऊन दाखल झालो. कमानीतून आत प्रवेश केल्यावर चार बाजूनी चार कमानी तर वर घुमटी, तटबंदीच्या दिशेने कमानीतून बाहेर निघाल्यावर समोर मोठी कमान तर डाव्या-उजव्या बाजूला छोट्या कमानी होती, या सर्व कमानी महिरपी आकारातील होत्या.
नक्षीदार सज्जा 
त्या सज्जात बसून घोंघावत येणाऱ्या वाऱ्याचे झोत अंगावर घेत समोरचा परिसर न्याहाळण्यात मजा येत होती. हा सज्जा किल्ल्याच्या दक्षिण भागात होता, जर उगवतीला किंवा मावळतीला असता तर प्रातःकाळी किंवा सांजवेळी होणाऱ्या केशरी पिवळ्या रंगांच्या उधळणीत याचं सौंदर्य अजून कित्येक पटीने वाढलं असत यात तिळमात्र शंका नव्हती. त्या सज्जाच्या इथे प्रत्येकाने आपली फोटो काढायची हौस भागवून घेतली. पुढे आल्यावर अजून एक वास्तू समोर आली. ही होती तटबंदीवरील सज्जा सारखीच पण जरा वेगळी वास्तू, यातील फक्त एकच कमान उभी होती बाकी सगळे अवशेष ढासळले होते. येथील एका खांबाच्या पायाला असलेला दगड लोखंडी दरवाजात पहिला होता. उघड्यावर असलेली ती कमान आणि दूरवर दिसणार निळं क्षितिज एक भन्नाट फ्रेम गाळणा किल्ल्याने आम्हाला बहाल केली होती.
उध्वस्त सज्जा 
हे सर्व पाहून आम्ही लाखा दरवाजात पोचलो आणि आमची गडफेरी यथासांग पूर्ण झाली.
गाळणा किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचं ठरवलं तर या किल्ल्याचा लिखित इतिहास तेराव्या शतकापासून मिळतो. १३ व्या शतकात गाळणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते. याच बागुल राजांमुळे या भागाला बागलाण असे नाव मिळाले होते. सोळव्या शतकात (इसवीसन १५१० ते १५२६) गाळणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन १५२६ मध्ये बागलाणचा राजा बहिरजी याने निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १५५५ मध्ये निजामशहाने गाळणा पुन्हा जिंकून घेतला. पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवी सन १७५२ मध्ये भालकीचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा किल्ला होळकरांच्या ताब्यात होता. इसवी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी गाळणा किल्ला जिंकून घेतला. (इतिहास :आंतरजाल)
गाळणा किल्ल्याची गडफेरी यथोचित पूर्ण झाली होती. खूप साऱ्या वास्तू आणि दृश्य डोळ्यात साठवून आणि आठवणींच्या पसाऱ्याच गाठोडं बांधून भरल्या मनाने एक एक पायरी उतरत पायथा जवळ केला. गाळण्याच्या पायथ्याला एक टाकं आहे ज्यामध्ये किल्ल्याची छोटेखानी प्रतिकृती कोरलेली आहे, अस ऐकलं होतं, पण इथे कुणाला विचारल्यास नीट कुणालाच सांगता येत नव्हतं. नशिबाने त्या जागेचा फोटो असल्याने तो फोटो दाखवत त्या टाक्यापाशी गेलो, पण ते टाकं पूर्ण भरलेलं असल्याने आमची निराशा झाली.
१.पाण्याने भरलेलं टाकं २.रिकामं असताना खाली दिसणारी किल्ल्याची प्रतिकृती (फोटो आंतरजाल)
आश्रमाच्या दिशेने परत माघारी फिरून आश्रमाच्या बाहेरच एका टपरीत चहा नाश्ता उरकून आश्रमाच्या खोलीतून बॅगा उचलून गाडीत टाकल्या. मी तोवर आश्रमाचे व्यवस्थापक आणि विश्वस्त यांचे आभार मानून आम्ही पुढच्या मार्गाला रवाना झालो.एव्हाना घड्याळात साडेदहा वाजले होते.
गाळणा-डोंगराळे-टिंगरी-झोडगे असा पंचवीस किमीचा प्रवास करून झोडगे येथे पोचलो. मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव पासून तीस किलोमीटरवर असलेल्या झोडगे येथे भूमीज शैलीतील यादवकालीन शिवमंदिर आहे, माणकेश्वर मंदिर अस त्या मंदिराचं नाव.
माणकेश्वर मंदिर,झोडगे 
या मंदिराकडे पाहून तीन वर्षांपूर्वी पाहिलेल्या सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची आठवण झाली, फक्त सिन्नरच्या मानाने या मंदिराचा आवाका लहान आहे. बाहेरील नंदीचं दर्शन घेऊन पश्चिमाभिमुख द्वारातून मंदिरात प्रवेश केला. मुखमंडप, अंतराळ व गर्भगृह अशी त्रिदळ गर्भगृह असलेली मंदिराची रचना असून शिवपिंडीचा वारी मार्ग हा उत्तरेकडे आहे. शैव प्रकारातील मंदिर असल्यामुळे शिवाची विविध रूपे मंदिरात कोरलेली दिसतात.मंदिराच्या शिखरावर असलेलं किर्तीमुख हे देखील विशेष पाहण्यासारखं आहे. मंदिराभोवती फिरताना मंदिरावरील कोरीव काम बघताना हरवून जायला होत होतं.

मुख्य मंदिराच्या नैऋत्येस अजून एक मंदिर होतं जे की पूर्ण उध्वस्त केलेलं होत. त्या मंदिराच्या इतस्ततः पडलेल्या नक्षीदार शिळा हे मंदिर देखील किती सुंदर असेल याची प्रचिती देत होत्या.
उध्वस्त मंदिर 
नंदी
आजचा भटकंतीचा शेवटचा दिवस असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत काय होईल तितकं भटकून घ्यायचं आणि मग परतीच्या प्रवासाला लागायचं अस ठरलं होतं. गाळण्याची भटकंती कालच्या दिवसात झाली नाही आणि आजची सकाळ देखील गाळणा पाहण्यात गेली, त्यामुळे आज जी ठिकाणं होती त्यातल्या काहींवर पाणी सोडायला लागणार हे नक्की होतं. झोडगेचं माणकेश्वर मंदिर बघून आता पुढचा मोर्चा मालेगाव किल्ल्याच्या दिशेने वळवला. कल्पेशच्या एका मित्राने वाटेत एका हॉटेलवर पुरणपोळी छान मिळते अस सांगितलं होतं, मग काय कल्पेशने काल पासून लावलेल्या धोशा मुळे ते हॉटेल गाठून पुरणपोळी आणि दही खाण्यात पाऊणएक-तासांनी घडाळ्याचा काटा अजून पुढे ढकलला. इथे हॉटेलच्या मागे असलेल्या मंदिरातील नंदी एकदम देखणा होता. पुढे आता मालेगावचा किल्ला गाठताना शहराच्या मध्यवर्ती हा किल्ला असल्याने या किल्ल्यापर्यंत पोचणंच एक दिव्य असतं. गिरणा आणि मोसम नद्यांच्या संगमावर अठराव्या शतकात नारोशंकर यांनी या किल्ल्याची उभारणी केली. तिहेरी तटबंदी असलेल्या किल्ल्याची बाहेरची तटबंदी आणि खंदक किल्ल्याच्या बाजूला झपाट्याने वाढलेल्या वस्तीने केव्हाच गिळंकृत केला आहे.
मालेगावचा किल्ला 
सध्या किल्ल्यात शाळा भरते आणि त्यांच्या सोईसाठीच पश्चिमेची तटबंदी फोडून प्रवेशमार्ग केला आहे, आम्ही देखील याच बाजूने किल्ल्यात प्रवेश केला. मुख्य भुईकोटात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला तीन तोफा ठेवलेल्या दिसतात.
तटबंदीतील देवड्या 
तिथे असलेल्या काकांनी डावीकडची वाट बंद आहे उजवीकडे जा असं सांगितलं. उजवीकडे जाताना एका ठिकाणी तटबंदीत असलेल्या देवड्यांमध्ये स्वच्छतागृह केलेले दिसले. त्यांच्या वर देखील देवड्या दिसत होत्या त्यातील एका देवडीत पाण्याची टाकी ठेवली होती. पुढच्या दिशेने चालत किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीवर वर जाण्यासाठी सोपान होता, तिथून वर जाऊन फांजीवरून किल्ल्याचे वेगवेगळे भाग पाहू लागलो.
फांजीवरून चालत नैऋत्य बुरुजाकडे आलो येथील बुरुजात दर्गा बांधला आहे, तिथून अजून पुढे जाऊन पुन्हा माघारी आलो आणि किल्ल्याच्या आग्नेय टोकाकडे चालू लागले, इथे तटबंदीबर बंदुकांचा मारा करण्यासाठी जागोजागी केलेल्या जंग्या दिसत होत्या. मध्ये काही ठिकाणी कॉलेजच्या मुलांचा ग्रुप फोटोशूट करण्यात दंग होता. बुरुजावरील सुस्थितीत असलेल्या चर्या किल्ल्याच्या अभेद्य तटबंदीतील गोलाकार बुरुजाला नाजुकपणाचा साज चढवीत होत्या. या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्याचा घेरा नजरेत येत होता.
किल्ल्याच्या आत बांधलेली शाळेची इमारत, पलीकडे दिसणारे मनोरे 
ज्या बाजूची वाट बंद आहे तिकडे अजून भरभक्क्मम अवशेष असणार याची खात्री दुरूनच पटत होती. मुख्य म्हणजे जे दोन मनोरे दिसत होते, त्यात कधी जातोय असं झालं होतं. तटबंदीवरुन चालत जाऊ शकतो असं वाटलं होत पण पूर्वेकडच्या तटबंदीच्या भागातून पुढे जायला तटबंदी ढासळली असल्याने वाट नव्हती. आल्या पावली माघारी फिरून पायऱ्या उतरून खालून काही वाट आहे का बघू लागलो, पण तिथे देखील निराशा झाली. त्यात त्या काकांनी सांगितलं होत डाव्या बाजूला जायला वाट नाही, म्हणजे तो भाग आता फिरता येणार नाही, यामुळे जरा वाईट वाटत होतं. तरी देखील थोडस धाडस करून त्या माणसाच्या समोरूनच किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या दिशेने गेलो. शाळेच्या बाजूने जात उत्तरेच्या भागात आलो आणि एखाद घबाड मिळावं असा दरवाजा समोर आला. यातील लाकडी दरवाजा देखील व्यवस्थित होता. दरवाजातून बाहेर येऊन दरवाजाकडे बघताना उत्तराभिमुख असलेला दरवाजा, दरवाजावरील दोन्ही बाजूला असलेले कमळ पुष्प त्याच्या वर असलेली नक्षीदार पट्टी आणि त्याच्या वर असलेल्या तीन खिडक्या. दरवाजात बसवलेला लाकडी दरवाजा त्याला असलेला छोटेखानी दरवाजा सार काही इतिहासाची पाने पलटून भूतकाळात नेत होता.
सुस्थितीतील दरवाजा 
या दरवाजाच्या अलीकडे वर तटबंदीवर चढायला सोपान होता पण त्याच्या इथे लोखंडी गेट बसवून कुलूप लावला होता,त्यामुळे वर जाता येणार नाही हे नक्की झालं होतं.
दरवाजातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला अजून एक दरवाजा होता आणि हा दरवाजा काटकोनात वळून उत्तराभिमुख होत होता.या उत्तराभिमुख दरवाजातील एका बाजूच्या लाकडी दरवाजाचा अर्धा भाग अजूनही तग धरून उभा आहे.
महादरवाजा 
हा किल्ल्याचा महादरवाजा असल्याने याची रचना विशेषच होती. महिरपी कमान, नंतर वक्राकार आकारांची महिरपी कमान. त्याच्या बाजूला आणि वर असलेले कमळपुष्प आणि वर असलेलं फुल, त्याच्या वर असलेली नक्षीदार पट्टी. त्याच्यावर असलेल्या पुन्हा तीन खिडक्या. या तिन्ही खिडक्या महादरवाजाच्याच छोट्या स्वरूपातील कलाकृती असल्याचे कळत होते,अगदी त्यावरील फुलं सुद्धा. त्याच्यावर अजून सुद्धा दोन नक्षीदार पट्ट्यांच्या वर असलेल्या चर्या महाद्वाराच्या भरभक्कमतेची ग्वाही देत होत्या. त्याच्याही वरती दोन्ही बाजूंच्या बुरुजांवरील घुमटी लक्ष वेधून घेत होत्या, आठ खांबावर तोलू धरलेल्या या घुमटी दुरून मनमोहक दिसत होत्या, परंतु मागे जो कुलूप लावलेला गेट दिसला त्यावरून तिथे काही पोचता येणार नाही याची शाश्वती झाली होतीच. कित्येक वर्ष ऊन-पाऊस सोसून देखील हा दरवाजा आणि त्यावरील काम अजूनही व्यवस्थित होतं. या दरवाजाच्या बाहेर तटबंदीत अजून एक दरवाजा होता पण तो आता बांधून बुजवून टाकला होता.
मालेगाव शहराच्या मध्यवर्ती हा भुईकोट असल्याने आणि आजूबाजूच्या वस्तीमुळे किल्ल्याचं किल्लेपण किती बघता येईल याबाबत अगोदर साशंक होतो, पण त्या सर्व शंका-कुशंकांच उत्तर किल्ला बघताना मिळालं होतं. आल्या वाटेने माघारी फिरून जो मुख्य कोट आहे त्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी तटबंदी फोडून केलेल्या दरवाजाच्या बाहेर आलो. किल्ल्याकडे बघताना डाव्या बाजूने प्रदक्षिणेला सुरुवात केली. अवाढव्य आणि सुस्थितीत असलेली तटबंदी आणि जागोजागी असलेले गोलाकार बुरुज हे सारे दुर्गावशेष किल्ल्याच रांगडं रूप आमच्या सारख्या भटक्यांना दाखवत होतं .
किल्ल्याचे भरभक्कम बुरुज आणि तटबंदी 
इथे किल्ल्याच्या आवारात तिथली स्थानिक पोरं क्रिकेटच्या खेळात रमली होती. त्यांच्या कोलाहलापासून दूर होत किल्ल्याच्या मागच्या म्हणजेच पूर्व भागात आलो, उजवीकडे मुख्य भुईकोट आणि त्याची अवाढव्य तटबंदी तर डावीकडे दुसरी तटबंदी होती, या तटबंदीत जागोजागी कोनाडे केले होते, ते कशासाठी हे काही समजलं नाही, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तटबंदीत असलेले कोनाडे पाहण्याची हि पहिलीच वेळ होती.
तटबंदीतील छोट्या देवळ्या/कोनाडे 
किल्ल्याचा आवाका छोटा असल्याने आणि काही भागात जाता न आल्याने पाऊण तासात पूर्ण किल्ला फिरून झाला.
घड्याळात दोन वाजून गेले होते. अपेक्षित वेळेच्या पुढे सरकलो होतो, त्यामुळे पुष्करने आता गाडी कुठेच थांबणार नाही याची तंबी देत गाडीचं सारथ्य स्वतःच्या हातात घेतलं, यावर अलंकार आणि मी एकमेकांकडे फक्त बघत राहिलो, कारण कौळाने येथील राजवाडा आणि चांदवडचं रेणुका माता मंदिर आणि अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा यावर पाणी सोडाव लागणार आता हे आम्हाला पुरतं कळलं होतं. तरी देखील गाडीत चकाट्या पिटताना आम्ही चांदवडच्या मंदिराबद्दल बोलत होतो, आपण चाललोय त्याच रस्त्याला लागूनच मंदिर आहे, या अशा गोष्टी आम्ही करत होतो आणि त्याचा फायदा झाला. पुष्करने मंदिर जवळ आलं की सांग रे अस म्हटल्याबरोबर मी त्याला डायरेक्शन सांगून मंदिराच्या प्रांगणात दाखल झालो सुद्धा.
रेणुका माता मंदिर,चांदवड 
मागे फेब्रुवारी महिन्यात सातमाळा रांगेतील रेंज ट्रेक करताना हे मंदिर पाहिलं होतं त्या जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. मंदिराबद्दल देखील तेव्हा लिहिलं आहे, त्या भटकंतीचा ब्लॉग वाचण्यासाठी खालील दुव्यावर जा...
घड्याळाकडे जरा कानाडोळा करून चांदवडच्या मंदिराचं दर्शन घेतलं होतं. आता मात्र पुष्करने लवकर घरी पोचायचं आहे असं म्हणत जणू काही आम्हाला धारेवरच धरलं, जेवायला पण आता थांबायचं नाही, अस त्याने सांगितलं. आम्हाला देखील त्याचं म्हणणं मुकाट्याने ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. शांतपणे गाडीत बसलो आणि घराच्या दिशेने मार्गस्थ झालो. चांदवड सोडून नाशिक सोडून नंतर अर्ध्या पाऊण तासात एका हॉटेल वर पुष्कर थांबलाच. पोटातल्या आतड्यांना मटण-चिकनची आहुती देऊन त्यांची शांती केली आणि मावळतीला जाणाऱ्या दिनकाराच्या साक्षीने खऱ्या अर्थाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. चार दिवसांसाठी अगोदर कित्येक दिवस चालू असलेली तयारी-फोनाफोनी सार चित्र डोळ्यात तरळत होतं. नव्या भिडूंच्या सोबत बिष्टा,कऱ्हा,अजमेरा,दुंधा, कंक्राळा, लळींग, सोनगीर, गाळणा,मालेगाव भुईकोट हे किल्ले तर देवळाणे येथील जोगेश्वरी शिल्प मंदिर, झोडगेचं माणकेश्वर मंदिर आणि चांदवडचं रेणुका माता मंदिर ही मंदिरं एवढा सारा आठवणींचा पसारा घेऊन ही बागलाण भ्रमंतीची वारी सुफळ-संपूर्ण झाली. ओंकार ओक आणि स्वप्नील खोत यांनी प्लॅनिंग साठी केलेली मदत, महत्वाचं म्हणजे ओंकारने फोर्सफुली सांगितल्यामुळेच लळींग आणि सोनगीर हे अधिकचे दोन किल्ले देखील एकदम योग्य वेळेत झाले. प्रत्येक ठिकाणी भेटलेली माणसे देखील मनात कायम घर करून गेली. लॉकडाऊन नंतर चार दिवस सह्याद्रीच्या कुशीत कसे गेले कळलं देखील नाही. कळव्याच्या इथे सुशांतला निरोप देऊन पनवेल गाठलं. पुष्करचा निरोप घेऊन मला देखील रात्री दहा वाजता घराजवळ सोडून अलंकार आणि कल्पेश त्यांच्या घराकडे रवाना झाले. ट्रेक ठरवल्यापासून त्याची प्लॅनिंग आणि केलेलं प्लॅनिंग सगळं वेळेत बसवून अंमलात आणण यापेक्षा जर मोठी कोणती जबाबदारी असेल तर ती ही. हो हीच! हे चार दिवसांचं सार काही शब्दबद्ध करून ब्लॉग स्वरूपात मांडणं. ट्रेक वरून आल्यापासून मागचे चार आठवडे याच व्यापात अडकलो होतो. आणि अखेर हा महायज्ञ आज तडीस गेला. फोटो क्रेडिट : अलंकार म्हात्रे, पुष्कर घरत आणि स्वतः अस्मादिक कसा वाटतोय ब्लॉग तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून जरूर कळवाच, हेच काय ते तुम्हा सगळ्यांपुढे मागणं. कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळेच अजून नवनवीन ब्लॉग लिहिण्याची उर्मी मला मिळत राहील. समाप्त.

धन्यवादसह्याद्रीचा भटकभवान्या(विशाल पाटील)


















No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...