http://narendralakhan7.blogspot.com/
गोष्ट एका पाहुणचाराची - १२. १२ . २०१९
 |
| पहिल्या रात्रीचे जेवण - म्हाडंलाईवाडी |
पन्हाळा ते म्हाडंलाईवाडी (१८ किलोमीटर) -
पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकचा पाहिला
दिवस होता. त्यादिवशी किमान २० किलोमीटर चालून आंबेवाडीमध्ये मुक्काम
करायचा असे ठरले होते. रणरणत्या उन्हात म्हसाई पठार पार करून आम्ही
थोड्या सावलीत जेवण केल. हनुमान सरांनी ४० ठेपले आणले होते. त्यावरच
ताव मारून पेटपूजा केली. पुढे चालणे थांबवले नाही. चालत चालत संध्याकाळी
चार वाजले. आता मात्र अंगातील त्राण संपले होते. खोतवाडीमध्ये
आल्याबरोबर (१५ किलोमीटर पार) संदीपची अवस्था पुढे काही मिनिटे
चालण्यापुरती राहिली होती. असे असताना देखील त्याला धीर देत देत
आंबेवाडी झाली नाही तरी करपेवाडीला तरी पोहोचायचे असा ठरला. पण सूर्यास्त
झाला आणि काळोख दाटू लागला. आम्ही रस्ता सोडून मळ्यातून चालू लागतो.
वाट सोडून जातोय हे समजल्यावर अजूनच चीड चीड होत होती. अंधार पडू
लागल्यावर पुढे जाणेही थोडं जिकरीचे वाटू लागले. मग धवल, अमरेश आणि
अभिनवने मिळून ठरवले की आपण येईल त्या वाडीत मुक्काम करायचा. समोरच एक
वाडी दिसली. वाडीचे नावं होते म्हाडंलाईवाडी !
 |
| म्हाडंलाईवाडीमधील गोंडस मुलं |
म्हाडंलाईवाडी -
काळोख दाटला होता. दुरूनच घराबाहेरचे
दिवे दिसू लागल्यावर थोड बरे वाटू लागले होते. आमची चाहूल लागल्यावर
दुरूनच कुत्री भुंकायला लागली. असले स्वागत अपेक्षित होतेच. एका मोठ्या
घराच्या कडेकडेने चालत आम्ही वाडीत आलो. आठ नऊ घरांची सुखवस्तू वाडी.
वाडी मध्ये एक मंदिर, आजूबाजूला माळरान, शेती आणि एवढ्या उंचावर डिसेंबर
मध्ये ही मुबलक पाणी असल्याने आजच्या वस्ती साठी उत्तम जागा वाटली. एका
घराच्या ओसरीवर सर्वांनी आपल्या अवजड बॅग्स टाकल्या आणि तसेच बॅग्स वर
लोटून गेलो. तेवढ्यात लहान मुलं आमच्या भोवती जमा झाली. अमर आणि
महेशने चॉकलेट दिल्याने सर्व खुश झाली. वाडीला ट्रेकर्स लोकांची सवय
असावी. गावातील काही प्रौढ व्यक्तींनी आमची विचारपूस केली. त्यांच्या
चेहऱ्यावरचा आनंद आणि आमच्या प्रतिचा आदर पाहिला की मन सुखावत होते.
सचिनने राहण्यासाठी चौकशी केली. तेथील गावकऱ्यांनी मोठ्या दिलाने
मंदिरामध्ये रहा असे सांगितले. एका शाळकरी मुलाने मंदिराचे दरवाजे खुले
करून दिले आणि आम्ही अवाक झालो !
 |
| शिवमंदिर - म्हाडंलाईवाडी |
शिवमंदिर -
मंदिर खुले केल्यावर अवाक होण्याचे
कारण त्या मंदिरात फक्त शिवरायांची मूर्ती होती. अविश्रांत परिश्रम घेऊन
आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य
वेचले. अश्या युगपुरुषाचे दर्शन घेतले. वास्तव्यही अश्या पावन मंदिरात
व्हावे या सारखे भाग्य नाही. मंदिर साधे सुधे होते . गाव जेवणाची काही
भांडी आणि मंदिर अजून सुसज्ज करण्यासाठी लागणारे काही सामान मंदिरात होते.
सर्वांनी आपल्या बॅग्स नीट लावून थोडी विश्रांती घेतली. वाडीतील
लोकांच्या आत्मीयतेनमुळे रहाणायचा प्रश्न सुटलेला होता. आता पोटापाण्याचा
प्रश्न सोडवण्यासाठी सचिन मंदिरा बाहेर पडला.
 |
| पाऊल ट्रेकर्स त्या २ शाळकरी मुलांसोबत |
मार्गशीर्षाचा गुरुवार आणि चहा -
तो दिवस मार्गशीर्षाचा गुरुवार होता.
वाडीतील महिलांची पोथी वाचण्याची वेळ झाली होती. एक काका म्हणाले पोथी
वाचून झाली की तुमची सर्व व्यवस्था समोरच्या घरात होईल. त्या घराकडे बोट
दाखवून ते पुढे निघून गेले. सचिन ने त्या घरी सांगून चहा आणि जेवणाचा
सर्व बंदोबस्त केला. मंदिरात गप्पा मारतानाच २ शाळकरी मुलं चहाचे २
ट्रे घेऊन आली. मुलं आमच्या कडे कुतूहलानं पहात होती आणि आम्ही चहा कडे !
मुलं खूप सुजाण आणि लाजरी बुजरी वाटली. त्यांसोबत गप्पा मारता मारता
चहा कधी संपली हे समाजाला नाही. त्यांनतर गुरुवारचा प्रसाद मुलांनी
आणला. तो इतका छान होता की आम्ही परत परत मागवून खाल्ला. खाण्यासाठी तसें
आम्ही निर्भीड माणसे. लाज नावाची चीझ आमच्यात खाण्याच्याबाबीत तरी नाही.
बाहेर थंडी वाढत चालली होती. आणीबाणीच्या वेळेस वाडी मिळाली नाही तर
आजूबाजूची लाकडे गोळा करून चुलीवर जेवण बनवायचं असे ठरले होते. पण पहिल्या
दिवशी रात्री जेवणाची सोय एका काकूंनी केली म्हणून आम्ही आणलेले सर्व
सामान विग्नेशा आणि वैशाली ह्यांनी त्या काकूंना दिले. पण खास गावचा भात
आणि त्यांच्या पद्धतीत जेवण करा असा आम्ही आग्रह धरला.
 |
| रात्रीचे जेवणं |
रात्रीचे जेवणं -
सर्व हात पाय धुवून काकूंच्या घरी
पोहोचालो. शेणानी सारवलेल्या जमिनीवर बसून त्यांकडे गप्पा मारत होतो.
आत मराठी मालिका चालू होती. काकूंच्या घरातील महिलामंडळींची लगबग सुरु
होती. आम्ही एकूण ११ जण होतो. आणि अचानक समोर जेवणाचं ताट आले. आम्ही
लगेच ताव मारला.जेवणं तर अतिशय चविष्ट झाले होते. कधी नव्हे तर त्या
दिवशी ३ वेळा भात घेऊन संपवला. काकूंचे आणि घरातली सर्व मंडळींचे आम्ही
आभार मानले. अजून एक उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे ते सर्व कुटुंब
उपवास असल्याने आमच्यानंतर जेवलं. ह्या गोष्टी खूपच भावल्या.
त्यांच्याकडून आदरातिथ्य शिकण्यासारखे होते. त्या दिवशी आम्हाला लगेचच झोप
लागली. पहाटे वाडी मधून लवकर निघावे लागणार होते .
 |
| पंगत |
पाहुणचाराचा अनुभव -
सह्याद्रीच्या पाहुणचाराला तोडच नाही.
कुठेही जा, सह्याद्री जसा तुमची काळजी घेतो तशीच सह्याद्रीच्या कुशीत
राहणारी माणसेही तुमची काळजी घेतात. आपापल्या परीने ते तुमची मायेने
विचारपूस करतात. काही ना काही तुम्हाला देत असतात. कधी चहा.. कधी
कांदेपोहे.. कधी अस्सल गावातील जेवण ते देऊ करतात. त्यामागे त्यांची काही
अपेक्षा नसतें. त्यांना त्याचा मोबदला दिला तर कधी घेतात तर कधी घेतही
नाही. त्यांचे अंगण ते आपल्यासाठी खुलं करतात. कधी घरात तर कधी मंदिरात
आपली सोय करतात. तुमची सरबराई करणायचा प्रयत्न ते करतात. आम्ही दिलेले
सामानही त्या काकू सकाळी आम्हाला परत देत होत्या. "तुम्हाला पुढच्या
प्रवासाला लागेल" असे त्या मायेने म्हणाल्या. अशी वाक्य त्यांच्या
मनाच्या श्रीमंतीची जाणीव आपल्याला करून देत असतात. गावातील लोकांचं जीवन
साधे सुधे असतें. त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या मनाची श्रीमंती तुमचं मन
लगेच जिंकून घेते. पुढील प्रवासासाठी जेव्हा ते "जपून जा " असे म्हणतात
तेव्हा पाहुणेपणाची भावना गळून पडते. ट्रेक करताना असे अनुभव आम्हाला
माणूस म्हणून प्रगल्भ करत असतात.
 |
| शिवाजी महाराज |
 |
| सेल्फी टाइम |
 |
| पावनखिंडीकडे जाताना |
फोटो साभार - विग्नेशा पटेल आणि सचिन लांडे
लेखन -
नरेंद्र रविंद्रनाथ लाखण.
No comments:
Post a Comment