Sunday, December 1, 2024

घोडजीन उर्फ उडीदकणा

http://ahireyogesh.blogspot.com/2023/02/ghodjin-udidkana.html
          नित्य नुतन हिंडावे ! हे मनाशी धरून मागे काही दिवस सुरू असलेला रिपीट मोड चा सिलसिला बंद केला. 
घोडजीन घाटवाट अनेक वर्ष विश लिस्ट मध्ये होती, खास करून भोरप्या नाळेच्या ट्रेक वेळी हिच घोडजीन आम्हाला काही सापडली नव्हती.
तेव्हा पासून हा पिच्छा सुटत नव्हता. यंदा काय तो निकाल लावायचा हे ठरवून टाकले. सकाळी नऊ वाजताची लोणावळा भांबर्डे एसटी तशी रिकामीच मिळाली. मास्तर कडून दोन फुल एक हाफ तिकीट घेतले. तासाभरात सालटर खिंड पलीकडे तैलबैला फाट्यावर उतरलो. 
एसटी पुढे लाल मातीचा धुरळा उडवत निघून गेली. आम्ही फाट्यावरून तीन चार किमीची चाल करत तैलबैला गाठले तेव्हा अकरा वाजून गेलेले. 
गावातल्या आधीच परिचयाचे असलेले रोकडे यांच्याकडे घोडजीन वाटेबद्दल विचारणा केली. अशा आडनीड वेळी जो तो आपल्या कामाला निघून गेलेला दोन चार म्हातारी सोडली तर कुणीच नव्हतं. नाही पूर्ण सोबत तर किमान वाटेची सुरूवात दाखवायला तरी कुणी यावं जेणे करून वेळ वाचून पुढची चाल सुसह्य होईल. रोकडे मावशींनी एक दोघांना विचारून प्रयत्न करून पाहिला पण नाही जमलं शेवटी अर्धा तास घालवून चालू पडलो. 
      सवाष्णी, वाघजाई घाट वेळी, भोरप्या नाळ तसेच आधी तैलबैला पहाण्याच्या व कॅम्पिंग निमित्ताने तैलबैला भागात अनेकदा येणं झालं आहे. त्यामुळे टेरेन तसा अगदीच नवखा नाही सोबत मॅप स्टडी इतर खाणाखुणा लक्षात होत्याच. तैलबैलाला डावीकडे ठेवत निघालो वाटेतली शेत कुंपण पार करत पिवळ्याधम्मक गवताळ पठारावर आलो. 
         घोडजीन घाटाची सुरूवात सवाष्णी घाटाच्या डाव्या बाजूला आहे. सवाष्णी घाट आधी केला असल्याने दिशेचा अंदाज होताच. 
       मावळातील तैलबैला मधून पुरातन वापरातील दमदार वाटा कोकणातील पेडली कोंडगाव (वारसदारघाट) ठाणाळे नाडसूर (वाघजाई घाट) बहिराम पाडा धोंडसे (सवाष्णी घाट) पाच्छापूर ठाकुरवाडी (घोडजीन घाट) पाच्छापूर ठाकुरवाडी (भोरप्या नाळ) या भागाला जोडतात. तर याच तैलबैला लगत जो घनगड, केवणी, आसनवडी ते हिरडी पर्यत चा घाटावरचा भाग आहे. तेथून केवणीतून पाच्छापूर ठाकुरवाडी (नाणदांड घाट) केवणी ते खडसांबळे (नाळेची वाट) केवणी ते नागशेत व्हाया खडसांबळे लेणी (घोणदांड घाट) केवणी घनगड ते कोंडजाई (आमराईची वाट) घुटके आसनवडी ते नागशेत (डेऱ्या घाट) पुढे हिरडी ते कोंडजाई नेणवली नागशेत (आवळीची वाट व गाढवलोट घाट) हिरडी ते भिरा (भिर्याची वाट / खजिन्याची वाट) या झाल्या तैलबैला ते आसनवडी व हिरडी भागातून कोकणपट्ट्यात जोडणाऱ्या प्रचलित वाटा. हा सारा कुंडलिका खोऱ्याचा एक भाग. यादी सावळ घाट, लेंड घाट ते ताम्हिणी पर्यंत वाढत जाईल. प्राचीन काल अगदी सातवाहन पासून राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहिमनी ते अगदी शिवकाल व ब्रिटिश अंमल पर्यंत संदेशवहन, दळणवळण, आदीम व्यापार परत्वे राजसत्तेसाठी लागणारा पैसा मिळत असे. या भागापुरतं बोलायचं झाले तर कुंडलिका व अंबा नदीच्या खोऱ्यात माल उतरून तो या वर उल्लेख केलेल्या घाटमार्गानी देशावर नेला जाई. मग संरक्षण साठी ठिकठिकाणी पहारे चौक्या व काही दुर्ग बांधले गेले. तैलबैला, घनगड व सुधागड याच वाटांचे पहारेकरी.असो.... तर स्थानिक, आदिवासी, ठाकरं, कातकरी ही मंडळी अजूनही याच वाटांनी येजा करतात.
       पिवळ्याधम्मक गवताच्या पठारावरून पाऊण तासात दरी कडेला आलो. घाटाची साधारण सात आठशे मीटर ऊंची असेल. 
समोर लहान लहान तिवई सुळक्यांनी सुधागड सुटावलेला. पश्चिमेला पालीचा सरसगड तर पूर्वेस घनगड व मारठाणाचा डोंगर तर ईशान्येस म्हतोबा डोंगर ते हिरडी पर्यतची रांग. निरभ्र आकाशात दूरवरचा आसमंत खासा नजरेत येत होता बराच वेळ ते सारं पाहत राहिलो. उतराईला वाट शोधायची या विचाराने भानावर आलो. सवाष्णी घाट ते सुधागड हा भाग समोर ठेवत क्रेस्ट लाईन धरून चालू लागलो. एके ठिकाणी वाट शोधायच्या नादात गवताखाली लपलेला दगड लक्षात न आल्यामुळे माझा डावा पाय जोरदार मुरगळा. मोठ्याने विव्हळत कण्हत तसाच जागेवर बसलो. प्रशांत ने धीर देत जवळील झाड्याच्या सावलीत बसवले. वेदना कमी होई पर्यंत तसाच शांत बसून राहिलो. गुळ चिक्की, खजूर पाणी घेतल्यावर जरा बरं वाटू लागले. चालताना पाय दुखत होता पण तूर्तास तरी सहन होण्याइतपत. दृढनिश्चय आत्मविश्वास जोरावर निघालो. 
      सुधागड सामोरा असताना कड्यावरून एक निमुळती धार तिवई सुळके त्या खाली असलेल्या खिंडीत उतरलेली दिसली हिच खिंड पार केल्यावर केवणी व सुधागड या मध्ये असणाऱ्या नदीकाठावरून चालत पाच्छापूर ठाकुरवाडीत जाता येईल. 
बहुतांश अरूंद तीव्र उतरणीच्या त्या धारेवर होत नव्हतं ते पण गवत जाळून टाकलेले, एकदम काळं ठिक्कर पडलेलं. नीट निरखून पाहिल्यावर धारेवरील बारीक पायवाट नजरेत आली. हिच असणार घोडजीन घाटवाट मागच्या वेळेस चुकामूक झाली होती, तेव्हा ठाकुरवाडीतील गावकरी याच वाटेला उडीदकणा म्हणत होते तर आता मघाशी रोकडे मावशी सोबत घोडजीन बद्दल बोलत असताना एक म्हातारी कण्यानं उतरणार काय असंही म्हणाली. थोडक्यात गावकरी त्या निमुळत्या धारेला घोडजीन व्यतिरिक्त उडीदकणा /कण्याची वाट असेही म्हणतात. अनिरुद्ध ने ही वाट आधी केलेली, खात्री करुन घेण्यासाठी त्याला फोन लावला. जसे दिसत होते अगदी तसेच वर्णन केले, फोनवर काय ते तो समजून गेला. माझा अंदाज बरोबर ठरला अनिरुद्ध ने ग्रीन सिग्नल देत बरोबर माहिती दिली. आता वाटेची ओपनिंग शोधणं फारसं कठीण गेलं नाही. तिथल्या अगदीच विरळ झाडीतून खालच्या बाजूस उतरत धारेवर आलो. 

सुरूवातीपासून गवत जाळलेले. पायाचे दुखणे लक्षात घेता उतरण जमेल ना सहज मनात येऊन गेलं. प्रशांत व त्याचा मुलगा बाळू सोबत होता. काठीचा आधार घेत उतराई सुरू केली. सावकाश सावधगिरी बाळगत उतरू लागलो. तीव्र उतरण त्यात दोन्ही बाजूला दरी. आधाराला कसली सोय नाही, भरीस भर वाटेवर मुरूमाचा घसारा थोडक्यात स्क्री पण होताच. 
ऐरवी फारसं अवघड नसतं तरी आता दुखावलेल्या पायामुळे सांभाळावं लागत होतं. एक दोन ठिकाणी लहानसे कातळटप्पे पार करत तासाभरात ती नाळ उतरून तिवई सुळक्याच्या पायथ्याशी असणाऱ्या खिंडीत आलो. 
या पूर्ण वाटेवर उतरताना सुधागड, केवणी व सरसगड चे होणारे दर्शन सुखावणारे. 
घड्याळात पाहिलं तर पावणेतीन वाजून गेलेले. पाच्छापूर ठाकुरवाडीतून साडेतीन व पाच वाजताची पाली एसटी आहे असे माहीत होते. वेळ पाहता साडेतीन तर नाहीच पण लहान बाळू आणि पाय प्रकरण लक्षात घेता पाच च्या एसटीची पण शाश्वती नाही. कारण आम्ही होतो ती खिंड चढून पल्याड उतराई मग नदीकाठाने ऊंच सखल भागातून वाटचाल करत ठाकुरवाडी गाठणं यात किमान अडीच तीन तास सहज लागणार. हा अंदाज घेत एसटी हुकली तर पाच्छापूर ठाकुरवाडीतून बाहेर पडणं अवघड होणार. मग आम्ही थेट खिंडीतून नाळेत जात धोंडसे बाजूला उतरणं ठरवलं. जेणेकरून धोंडसे किंवा पुढच्या फाट्यावरून नाडसूर ठाणाळे कडून येणारे वाहन मिळण्याची शक्यता जास्त. फार वेळ न दडवता नाळेतून उतराई सुरू केली. पश्चिम दिशा असल्याने समोरच सुर्यराव असणार होते. घामटा निघून पार कपडे काचू लागले. शरीरातील मीठ कमी झाल्याचा परिणाम अधून मधून पायात क्रॅम्प येऊ लागले. आधीच मुरगळलेला पाय त्यात भर म्हणजे हे क्रॅम्प.अल्प घटकेचा थांबा, तोंडात काहीतरी टाकून घोटभर पाणी मग चले चलो.
     भर दुपार झालेली नाळ तापलेली, उतराई ला आधार घेत असताना मोठ्ठाले दगड धोंडे हात लावताच चटके बसत. त्यावरून उड्या टाकत पुढे सरकत होतो. 
नाळेच्या अगदी सरळ रेषेत मावळतीला धोंडसे कडील वस्ती नजरेत येत होती. 
सरळ क्रो फ्लाय डिसटंस घेतलं तर दोन अडीच किमी पेक्षा जास्त नसावं पण तिथवर पोहचणं मात्र साधं सोपे नसणार हे माहित होत. नाळेत काही ठिकाणी मोठे टप्पे येत मग उजवी डावी अगल बगल देत जाणं सोयीस्कर. माझा पाय दुखावलेला त्यामुळे मला तरी वेळ लागत होता. 
एक जमेची बाजू म्हणजे, नाळेत त्यामानाने झाडोरा चांगलाच होता त्याचा परिणाम कोकणात उतरत असताना ही समोर सुर्य असताना सुध्दा फारशी दाहकता जाणवत नव्हती. वाटेतली मोठाली गगनभेदी झाडे. हिरडा,पळस,आंबा, सावर, अंजण खास लक्षात येत होते. एका ठिकाणी तर वाटेत दाट वेली व करवंदाच्या जाळ्या सरळ जाणं शक्य नाही मग नाळेबाहेर येत उजवीकडून कारवी व काटेरी झुडूपातून घुसखोरी केली. काही अंतर जात पुन्हा मुख्य ओढ्यात त्या वस्पटीतून वाट काढत उतरलो. आता नाळ रुंदावत ऊतार कमी झाला. खालच्या पातळीत मोठ्या कातळावर मोकळवनात आलो. 
या ठिकाणी पाण्याची बारीक वाहती धार तसेच दोन चार खळगी स्वच्छ पाण्याने भरलेली. तोंड हात धुवून जरा बरं वाटलं. अशा भर रानातल्या ओढ्यात पाण्याची अशी शांत निवांत जागा, घटकाभर विश्रांती घेतली. बाजूला नजर फिरवली तर चूल मांडलेल्याची खुणा सोबत दोन चपटी. बहुदा कुणीतरी शिकारीसाठी येऊन कार्यक्रम केला असावा. कणा उतरल्यापासून खिंडीतून खाली नाळेतून आता पर्यंतच्या प्रवासात आम्हाला या पहिल्या मानवी अस्तित्वाच्या अशा खुणा मिळाल्या ... काय बोलावे !  
ओढ्यातून उजवीकडे मळलेली पायवाट वरच्या बाजूस जाताना दिसली ती धरून जात राहिलो. सुधागड आता आमच्या डाव्या बाजूला मागे पडू लागला. खरंतर ओढा धरून सरळ उतराई असती तर बराच वेळ वाचला असता पण समोरची धोपट वाट सोडणं योग्य नव्हते. लहानसा चढ पार करून वरच्या पदरात आलो. 
समोर सवाष्णी घाटाची सोंड दिसली. त्याच दिशेने जात पुढे जाऊन ओढा पार करून U मारला. आता मात्र योग्य ट्रॅक वर आहोत हे कन्फर्म झाले. आधी सवाष्णी घाटाच्या वेळी धोंडसे कडून सुरूवात करत मुख्य चढ चुकून मी याच भागात आलो होतो, त्यामुळे माझ्या ते चांगल लक्षात राहिलं. 
आता होती ती सरळ मैदानी चाल आजूबाजूस ढोरवाटा भरपूर पण मुख्य पायवाट हेच डोक्यात फिट्ट. अर्ध्या पाऊण तासानंतर उजवीकडे खाली बहिराम पाडा कडील घरं दिसू लागली. बहुदा गावात भजनी सप्ताह वगैरे असावा लाऊडस्पीकर ऐकू येत होतं. वारा जसा वाही तसा आवाज कमीजास्त होई. शेवटची उतराई करत सहाच्या सुमारास धोंडसे गावात आलो. फ्रेश होऊन गाडीची चौकशी केली असता. साडेसहा वाजता नाडसूर फाट्यावरून पाली एसटी आहे हे समजले. अर्ध्या तासात फाट्या पर्यंत या अवस्थेत मला तरी जमणं अवघडच. सकाळी तैलबैला फाट्यावरून ते धोंडसे पर्यत घाट उतराई धरून पंधरा किमी चाल झालेली. 
छोटा बाळू पण दमलेला तरी फारसं कुरकुर न करता तो चालला हे विशेष. एका बाईक वाल्याने फाट्या पर्यंत सोडले. एसटी वेळेत आली मग पालीला उतरून सौरभच्या गाडीतून परतीचा प्रवास सुरू केला.. 
        घोडजीन उर्फ उडीदकणा हा माझा मागच्या वेळेस राहून गेलेला घाट अशा रितीने पूर्ण झाला. आम्ही नियोजन नुसार फक्त उतराई केली पण सोबत माहितगार नसल्याने थोडा वेळ जास्तच गेला अर्थातच विना गाईड भटकताना ते गृहीत धरूनच चालावं लागते. वाट चुकण्यातही मजा मग आपणच योग्य वाटेला शोधणं हे पण तितकेच गमतीदार. जरी दमछाक झाली तरी मिळणारं समाधान काही औरच.. ही ब्लॉग पोस्ट लिहीत असतांनाही पाय पूर्णपणे बरा झालेला नाही, अजूनही सुज आहेच. मी कितीही नाही ठरवलं पण तरीही येणारा बुधवार हा मला पुढच्या विकेंड ट्रेकचा विचार करायला भाग पाडणार तोवर मला खात्री आहे तो व्यवस्थित बरा झालेला असेल. कारण एकच सह्याद्रीचा अनाद्यनंत मोह !  असो....
        घाटवाट प्रेमी ट्रेकर मंडळींनी व्यवस्थित नियोजन केले तर या घाटाला जोडून सवाष्णी घाट अथवा भोरप्या नाळ असा चांगला ट्रेक करता येईल. 

                                                    योगेश चंद्रकांत अहिरे

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...