Sunday, December 1, 2024

नवरीची वरात Navri pinnacle climbing by Nisargmitra panvel

 http://sahyadrichabhatakbhavanya.blogspot.com/

           निसर्गमित्र, पनवेल परिवारासोबत आतापर्यंत बऱ्यापैकी डोंगरदऱ्यात भटकंती झाली होती, त्यामुळे त्या सर्वाना मी आणि मला ते चांगलेच परिचयाचे झाले होते, एक नवीन कुटुंबच मला मिळालं होत. ट्रेकींग,भटकंती,श्रमदानासोबत क्लाइम्बिंग करण्याची संधी चालून आली. 
नवरी सुळका 
           पहिलीच मोहीम ठरली climbers च माहेरघर समजल्या जाणाऱ्या  माहुली परिसरात, माहुली बद्दल सांगायचं झाल्यास  गिर्यारोहकांसाठी हे ठिकाण खूप आकर्षणाचं आणि आव्हानात्मक आहे, माहुली परिसरात ४० पेक्षा जास्त सुळके आहेत. त्या सुळक्यांपैकी आम्ही एक लगीनघर निवडलं होत, लगीनघर म्हणायचं कारण म्हणजे आम्ही निवडलेल्या भागातील सुळक्यांची नावे होती नवऱ्याची करवली, भटोबा, नवरी,नवरीची करवली आणि माहुली बाण. यापैकी आमचं ध्येय होत नवरी सुळका सर करण्याचं ,तसेच नवीन आणि उत्साही संघ सहकाऱ्यांना एक संधी मिळण्याच. या नवरीला मुंडावळ्या बांधण्यासाठी वऱ्हाडी होती राम पाटील (लीड क्लाइंबर), विश्वेश महाजन(क्लाइंबर), राहुल खोत (क्लाइंबर), अक्षय गायकर(बेस कॅम्प लीडर), श्रीरंग मोडक(फोटोग्राफर), प्रागवंश पाटील(फोटोग्राफर), विशाल पाटील, ऐश्वर्या पवार, अक्षय देशमुख, जय मानकामे. ३ डिसेंबरला संध्याकाळी टीम  पनवेल हुन निघून, पायथ्याचा माहुली गाव गाठून रात्रीच वरती चढायला सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशी ४ डिसेंबर रविवारी सकाळी क्लाइंबिंग चालू असा बेत आखला होता. विश्वेश ने तर अगोदरच सांगूनच ठेवलं होत सह्याद्रीत मोहिमा करायच्या तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोड सॅक मारायची प्रॅक्टिस झाली पाहिजे. शनिवारी रात्री नऊ वाजता सगळे जमलो मस्त सगळी उपकरणे,हत्यारे आणि बाकी सामान बॅग मध्ये भरत अंदाजे वीस-बावीस किलो वजन बॅगमध्ये भरलं होत.रात्री दहा वाजता निघून पनवेल-कल्याण-माहुली अंतर कापत दोन वाजता आम्ही माहुली गावात गुरूच्या (आमच्या हक्काच्या) घरात पोहोचलो.  गुरु आणि विश्वेशच्या बोलण्यावरून असं ठरलं कि आता थोडा आराम करून साडेतीन ला निघायच आणि वर एका पाण्याच्या ठिकाणी पोचून उजेड होईपर्यंत  थांबायचं, नंतर पुढची वाट काढायची. गुरूच्या इथे आमच्या अगोदर आम्ही गिर्यारोहक, डोंबिवली ही  टीमसुद्धा त्यांच्या मोहिमेसाठी आली होती.

           तासभर विश्रांती घेऊन दोनही टीम मध्यरात्री तीनला उठून तयारीला लागली, गुरूने  आम्हा सगळ्यांसाठी चहा आणला, आणि वहिनींनी आम्हाला दुपारच्या जेवणासाठी शिदोरी म्हणून ठेचा आणि भाकरी बांधून दिल्या. चहाचे घोट घेत डोळे चोळत पाणी वगैरे नीट भरून ३:४० ला आम्ही गुरूच घर सोडलं. गुरूशिवाय माहुलीत फिरणं अशक्यच आणि मागील दोन वर्षात भटोबा आणि नवरीच्या खिंडीत जाणाऱ्या पायवाटेने कोणीच फिरकल नव्हतं, असं गुरूने सांगितलं. त्यामुळे आम्हाला आता हा रस्ता पुन्हा नव्याने खुला करत वाट काढत आम्हाला पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचायचं होतं(हा पाण्याच्या साठा फेब्रुवारीपर्यंतच असतो). पाठीवर लोडसॅक, डोक्याला हेडटॉर्च, अंधाऱ्या रात्री, चांदण्या प्रकाशात आमची अकरा जणांची पायपीट चालू होती. वाटेला लागल्यावर सुरुवातीची वाट बऱ्यापैकी मळलेली होती, पाऊण-एक तास चालल्यावर आमच्या वाटेपासून दोन-तीन फुटांवरच एक दहा-बारा फुटी अजगर आम्हाला दिसला, आतापर्यंत जे काही ट्रेक केले होते, परंतु रानात असा अजगर पहिल्यांदाच पाहायला मिळाला, आणि त्यातही तो गुरुलाच दिसला, म्हणजे जर गुरु नसता तर एखाद्याचा तरी पाय त्याच्यावर पडलाच असता, पण ऐनवेळी सगळ्यांचे कॅमेरे आत असल्याकारणाने त्या अजगराला आपल्या कॅमेऱ्यात कोणीही बंदिस्त करू शकले नाही.


           अजगराची जागा गेल्यांनतर वळणा-वळणांची वाट पार करत एक ओहोळ लागला, रात्रीच्या वेळी तो पाण्याचा आवाज जणू त्या रात्रीची शांतता भंग करत होता. त्या ओहोळाच्या चिखलात एकेक पाऊल टाकून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. मस्त चढ चढायला सुरुवात झाली होती, आणि देशमुख ने आता लोडसॅक घेण्यासाठी गायकर ला सांगून ठेवले होते, गायकर साहेब पण आमचे हुशार, हा एक चढ चढून घे नंतर घेतो, चढ काही संपण्यास येत नव्हता, तिथेच चढावर एक-दोन मिनिटांचा विसावा घेतला, देशमुख आता चढ संपायची वाट बघतोय तर इतक्यात आमचे नवखे प्लेयर जय मानकामेची गाडी डुलायला लागली, लगेच विश्वेशने सांगितलं  "गायकर जयची बॅग घे... " झालं, अंधाऱ्या रात्रीही देशमुखच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे झाले होते.(ब्लॉग लिहिताना हसू येतंय, पण त्यावेळी माझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती 😜). अक्षरशः पहिल्या चढावरच आमची हवा झाली होती. काळोखातच चालत असल्यामुळे आणि नजर पायांजवळच असल्याने जंगल किती घनदाट आहे याचा नीटसा काही अंदाज आला नाही. चुकून कधी वर आकाशाकडे नजर गेली कि पाहतच रहावेसे वाटे, अहाहा! काय चांदण्यांचा सडा पडला होता. एव्हाना आम्ही माहुलीच्या त्या रानात बऱ्यापैंकी आत शिरलो होतो, वाटेत चालताना काट्या-कुट्यांचा सामना करत कधी दरीच्या बाजूने चालताना श्वास अडकून राहायचा. पाठीवरती ओझं आणि इतकं चालणं झाल्यामुळे शरीर असं गरम झालं होत कि थंडीचा महिना आणि इतक्या रात्री सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.


           रात्रीच्या त्या अंधारात मातीची चढण(scree) लागली की चढताना चांगलीच पंचाईत व्हायची, अगोदरच काळोख त्यामुळे जिथे टॉर्च मारू तिकडचंच  दिसणार, आणि घसाऱ्यावरून खाली सरकल्यावर आजूबाजूला आधार घ्यायला गेल्यावर कुठे काट्या-कुटे टोचायचे किंवा आधाराला पकडलेली ती सुकलेली छोटी झाडेच हातात येत. दोन तासांच्या या तंगडतोडीनंतर आणि पाठीवरच्या ओझ्यामुळे हैराण झालेल्या आमच्यापैकी दोनीही अक्षयची गाडी हेलकावे खायला लागली होती, त्यात विश्वेषच पहिल्या तासापासून चालू होत, की आता पंधरा मिनिटात पठार येईल(पण त्या पठाराची चिन्हे यायची काही लक्षणे दिसत नव्हती), आणि आमचा जीव मेटाकुटीला येत होता. पुन्हा एकदा वाटेत घसाऱ्याचा चढ आला, सगळ्या चढावर पालापाचोळा पडला होता, आणि एकदम उभा, छातीचा चढ होता, मातीत अक्षरशः बोट रुतवून स्वतःलाच सावरत कसाबसा तो पट्टा  संपवला आणि उतरताना काय होईल या विचारानेच जीव भांड्यात पडला. दोन-तीन मिनिट का होईना पण सगळे येईपर्यंत थोडावेळ बसलो, गुरूने पण थोडा दम घेतला, आणि लगेच गुरु आता वाट काढत निघाला, वाटेतल्या काटक्या  हातातल्या कोयत्याने वा पायाने बाजूला सारत गुरु पुढे आणि आम्ही वऱ्हाडी मागे असा आमचा लवाजमा चालला होता. गुरूला मला आता नवरीच्या भावाची उपमा सुचत होती, कारण मांडवात नवरा मुलगा आल्यावर नवरीचा भाऊ जसा नवरदेवाची कानपिळी करून त्याला मांडवात घेऊन जातो, तसा गुरु आम्हाला सगळ्यात पुढे राहून वाट दाखवत नवरीच्या दिशेने नेत होता.


           आता बऱ्यापैकी आडवा चढ असल्याने फक्त पाठणीवरच ओझं सोडलं तर चालायचं काही वाटत नव्हतं, आता बऱ्यापैकी वरती आलो होतो आणि वर बघितल्यावर काळोखात आम्हाला नवऱ्याची करवली-भटोबा-नवरी-नवरीची करवली-माहुली बाण या सुळक्यांच्या रौद्रतेची जाणीव झाली. दुरूनच ते चित्र बघितल्यावर ज्यांनी कुणी हि नाव दिली असावीत त्याच्या भावना प्रकर्षाने जाणवल्या कारण डाव्या बाजूला नवऱ्याची करवली  सुळका, मध्ये आगडबंब भटोबा आणि उजव्या बाजूला नवरी आणि नवरीची करवलीचा सुळका हे चित्र लग्नात जसे नवरा-नवरीच्या मध्ये भटजी अंतरपाट घेऊन उभे आहेत तसेच भासले. चालताना वाटेच्या एका बाजूला दरी होती, त्यामुळे एकमेकांना सांगत ओणवे होऊन अखेर आम्ही त्या पाण्याच्या जागी पोहोचलो, घड्याळाचे काटे एव्हाना साडेसहावर गेले होते, पुढील वाट जरा बिकट आणि शोधावी लागणार असल्याने उजेड होईपर्यंत इथेच(पाण्याच्या जागेवर) थांबायचं म्हणत सगळे तेथेच आडवे पडले, चालणं तर झालंच  होत, त्यात पाठीवर वीसेक किलोच वजन घेऊन तीनेक तास पायपीट झाल्यामुळे सगळ्यांनी उजेड होईपर्यंत विश्रांती घेतली (कारण इथून पुढची खिंडीतली संपूर्ण वाट बांबूंनी  भरली असल्याकारणाने  उजेडाशिवाय वाट काढणे शक्य नव्हतं). ही अर्ध्या तासाची विश्रांती आम्हाला संपूर्ण मोहिमेसाठी एक वेगळंच मनोबल देणारी होती. सात वाजूच नये असं विचार करून झोपलेलो आम्ही जणू काही पाच मिनिटांतच सात वाजले आणि  पाठीला बॅग लावून आमची वरात पुन्हा निघाली, लग्नाचं ते मांडव आता आमच्या दृष्टीक्षेपात होतं. 

स्वागताला आलेले सूर्यनारायण 
           गुरूने अगोदरच पुढे जाऊन वाट शोधायला सुरुवात केली होती. पहिलाच चढ चढल्यावर सूर्यनारायणाचे मस्त दर्शन झाले. जणू काही मांडवाच्या जवळ पोचल्यावर वधूपिता आमच्या स्वागताला आले होते. स्वागतादाखल वधुपित्याने सगळीकडे प्रकाश फैलावला होता त्यामुळे चालायला आणि आजूबाजूला नजर फिरवून आम्ही काळ्या-कभिन्न सह्याद्रीला डोळ्यांत साठवायला मजा येत होती, माहुलीची आणि  माझी पहिलीच भेट असल्याने सह्याद्रीच अजून एक नवीन रुपडं माझ्या आठवणींच्या कुपीत साठवत होतो, वर आल्यावर माहुली बाण सुळकाही त्याच्या भक्कमतेचा पुरावा देत होता. आता कडेकडेने पावलं टाकत, घसाऱ्यावरून सरकत-सावरत बेस कॅम्प ची जागा दिसली. आठच्या ठोक्याला आमची वरात अखेर बेसकॅम्पला पोचली. सगळे वर येईपर्यंत जरा बसावं आणि विसावावं या विचाराने बूड टेकतोय ना टेकतोय तोच विश्वेश आणि बाकी मंडळी वर आली लगेच विश्वेशने आमच्या ट्रेनिंगचा पुढचा टप्पा असं सांगत बेसकॅम्प लावायला सुरुवात करुया.

            बेसकॅम्प लावण्याअगोदर ती जागा सगळी साफ करून बऱ्यापैकी सपाट केली. त्यावर ताडपत्री टाकली आणि टेन्ट लावायच्या कामात सगळे व्यस्त होते, तर मी एका ठिकाणी बसून सगळ्यांसाठी टँग(एनर्जी ड्रिंक) बनवलं, आणि लगेच चूल बनवायला घेतली, वारा खूप होता, आणि नीटसा आडोसाही नव्हता, त्यात चुकून जरी चुलीतली एखादी काडी उडाली, तर काय होईल सांगू शकत नाही, चुलीची दगडे लावेपर्यंत गुरूने जळणासाठी काठ्या आणि गवत आणलं आणि आम्ही दोघांनी चूल पेटवली. 
तोंडाला पाणी सुटलं ना राव!
           बेस कॅम्प च्या इथे जवळपास पाणी नसल्याने आम्ही सोबत आणलेलं पाणी आम्हाला पुरवून पुरवून वापरायचं होत. पाणी तापवलं आणि मॅगी बनवायला मी लागलो, तिकडे बाकी मंडळींनी कॅम्प नीट लावून सगळ्या बॅग मधलं सामान बाहेर काढून पद्धतशीरपणे मांडून ठेवलं.
EQUIPMENTS


माझी मॅगी होईपर्यंत तिकडे सगळी शस्त्रास्त्रांची पूजाही झाली, मस्त नारळ वगैरे चढवून आणि तोच नारळ लगेच पोटात ढकलून सगळ्यांनी मोर्चा आता मॅगीवर वळवला होता.  
पुजितो तुजला सह्यकड्या !!!
           विश्वेश ने आम्हा सर्वाना कोण काय करणार ते विचारत तीन टीम केल्या. राम,राहुल,विश्वेश सुळक्याच्या वर जाणार होते. मी, देशमुख, ऐश्वर्या, प्रागवंश आम्ही चौघे सुळक्याच्या पहिल्या स्टेशन पर्यंत चढाई करणार होतो, तर श्रीरंग, गायकर, जय हे बेसकॅम्प सांभाळायला थांबणार होते. श्रीरंग आणि प्रागवंश ने फोटोग्राफीचीची जबाबदारी देखील घेतली होती, गिर्यारोहणाची पहिलीच मोहीम असल्याकारणाने थकलेलो असलो तरी एक वेगळाच उत्साह आमच्यात होता. आमच्यात जितका सुळक्यावर चढण्याचा उत्साह होता, तितक्याच उत्साहाने जय साहेबांनी झोप काढत बेसकॅम्प सांभाळला होता. "सुरक्षा सांभाळत चढाई" हे आमच्या क्लाईम्बरच ब्रीदवाक्यच आहे, आणि खरंच खूप चांगली विचारसरणी आहे ही, ज्याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळत होत. 

           प्रस्तरारोहणासाठी(rock climbing) लागणारी सगळी उपकरणे आणि सेफटी घेऊन आम्ही ७ जणांनी दहा वाजता बेसकॅम्प सोडल, गायकर आणि श्रीरंग देखील सुरुवातीला आमच्या सोबत आले होते.राम ने पहिला पेग लावून लीड क्लाइंबला सुरुवात केली, राहुल सेकंड मॅन होता, तर विश्वेश यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. श्रीरंग आणि प्रागवंशने कॅमेरे काढून फोटोग्राफीला सुरुवात केली, राहिलो आम्ही चौघे मी,ऐश्वर्या नि दोन्ही अक्षय त्या रिज वरच मुटकुळं करून राम कडे बघत होतो. मध्येच ऐश्वर्याला देखील फोटोग्राफीचा किडा चावत होता, रामची सुरुवातीचीच मुव्ह बघून आमच्या हातांना घाम आला होता, पण जस जसा राम सराईतपणे वर जात होता आणि विश्वेश, राहुल त्याला जसे मार्गदर्शन करत होते, तसं आम्हाला देखील आपण यापुढे काय काय करायला हवे, याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहत होते.

 मस्त राम चढला, चढला तो  पुस्तकात गेला, वर गेला आणि पहिल्या स्टेशनला पोहोचला, इकडे विश्वेश आणि राहुल बोंबलताहेत त्याला सांगण्यासाठी पण अगोदरच रामचा आवाज बारीक आणि वाऱ्याची गाज, त्यामुळे संवाद नीटसा साधला जात नव्हता, झालं एकंदरीत आरडा ओरडा करीत शिव्यांची लाखोली वाहत राहुल विश्वेश राम यांच्यात ताळमेळ झाला.

           सेकंड मॅन राहुल ने जुमारिंगच्या साहाय्याने वर चढण्यास सुरुवात केली, राहुल मुरलेला असल्याकारणाने तो लवकर गेला, आता विश्वेश कडे आम्हाला वर पाठवण्याची जबाबदारी होती.

 पुढच्या टप्प्याची आखणी करताना असं ठरलं कि, आम्ही चौघांनी पहिल्या स्टेशनला थांबायचं. 

           पुढच्या टप्प्यात पुन्हा रामने आघाडी घेतली आणि चढाईला सुरुवात केली. आताची रामची चढाई बघताना विश्वेश आम्हाला गिर्यारोहणातील काही धडे देत होता. गिर्यारोहणातील विश्वेशची अनुभवांची शिदोरी मुक्तपणे आमच्यासमोर खुली होत होती.त्यातून काही वेचण्याचं काम आमचं होत. 

रामने मारलेली मुसंडी 
तिकडे वर जाताना एका ठिकाणी राम अडकला, अडकला म्हणजे त्याचे वर चढायचे खूप प्रयत्न चालू होते, पण नीट जमत नव्हतं, इकडे खालून विश्वेश आणि राहुल त्याला गाईड करत होते. वीस-पंचवीस मिनिटांच्या हालचालीलनंतर अखेर राम ने मुसंडी मारली आणि पुढच्या काही मिनिटातच रामने दुसऱ्या स्टेशनवर पाय रोवले. राहुल ने लगेच सेकंड मॅनची भूमिका बजावत स्टेशन गाठलं, तो पर्यंत विश्वेशने आम्हाला इथेच सेफली बसून काही झालं तरी सेफटी काढायची नाही असं ठणकावत जुमार घेऊन सरसर वर गेला. 
पहिल्या स्टेशन वरचा मुक्काम 
आम्ही चौघे आता पहिल्या स्टेशनला टेपलाइनच्याच्या साहाय्याने एकमेकांना जणू बांधूनच होतो. वरच्यांच्या हालचालीवर जस होईल तस लक्ष देत होतो
 
सुळक्याच्या वर पोचायला वरच्या टीमला  किती वेळ लागेल माहीत नव्हतं, इकडे आमच्या गोष्टींना पूर आला होता, मस्त वर जाताना काकडी,सफरचंद, संत्री आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन गेलो होतो. थोडी मोकळी जागा आणि वर असल्याकारणाने गार वारा अंगाला झोंबत होता.
  

 या सगळ्यामुळेच आम्ही तेव्हा स्टेशन ला पाय उराशी घेऊनच बसून होतो, आणि वरून काही कॉल ऑर्डर येते का या कडे लक्ष देऊन होतो, तिकडे खाली थांबलेल्यांपैकी जय ने तर अगोदरच झोप काढली होती, रंगा फोटोग्राफी करायला म्हणून एका झाडाखाली थांबला, गुरु आणि अक्षय गायकर आमच्यावर लक्ष ठेऊन होते. 


आणि नवरीला मुंडावळी बांधली...
वरच्या टीमशी आमचा नीटसा संवाद होत नव्हता, टीम मस्त वर चढली...आणि साडेतीनच्या आसपास सुळक्याचा माथा गाठला, आणि नवरीला निसर्गमित्रची मुंडावळी बांधण्याची मोहीम यशस्वीरीत्या  फत्ते झाली. 


भरभर लगेच रॅपल्लिंग करत खाली उतरण्याची सुरुवात केली, आणि विश्वेश, पाठोपाठ राहुल आणि राम लगेच आमच्या जवळ आले, राम ला तसाच खाली पाठवला, आणि आम्हाला खाली पाठवण्याची सुरुवात केली.  खाली उतरून लगेच आम्ही बेसकॅम्पच्या दिशेने मार्गस्थ झालो, आता जी उतरण होती, जी फोटोत किंवा दुरून साधी भासत होती, ती आमचा कस पाहणारी होती, मस्त पाच पायांच तंत्र वापरत आम्ही खाली आलो.  

विश्वेशने अगोदरच वाइंडप चा कॉल दिला होता, त्यामुळे खालच्या टीम ने बऱ्यापैकी आवराआवर करून ठेवली होती. 
वऱ्हाडी
(डावीकडून राहुल,अक्षय गायकर,श्रीरंग,विशाल,ऐश्वर्या,जय,गुरु,प्रागवंश,विश्वेश,देशमुख,राम)
आम्हीही गेलो, अंगावरचे सगळे साहित्य उतरवले  आणि सर्व सामानाची बांधाबांध करायला लागलो. राहुल, विश्वेश, राम देखील आले, भराभर बॅग पाठीवर टाकल्या आणि खाली मार्गस्थ झालो, भूक तर प्रचंड लागली होती, पण सर्वानुमते असं ठरलं कि अंधार व्हायच्या आधी जो पहिला बिकट टप्पा आहे तो पार करायचा आणि सकाळी आराम केलेल्या पाणवठ्याच्या जागी पोटपूजा करायची, साडेपाचला आम्ही बेसकॅम्प सोडलं, पावले आता भरभर पडायला लागली, उतरताना घसारा भरपूर असल्या कारणाने सारखं सरकत-पडत आम्ही चाललो होतो, जय ट्रेकिंग मध्येच नवीन असल्याकारणाने त्याची तर चांगलीच हवा झाली होती, पण खूप चांगली कामगिरी होती पठ्ठयाची. मध्येच एका ठिकाणी त्याचा पाय सरकला आणि एक दगड त्याने खाली सोडला, तो दगड बघून रामची त्या उतरणीवर पळता भुई थोडी झाली होती. मी तर काय रामकडे बघतच राहिलो. साडेसहाच्या आसपास त्या पाणवठ्याच्या इथे आलो तर पुन्हा सर्वानी सांगितलं कि इथे नको थांबूया, सरळ खालीच जाऊया, आम्हा नवख्यांच्यातला हा उत्साह बघून विश्वेश आणि टीम ला नक्कीच भारी वाटलं असणार. 

           पाठीवर लोडसॅक होती, पण आता खाली उतरण्याचे वेध लागले होते, पावलांनी चांगलीच गती घेतली होती, गुरु वाट दाखवत पुढे त्याच्या मागे आम्ही सगळे वाट तुडवत अंधारातून चाललो होतो. अखेर आलो पावले टाकत टाकत अजगर दिसलेली जागाही मागे टाकली आणि आता बऱ्यापैकी सपाट उतारावर आलो होतो, सकाळपासून तोल सावरून असलेला मी आता माझेदेखील पाय चांगलेच बोलायला लागले होते, आणि जिथे सगळे नीट चालले होते, त्या वाटेवर मी तीन चार वेळा भूमातेला वंदन केला. अखेर साडेआठ वाजता आमची परतीची वरात गुरूच्या अंगणात पोचली. भुकेचा अक्षरशः पोटात हाहाकार माजला होता. वहिनींनी आणि त्यांच्या मुलींनी मस्त ठेचा भाकरीच ताट आमच्यासमोर वाढलं, आणि आम्ही दहा जण त्यावर तुटून पडलो. पोटाची भूक शांत केली आणि पुन्हा एकदा बॅगा  खोलून सर्व साहित्याचा काउंट घेऊन  साडेनऊ वाजता आम्ही गुरु आणि त्याच्या परिवाराचा निरोप घेतला. आणि आमच्या बाईक हाकत  रात्री बाराच्या आसपास आम्ही पनवेलला पोचलो. आणि आमची मोहिम फत्ते झाली.


           अशा प्रकारे नवरीला मुंडावळी बांधत  माझी शिदोरी नवीन अनुभवांनी भरली. 


            माहुली परिसरात जाताना गुरुची मदत अवश्य घ्यावी, तो निस्वार्थी पणे आपल्याला मदत करतो, पण  तरीही त्या परिसराची आणि त्याने केलेल्या मदतीचे भान ठेऊन त्याचा योग्य पद्धतीने निरोप घ्यावा.
गुरुनाथ आगिवले - ९२६०५९८५३३

नवरी आरोहणाचे अजून फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा, वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची... पुन्हा भेटूया लवकरच ... 

धन्यवाद!

आपलाच,
सह्याद्रीचा भटकभवान्या... 


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...