Sunday, December 1, 2024

फोफसंडी

http://ahireyogesh.blogspot.com/2020/11/phopsondi.html

        संतांचे माहेर जसे पंढरपूर तसे आम्हा शहरी भटक्या मंड़ळीचे हरिश्चंद्रगड. हल्ली वाढत्या गर्दीमुळे जरी जाणं होत नसले तरी मनात कुठेतरी ठाण मांडून बसलेला. 

याच हरिश्चंद्रगड परिसरात कलाडगड, भैरवगड, भैरोबा दुर्ग, कुंजरगड उर्फ कोंबडा किल्ला असे या भागातील मातब्बर गडकोट. 

    यावेळी इथल्या कुंजरगड फोफसंडी मांडवीचे खोरं या परिसरात बाईक राईड करायचे ठरवले. सुरुवातीलाच एक दोघांचा नकार ऐकल्यानंतर मग काय, एकला चलो रे... विजयादशमीचा आदला दिवस शनिवार, तो निवडला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास सर्व तयारीनिशी बुलेटला किक मारली. टारगेट, चलो फोफसंडी... दोन तासात माळशेज टॉप. 

गार हवेत घाटात दोन चार फोटो मारुन, आरामात पुढच्या पाऊण तासात बनकर फाटा पुढील उदापूर गाठले. उदापूरहून डावी मारत, मुथाळणे कोपरे रोड पकडला. वाटेवर दिशादर्शक पाटी होतीच. 

वाटेतले मांदारणे सोडल्यावर मुथाळणे पर्यंत सहा किमीचा अरुंद वाटेचा कठीण घाट. तो चढून वर आल्यावर उजवीकडे वाघोबा देव, तिथेच थोडा वेळ सकाळचा गार वारा खात बसलो. 

आता मात्र सुरु झाला तो डोंगर दरींचा प्रदेश. पुर्ण रस्ता घाटाचा, डोंगर उतारावर छोटी छोटी घरे काही ठिकाणी लहान लहान वाड्या वस्त्या. कोपरे या भागातले शेवटचे गाव. कहिश्या दुर्गम अशा ठिकाणी जुन्नर ओतुर या भागातून इथवर एस्टी येते. 

कोपरे सोडल्यावर आधीच अरुंद असलेला डांबरी रस्ता गायब. इथून पुढे फोफसंडी साठी मोठा रस्ता नाही हे माहित होते पण निदान कच्चा तरी बरा असावा...कसले काय.. फोफसंडी अंदाजे सहा ते सात किमी असावे. गावाबाहेर पडताच एकाला रस्त्याबद्दल विचारलं. "थोडा खराब आहे पुढं देवनाळ्या पासून डांबरी आहे". हरकत नाही बघू काय तें म्हणून किक मारली. सुरुवातीला माती छोटी दगड मग काहीसा बरा खडी टाकलेला. पण काही ठिकाणी खडी एवढी की बाईक घसरुन पडावी. गाव मागे पडून टिपिकल घाट रस्ता सुरु. मध्ये जंगल पट्टा लागला, या भागात तर ना दगडी ना खडी नुसता लाल चिखल बाईकवर तोल सांभाळत कसरत. हा शांत निर्जण निसर्गरम्य घाट रस्ता मला सारखं डिगा ते खानू रस्त्याची आठवण करुन देत होता. पुर्ण रानात फक्त बुलेटचा काय तो डूग डूग आवाज. काही अंतर जात उतार मग ओढा, उतारावर बाईक कण्ट्रोल करत झपकन ओढ्यातून बाहेर काढली मग पुढचा चढ दगड गोट्याचा सावकाश पार केला. हे होत नाही तर पुढे बर्यापैकी वाहत्या पाण्याचा ओढा. मनाचा हिय्या करुन टाकली पण ऐन मध्यभागी आल्यावर तोल सावरायला पाय टेकवावे लागले. बुटात पाणी गेल्याचं दुःख नाही पण बाईक नको मध्ये बंद पडायला, रेस करुन कशीबशी बाहेर काढली. आता या दोन प्रसंगा नंतर मला रस्त्याची काळजी वाटू लागली. पुढे काय वाढून ठेवले असणार ? जर काही झालं तर मदतीला सोबत कुणी नाही, जवळपास वस्ती नाही. आता पर्यंत नितांत सुंदर वाटत असलेल्या रानात अचानक मळभ दाटून आल्यासारखे वाटले. पाणी पित जरा वेळ शांत बसून राहिलो. एक विचार असाही आला की परत मागे फिरुन ओतुर कोतुळ मार्गे जावे का पण नाही क्षणात तो विचार झटकून टाकला. तसेही परत जायला हे दोन पडाव आहेतच, त्या पेक्षा जाऊ, पुढे पाहू काय होईल ते. जे होतं ते चांगल्यासाठीच हा विचार करुन किक मारली. काही अंतर जाताच दरी पल्याड एक घर आणि जवळ चारचाकी उभी दिसली. ते पाहून जरा हायसं वाटलं. पण तिथवर पोहचण तेवढं सोपं नव्हतं. मधल्या डोंगराला वळसा घालून तिथे जायचं होते. वाटेत पुन्हा एक मोठा चिखलचा टप्पा, इथे मात्र उतरुन गाडी ढकलत न्यावी लागली. एक गोष्ट लक्षात आली, जंगल टप्प्यात ओढ्या जवळील रस्ते सदासावलीमुळे चिखलाचे तेच मोकळं वनातील उन्हामुळे कोरडे ठाक. गाववाला चांगला रस्ता लागेल असं म्हणाला होता पण सद्यस्थिती पाहून मला तर कुठे चांगली चिन्ह दिसेना. उतारा वरील खडकाळ टप्पा पार करुन एका मोठ्या ओढ्यावरील पुलावर आलो, इथून पुढे मात्र खडी मिश्रित रस्ता दिसला. 

पुलापलिकडे दोघं जण मस्त पैकी म्हशीला अंघोळ घालत होते. वाहत्या पाण्यात मी पण चिखलात माखलेले बूट धुवून घेतले. हाच देवनाळ्याचा पूल इथून फोफसंडीची हद्द सुरु होते. चढ चढून सपाट रस्ता, काही अंतर जात मघाशी दिसलेले घर उजवीकडे. 

अंगणात दोघे बसलेले विचारलं तर म्हणाले, "ही काय आली फोफसंडी ..पुढे डांबरी रस्ता आहे." घडल्या प्रकरणात कोपरे ते फोफसंडी माझा पाऊण तास गेला. गावच्या सुरुवातीची दोन चार घरं सोडल्या वर एका घरावर ‘सह्याद्री दर्शन पथिकालय’ असा बोर्ड लावलेला. 

गाडीचा आवाज ऐकून गृहस्थ बाहेर आले. ‘दत्तात्रय मुठे’ त्यांचे नाव, आपुलकीने स्वागत केले. विचारपुस झाल्यावर मीच रस्त्याचा विषय काढला. दोन दिवस आधी पर्यंत संध्याकाळी पाऊस होता त्यामुळे ही अवस्था. तसेच कोपरे ते फोफसंडी हा रस्ता पुर्णपणे वनविभागाच्या अख्यरित असल्याने मंजुरी मिळणं अवघड. कोपरे पुणे जिल्ह्यात तर फोफसंडी नगर जिल्ह्यात. वाटेत लागलेला तो देवनाळ्याचा पूल ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा. जर पक्का रस्ता झाला तर कोपरे ओतुर मार्गे इथून माळशेज घाट अगदी जवळ होईल..असो.

      कुंजरगड माझ्या नियोजनात नव्हता. त्या पेक्षा निरोळी रांजणा सारखी अजून काही अल्प परिचित ठिकाणं जाणुन घ्यायची होती. मुठे काकांनी माहितीचे भंडार उघडले. नवी जुनी काही कागदपत्र माहिती पत्रे दाखवली. फोफसंडी हे अतिशय दुर्गम असे चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले दर्या खोर्यात वसलेले १०००-१२०० लोकवस्तीचे लहानसे गाव. अशा या भौगोलिक स्थानामुळे इथे सुर्योदय काहीसा उशिरा तर सूर्यास्त लवकर होतो. पावसाळी शेती त्यात तांदूळ, नाचणी, वरई तसेच हिरडा सारख्या वनस्पतीची विक्री आणि जोडीला थोडे फार पशूधन हेच काय उपजीविकेचे साधणं.  

    गावच्या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे. साधारण १९२५ च्या सुमारास संगमनेर प्रांतचे इंग्रज अधिकारी मपोपफ हे घोड्यावर फिरत फिरत अनेक लहान मोठे डोंगर पार करुन या दरीत उतरले. त्या वेळी होती तुरळक आदिवासी वस्ती. पोप साहेबाला इथला निसर्ग खुप आवडला. इतका की तो दर रविवारी इथे येऊ लागला. या भागात उगम पावणारी मांडवी नदी जिच्यावर आता चिल्हेवाडी धरण बांधण्यात आले आहे त्या नदी तिरावरील टेकडीवर रेस्ट हाऊस बांधले. तिथून तो इथल्या डोंगर रांगा कुंजरगड, पावसाळ्यात डोळ्यांचं पारण फेडणारे रूप अनेक धबधबे पाहत असे. पोपच्या रहण्याने या गावला मपोफसंडी म्हणू लागले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रुढ झाले. गाव तसे सुविधा पासून वंचित. रस्ते, वीज, शाळा यांची वानवा. शिकायला दूर आश्रम शाळेत. २००४-५ नंतर वीज व रस्ते आले. त्यात ही स्थानिक मंडळी यांचे सहभाग व श्रमदान महत्वाचं. दत्तात्रय मुठे काकांनी त्या साठी शासन दरबारी बरीच पायपीट केली. सध्या गावात अकोलेहून सायंकाळी मुक्कामी एस्टी येते. लवकरच दहावी पर्यंत शाळा होणार. आरोग्य सुविधा तसेच शेतीला पुरक व्यवस्था व पर्यटनावर भार द्यायचा त्यांचा मानस आहे. काकांनी ही सारी माहिती दिली. 

   मला खिरेश्वर कोल्हेवाडी कडील भाग पहायचा होता. वेळ पहाता निरोळी रांजणा दोन्ही होणं शक्य नव्हते. त्यामुळे मानखंदा व खिरेश्वर भागात उतरणारया पुरातन वाटा पाहायचा हे काकांसोबत चर्चा करुन ठरवलं. जुन्या वाटा म्हंटल की आमची उत्सुकता वाढते. काकांचे भाऊ ‘देवराम’ सोबत यायला तयार झाले. पुन्हा देवनाळ्या जवळ आलो. 

तिथेच डावीकडे या भागातला मोठा घारीचा धबधबा, सध्या बारीक धार सुरु होती. तिथं न जाता पुलाच्या डावीकडून वर चढायला सुरुवात केली. धापा टाकत वरच्या टेपाड वर आलो. काही वेळ आडव जात पुन्हा आणखी एका मोठ्या टेकडीला वळसा घालून भल्या मोठ्या गवताळ पठारावर आलो. 

उजवीकडे दरी पल्याड जीतवाना धबधबा. पठारावर काही अंतर जात वायव्य दिशेला हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला डोकावला. 

रोहिदास तारामतीवर काहिसं धुकं पसरलं होतं. झटपट पावलं टाकत कड्यावर आलो, धावतच जात टोकावर उभा राहिलो. इथून उलगडला तो पुर्ण माळशेज परिसराचा देखावा. वातावरण थोडं धुसर, धुप छाव टाईप, तरी डोळ्यांना व्यवस्थीत दिसत होते.

 खाली पिंपळगाव जोगा धरणाचा फुगवटा त्या काठी वसलेल्या गवारवाडी, वाघाचीवाडी, कोल्हेवाडी इतर वाडी वस्त्या, दूरवर खिरेश्वर, खुबी पर्यंत जाणारी धरणाची भिंत, त्या पल्याड माळशेज, नाणेघाट पासून देवदांड्या, भोजगिरी, गुण्या, उधळ्या डोंगर ते सिंदोळा, हडसर, गणेशखिंड पासून दक्षिणेला हाटकेश्वर पर्यंत. तसे पाहिले तर ही हरिश्चंद्रगड पासून निघालेली बालाघाट पर्वतरांग हरिश्चंद्रगड कारकाई बाळूबाई तिकडे पूर्वेला भैरोबा दुर्ग कुंजरगड तर नैऋत्यला वारल्याचा डोंगर निरोळी पासून पार रांजणा पर्यंत.. खिरेश्वर पिंपळ्गाव जोगा धरणा जवळून हि रांग भलतीच मोहक दिसते. याच खिरेश्वरहून फोफसंडी भागात येणार्या वाटांबद्दल कुतूहल होते. अशाच एका जुन्या टकोरीची खिंड या वाटेवर आम्ही निघालो. आता आम्ही होतो तो मानखंदा याच्या उजव्या बाजूला निरोळी तर डावीकडे रांजणा म्हणजे दोन्ही परस्पर विरुध्द बाजूला. टकोरीची खिंड ही निरोळीच्या दिशेला. 

पठारावरून क्रेस्ट लाईन पकडून चालू पडलो. अजूनही बहुतेक ठिकाणी ओढ्यात वाहत पाणी. अवाढव्य पसरलेल्या या पठारावरील डोंगरकडेला सदाहरीत जंगल चांगलेच बहरलेले जांभूळ, अंजन, बेहडा, हिरडा तसेच निवडुंग व करवंदांच्या जाळीची गर्दी. कातळ टप्प्यात अनेक ठिकाणी निसर्ग निर्मित लहान मोठ्या गुहा. या कुंजरगड फोफसंडी परिसराचे एकंदरीत वनक्षेत्र एकूण १९०० हेक्टर एवढं आहे. पाऊण तासात मोठ्या झाडीभरल्या खिंडीजवळ आलो. 

;हिच टकोरीची खिंड, या वाटेने खाली खिरेश्वर गावाजवळील वाघाची वाडी येथे जाता येते. तेथील मंडळी या भागात सोयरीक असल्याने काही कार्य किंवा कामानिमित्त अजूनही याच वाटांनी ये जा करतात. गाडी रस्त्याचा फेर आणि लागणारा वेळ पाहता ही वाट कधीही सोयीची. याच खिंडी मागचा आणखी एक डोंगर चढून गेल्यावर उंबारल्याची टेकडी तिथून उंबारल्याची वाट खाली दुसर्या कोल्हेवाडीत उतरते. हि झाली फोफसंडीतून खिरेश्वर भागात उतरणारी दुसरी वाट. 

;;आता आम्ही आल्यापावली मागे फिरलो ती फोफसंडीतील सर्वात जास्त वापरली जाणारी अगदी अबाल वृध्दांपासून लहान मोठे ते गुर ढोरं ने आण करण्या योग्य असलेल्या गायदरा घाटाच्या वाटेला. पुन्हा मानखंदा येऊन रांजणाच्या दिशेनं निघालो. दोन मोठे टेपाड चढून गायदराच्या खिंडीत आलो. 


अगदी पध्दतशीर पणे मळलेली घाटाची वळणं वळणं घेत उतरलेली लयबध्द वाट. काही अंतर खाली घाटाने खाली जाऊन पुन्हा वर आलो. नव्वदच्या दशकात पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात आले. त्या वेळी मढ खुबी भागातील लहान लहान गावं विस्थपित झाली. पुर्वी फोफसंडीत गाडी रस्ता नव्हता तेव्हा अगदी अलिकडच्या काही वर्षांपर्यंत या मंडळीचा वाण समान बाजारासाठी मढ भागात येण्यासाठी हाच घाट वापरता होता. या तिन्ही घाटवाटेची खिरेश्वर कोल्हेवाडी भागातून चढाई उतराई १५०० ते १८०० फूट सहज असेल.

   गायदरा अलिकडच्या पठारावर एक म्हातारा आजा गुरे चारत होता. मला देवा सोबत पाहून, "काय पाव्हण ? कुठलं तुम्ही ?" चौकशी सुरु.... मग जुन्या काळच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. "अंगा खांद्यावर ३०-४० किलोची ओझी वाहत या वाटेने आम्ही जायचो, आमची सारी हयात गेली. आताची पोरं नुसतं एवढं चालायची बी नाय." म्हसाच्या यात्रेवेळी गुर घेऊन या गायदराने उतरुन पुढे खुबी मग जुन्या माळशेज घाटाने सावर्नेत पहिला मुक्काम दुसरा धसईत मग तिसर्या दिवशी म्हसा पोहचत. हे सारं सांगताना आजाच्या डोळ्यात चांगलीच चमक होती. खरचं पुर्वापार वहीवाटेतल्या या वाटा.

    एके ठिकाणी पाणवठा पाहून जेवणाला थांबलो, जेवण अर्थातच घरून आणलेलं. थोडा वेळ विसावा घेऊन उतरणीला लागलो. वारल्याच्या डोंगरा वरुन सरळ नजर फिरवत कुंजरगडाचे वेगळ्या कोनातून दर्शन झाले. समोर माथ्यावर मंदीर असलेला बर्डीनाथ महादेव, आजूबाजूच्या लहान वाडीवस्तीतील लोकांची महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. 


   अडीच पावणेतीनच्या सुमारास खाली आलो. मुठे काकांसोबत चहा झाला. काकांनी पुन्हा या भागातील बघण्यालायक ठिकाणांची नाव सांगितली. फोफसंडीचे कुलदैवत दर्याबाई मंदीर. गावापासून ४ किमी अंतरावर असलेले राणुबाई मंदिर त्याच्या आसपास मोठ मोठ्या गुहा. तसेच रानात वसलेले ग्रामदैवत कळमजाई मंदीर. ज्यावरुन नदीला नाव पडले त्या मांडवी हृषिनी तप केले ती घोडगडद नावाची गुहा. घारीचा, धुळगडीचा, कावडाच्या, भदभड्याचा इ अनेक लहान मोठे धबधबे. चारण गडद, गहीन्याची गडद इ अनेक मोठ मोठ्या गुहा. खरचं हे सारं पहायच असेल तर पायगाडीला पर्याय नाही, प्रत्येक ठिकाण पाऊण ते तासभराच्या अंतरावर टप्पा टप्प्यांत केलेला छोटा ट्रेकच. या साठी तीन चार दिवसांची सवड काढून नक्की येणार. मुठे काका व देवराम यांचा निरोप घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघालो. नियोजनाप्रमाणे परतीला कोतुळ ब्राम्हणवाडा ओतुर माळशेज घाट असेच ठरवलं होतं. देवराम म्हणाला होता सातेवाडी पाझर तलाव कडून एक कच्चा रस्ता थेट मुथाळणे ला निघतो. पुन्हा कच्चा रस्ताची परिक्षा मला नको होती, त्यामुळे ठरल्याप्रमाणे निघालो. 

 
फोफसंडी ते पळसुंदे कोतुळ हा रस्ता ही पुर्ण घाटाचा अनेक चढ उतार व तीव्र वळणावळणचा डोंगर दरी लहान लहान वाडी वस्त्या, ओढे नाले बंधारे या दिवसात तर आणखीनच उठून दिसणारे जणू चित्र वाटावे असे देखावे. 
सहाजिकच कुठे थांबू कुठे नाही अशी अवस्था. अर्ध्या पाऊण तासात आरामात पळसुंदेच्या भैरोबाला थांबलो. इथून कोतुळ ६ ते ७ किमी. फोफसंडी सोडल्यापासून बरोबर तासाभरात कोतुळ गाठले, तिथून उजवी मारुन ब्राम्हणवाडा पुढे घाट ओलांडून ओतुर. हा रस्ता राज्य महामार्ग असुनही यथा तथाच. आणखी एक गोष्ट जाणवली म्हणजे या भागात उसा व्यतिरीक्त गहू, बाजरी, मका, त्यात कांद्याचे प्रमाण लक्षणीय, परतीचा पावसाने मात्र त्याची भलतीच हानी इथं केलेली दिसली. दसरा आल्यामुळे फुलांची रास तेवढी जागोजागी दिसली.असो.. ओतुरहून माळशेज हायवेला लागलो. करंजाड खिंड ओलांडून पुन्हा पिंपळ्गाव जोगा धरणाचा फुगवटा दिसला, त्या पलिकडे हिच हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. 
जवळून पाहिलेल्या रांजणाचे पुन्हा एकवार दर्शन झाले. सायंकाळच्या सोनेरी उन्हात ही पुर्ण रांग खुलून दिसत होती. बराच वेळ ते पाहतच खुबीफाट्याला कडक चहा घेतला. तिथून पुढे सव्वादोन तासात सुंदर दिवसाची सांगता करुन नॉनस्टॉप घरी. 
अर्थात बाईकने दिलेल्या दमदार साथीमुळे हे शक्य झाले त्यामुळे तिचा उल्लेख करुन कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.

 

योगेश चंद्रकांत आहिरे

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...