२३-एप्रिल-२०२२ - २४-एप्रिल-२०२२
चढाई... भैरवनाथ दारमिल्हे अथवा खोपिवली हून सुरूवात करून सरळसोट नाळेची वाट काही ठिकाणी छोटे चिमणी क्लांईब प्रकाराचे पॅच व जोडीला घसारा. माथा भैरवनाथ आहुपे देवराई. आहुपे घाट आणि तवली घाट या तुलनेत कमीत कमी वेळात आहुपेत जाणारी वाट. वाटेच्या निदान सुरूवात होईपर्यंत तरी वाटाड्या आवश्यक. अंदाजे ऊंची २५०० फूट..उतराई... शिदोबा दारपिंपरगाणे हून सुरूवात करून क्रेस्ट लाईन हून अरुंद ट्रेव्हर्स मारून मुख्य नाळेतून उतराई. अंदाजे अर्धा तास मग वाट उजवीकडे वळून पलीकडील दांडाने नाळेला अगल बगल देत उतराई. अत्यंत पध्दतशीर व लयदार असा घाट. आपण कुठून कुठे येतो ते पाहतच रहावं असं. पॅच नसले तरी वाटेला प्रचंड घसारा. घाट संपून वाट सिध्देश्वर वाडी मग बेंडारवाडी करत दुधनोली गाठणं श्रेयस्कर. उंब्रोली गावा अलीकडेच शिदोबा देवस्थान.अंदाजे उतराई २८०० फूट...प्रचंड घसारा व लहान मोठे पॅच असलेल्या या दुर्गम अनवट वाटांना भटकंतीचा पूर्वानुभव आवश्यक.. स्थानिक वा क्वचितच दर्दी भटके सोडले तर या वाटांवर फारसं कुणी फिरकत नाही. थोडक्यात स्थानिक वाटाड्या असलेला बरा.आम्ही भैरवनाथ दार वाटेच्या साधारण निम्म्या पर्यंत सोबत घेतली तर शिदोबा दार चे कोडं आम्ही स्व:त सोडवलं. ऐन ग्रीष्मातील चैत्र महिन्यात या दोन वाटांवर निसर्गानं खास करून, सह्याद्रीने भरपूर दिलं. दिवसभराच्या चालीनंतर आहुपेच्या कड्यावरून पाहिलेला रमणीय सुर्यास्त, रात्री वळवाच्या पावसाचा शिडकावा गारवा निर्माण करून गेला. त्यामुळेच काय ते सकाळचं चैतन्यमय धुंद वातावरण. सारं काही लाजवाब.
या ट्रेकला सतीश ला म्हणालो होतो. तू या वर लिहून काढ. त्याने मनावर घेत त्याच्या शैलीत लिहून पूर्ण केलं आणि माझ्या ब्लॉगवर टाकायला सांगितले. आता वाचा खाली दिलेला पूर्ण ट्रेकचा वृत्तांत सतीश कुडतरकर च्या लेखणीतून...
कोरोना काळापासून घरातच तंगड्या फाकवून झोपायची सवय झाल्याने, सहा-सहा महिने डोंगरकड्यांचे दर्शनच होत नव्हते. गेल्या नोव्हेंबरात ढाकभैरीला भेटून आल्यानंतर काही केलंच नव्हतं. त्यात योगेश अहिरराव दर आठवड्याला कुठेना कुठे ट्रेक करून आल्यावर ग्रुपवर फोटो सोडायचा, त्यामुळे नुसता जळफळाट होत होता.कधी नाही तो सुर्याचा जळफळाटही ४० डिग्रीला पोहोचल्याने, ग्रुपवर सुद्धा नकोरे बाबा ट्रेक, या फुफाट्यात असाच सूर होता. दरखेपेप्रमाणे योगेशने फोन करून, भैरवनाथ दार / शिदोबा दार करायला येतोस का? असा पुकारा केल्याबरोबर, या खेपेस जमवून टाकूया असं बजावून हो म्हणून टाकलं. मी सकाळी सात वाजता डोंबिवलीतून कल्याणात आल्यावर, योगेशने त्याच्या गाडीने मला उचलला आणि थेट मुरबाडच्या दिशेने प्रवास सुरु झाला. मुरबाडला नाश्ता आणि म्हश्यात खरेदी करून देहरीत पोचलो. योगेशने हमीद पटेल यांच्याबरोबर आधीच बोलणं केलेलं असल्याने, देहरीतले देशमुख काका आमच्यासोबत भैरवनाथदाराची वाट दाखवण्यासाठी येणार होते. देशमुख काकांना गाडीत बसवलं आणि खोपिवली गाव सोडल्यावर लगेच लागणाऱ्या छोट्याश्या पुलावर मी आणि देशमुख काका उतरलो. योगेश गाडी फिरवून देहरीत हमीदभाऊंकडे ठेवायला माघारी परत गेला. त्याला हमीदभाऊंने मोटारसायकलवरून परत खोपिवलीच्या पुलावर आणून सोडला. खोपिवलीत कोणी आमच्या ओळखीचही नव्हतं आणि हमीदभाऊ सगळ्या ट्रेकर्सच्या संपर्कातले असल्याने गाडी खोपिवलीत न ठेवता, देहरीत हमीदभाऊंकडे नेऊन ठेवली. दोनवर्षांपूर्वी पावसाळ्यात माळशेजपरिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने अडकून पडलेलो, तेंव्हा माझी बाईक याआधीही हमीदभाऊंकडेच पंधरा दिवस ठेवलेली.
खोपिवलीच्या पुलावरून, अहुपे घाटाच्या शेजारील कड्यांमधील सगळ्यात कमी उंचीची नाळ दिसत होती, तीच भैरवनाथ दाराची वाट. फक्त याच्याच माथ्यावर दाट रान दिसत होते, ते रान म्हणजेच अहुपेची देवराई आणि तिथेच आहे भैरवनाथाचे देऊळ. देशमुखकाकांनी माहिती पुरवली. ९.३० झाले होते. समुद्र सपाटीपासून ६३० फुटांवर असलेल्या खोपिवली गावात तापमान होत ३२ डिग्री. पुलावरूनच ९० अंशाच्या कोनात चालल्यावर, कड्याला भिडण्याअगोदर पायगाडीला साधारण साडेतीन- चार किमीच अंतर विरळ रानातून पार करायचं होत. अनधिकृत रेती काढण्याऱ्यांनी ट्रॅक्टरच्या रस्त्यांसाठी आधीच विरळ असलेलं रान आणखी विरळ केलं होत.
मुरबाड तालुक्यात कायमच पाहण्यात आलंय, गावकरी झाड तोडतात पण लावत मात्र एकही नाही. त्याचाच नमुना खोपिवलीत दिसत होता. त्यात हा विभाग पानझडी वृक्षांचा, पावसाळ्यात जेवढा हिरवागार दिसतो त्याच्या १० टक्केही हिरवळही उन्हाळ्यात राहत नाही. त्यात काही नतद्रष्ट काड्या टाकून रान जाळून टाकतात. सह्याद्रीत दरवर्षी मानवी काडेंटाकू आगीमुळे पशु-पक्ष्यांची अतोनात हानी होते. पावसापूर्वी शेत भाजणीची काम चालू असल्याने त्याचाही धूर आसमंतात साचून राहिला होता. याच सर्व गोष्टींमुळे मार्च-एप्रिल-मे मध्ये वातावरण डोळ्यांना एकदम भकास दिसते. याच भकासपणात एक वृक्ष मात्र लक्ष वेधून घेत होता. धुंद करणारा मोह. गावकऱ्यांसाठी म्हाव.मागे मार्चमध्ये एकदा डेहणे गावात पानगळ झाल्यानंतर मोहाच्या झाडांचा धुंदगंध पसरवणाऱ्या फुलांचा सडा झाडांखाली पाहिला होता. चिंचपाड्यातल्या प्रत्येक अंगणात उन्हात वाळवायला ठेवलेली मोहाची फुलं पहिली होती. आताही सुकलेली फुलं झाडाखाली पडलेली दिसत होती, ताजेपणात असलेली पिवळीदुधाळ चमक उन्हाने उडवून त्यांना लाल रंगात रंगवून टाकलं होत. सरत्या एप्रिल महिन्यात झालेला बदल म्हणजे, मोहाचा फुलोत्सव संपून आता पर्णोत्सव सुरु झाला होता. मोहाची झाडं हिरवीगार शाल पांघरून डोळ्यांना सुखद थंडावा देत होती. देशमुखकाकांनी मोहाची मदिरा कशी तयार करतात त्याची माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर घातली. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात या मोहाच्या दारूला सरकारी पैसेवाल्यांकडून भरपूर मागणी होती अशी माहितीही पुरवली. कुड्याच्या फुलांचाही बहराचा काळ होता. कोशिंबही लाजून लालेलाल झाला होता. अर्धा पाऊण तासांच्या चालीनंतर मुळ भैरवनाथ धारेच्या वाटेवर पोचलो.
इथे पोचेपर्यंत ८०% चाल मातीच्या रस्त्याने झाली होती. आता नेहमीप्रमाणे दगड धोंड्यावर धडपडत संपूर्ण चाल होती. शेजारी अहुपे घाटाची प्रशस्त वाट असल्यामुळे एकट्यादुकट्या गावकऱ्यांशिवाय इथे कोणी फिरकत नाही. नाळेतही उन्ह उतरली असल्याने आगीचा फुफाटा सुरु झाला होता. तापमान ३५ डिग्री सेल्सिअस. अधेमध्ये मोठे खडक पार करण्यासाठी ढांग ताणून शरीराचा कस लागत होता. साधारण आठ-दहा फुटांचे दोन रॉक पॅचेस लागले.
नाळेतले दगडही तापायला सुरु झाले होते आणि आम्ही अजून अर्ध्यावरच होतो. तापमान ४० डिग्री सेल्सिअस. WA चेक केले तर, उन्हामुळे किती ट्रेकर्सना सनस्ट्रोक झाला याची ग्रुपवर चर्चा सुरु होती. एकतर सहासहा महिन्यांनी ट्रेक त्यात शरीरावर अत्याचार नको, मग जास्त ताण येणार नाही या हिशोबाने पावले टाकायला सुरुवात केली. असंही वेळ भरपूर होता आणि अहुपेत रात्रीचा मुक्काम असल्याने घाई नव्हती. चार लिटर पाण्यापैकी २ लिटर पाणी संपलेले होते. देशमुख काकांकडे पाणीच नव्हते, त्यांना गरज नाही असं ते म्हणाले. ठरल्याप्रमाणे अर्ध्यावरूनच पुढील वाटेचा भूगोल समजावून देशमुख काका परत आपल्या घरी माघारी फिरले. नाळेतूनच दगडउड्या मारत, सुकलेल्या कारवीतुन मार्ग काढत एका मोठ्या खडकाखाली येऊन थांबलो. पुढे वाट नव्हती. मुळव्याधासारखा अडकलेल्या त्या खडकाखालून तर वाट नाही-ना, याची चाचपणी केली. वाट नव्हतीच. ‘एक मोठा खडक लागल्यावर त्याच्या अलीकडेच उजव्या बाजूने वाट असल्याची खूण देशमुख काकांनी सांगितलेली’ असं योगेशला आठवल. मग मी जाऊन पाहिल्यावर तिथे वाट दिसत नव्हती. म्हणजे समोर दिसणाऱ्या उंचवट्यावर चढून पाहावं लागणार होत. थोडी रॉक क्लाइंबिंग करून त्या उंचवट्यावर चढून पाहिल्यावर उजव्या हाताच्या भिंतीला लगटून वाट होती. वाट सापडल्यावर योगेशची बॅग वर घेतली आणि नंतर योगेशला खेचून वर घेतले. इथून पुढे माथा हाकेच्या अंतरावर होता.
सगळीकडे पानांचा खच पसरलेला होता. भैरवनाथाच्या भक्तांनी फेकलेल्या प्लास्टिक आणि निर्माल्यामुळे माथ्यावर पोचत असल्याची खात्री झाली. नाळेतून माथ्यावर पाऊल टाकल्यावर लगेच अहुपेच्या देवराईतले भैरवनाथ देऊळ. उंची २२०० फूट. रस्ताच देवराईतून गेला आहे.
दुपार असल्याने देवळातच जेवण आणि झोपेचा कार्यक्रम करून संध्याकाळी योगेशने ठरवल्याप्रमाणे अहुपेतल्या आश्रम शाळेजवळ सुनीता पारधी यांचे घर गाठले.
रात्रीच जेवण आणि मुक्काम त्यांच्याच अंगणात करून सकाळी ८.३० ला त्यांच्या पतिदेवांच्या महिन्द्रा कमांडर गाडीने शिदोबा धारेवर जाण्यासाठी पिंपरगणे गावासाठी रवाना झालो.
आज भैरवनाथांचा उत्सव असल्याने गावकरी देवळात जमा झाले होते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल होती. शिदोबा दाराची वाट माहित नसल्याने, योगेशने आधीच माहिती काढून ठेवलेल्या बुधाजी बंबाळे नामक गावकऱ्यांना शोधत शोधत पिंपरगणेत त्यांच्या घरी गेलो. ते कुठल्यातरी लग्नाला गेले असल्याने घरात नव्हते आणि आमच्या उटपटांग उद्योगांसाठी गावातील इतर कोणीही आमच्याबरोबर यायला तयार नव्हतं. प्रत्येकाला आपापला कामधंदा होता, त्यात उन्हातले करपायचे दिवस. आम्हीच बळजबरी करीत होतो. शेवटी दया येऊन एका माऊलीने आपल्या मुलाला वाटेची सुरुवात दाखवण्यासाठी पाठवले. पिंपरगणे गावाच्या प्रवेशद्वारातूनच उजव्या हाताला दिसणाऱ्या उंच डोंगररांगेच्या आतल्या गोटात शिदोबा धारेची सुरुवात आहे. अर्ध्यावरून त्या मुलाने परत फिरण्याआधी वाटेचा भूगोल समजावला. कारवी बाजूला सारत सारत नाळेच्या तोंडावर पोचण्याआधी दरड कोसळून वाट वाहून गेली आहे. कोसळलेल्या मातीच्या घसाऱ्यावरून जपून पावलं टाकत नाळेच्या तोंडावर पोचलो.
दोन्ही बाजूच्या कातळ भिंती दरडरुपी कात अंगावरून झाडून काढत मधल्या नाळेत टाकत असल्यामुळे मोठं-मोठ्या दगडांची रास पडली होती. योगेशने आधीच काढलेल्या माहितीप्रमाणे या नाळेतील वाट मध्येच उजवीकडे वळून दुसऱ्या नाळेत जाते. तेच ध्यानात ठेवत माकडउड्या मारत अर्ध्या तासानंतर उजव्या बाजूला वाट एका दांडावर चढत असल्याचं दिसलं. इथेच झाडाखाली बसलेलो असताना माकडांचा आवाज आला आणि सोबत खाली दगड पडतानाचाही. मागे, रतनगडाच्या खबदाडीत भटकताना माकड आमच्यावर दगड लोटत असताना प्रत्यक्ष पाहिलेले असल्याने आताही वर असलेली माकडच दगड खाली ढकलत असण्याची खात्री झाली. संपूर्ण नाळेत असंही माकडांची विष्ठा खूप ठिकाणी दिसलेली होती आणि या नाळेत माणसांचा वावर नसल्याने आपला निषेध नोंदवत असावीत.
आता हि नाळ सोडून उजव्या हाताला दिसणाऱ्या दांडावरून पुढील वाटचाल होती तर. आता आलो ती नाळ संपल्यात जमा होती आणि पुढे मोठा धबधबा असावा असा कयास आहे. अर्थात हि नाळ आतल्या गोटात असल्याने खालून हा धबधबा दिसण्याची शक्यता नाही. दांडाच्या सुरुवातीला रिबिनही बांधलेली दिसली. म्हणजे बरोबर वाटेवरच होतो. मध्येच वर चढणारी घसरगुंडी होती. सुकत चाललेल्या एकट्यादुकट्या बारीकशा कारवीला धरून दोघेही ती घसरगुंडी चढलो. मोठा जमाव असेल तर एकदोन लोक पुढे गेल्यावर मागे राहिलेल्याना, काडीचा आधार पकडण्यासाठीही काहीच शिल्लक राहणार नाही. त्या घसरगुंडीचा पार गुळगुळीत गोटा बनवून ठेवतील तो वेगळा. दांडावर सुकलेली कारवी आणि वाटेवर तिच्या पानांची रांगोळी. यामुळे वाट दिसत नव्हती. पण ठराविक अंतरावर लाल रिबिन्स आणि कापलेल्या कारवीचे खुंटे वाटेवरच असल्याची साक्ष देत होते. संपूर्ण वाटेवर कारवी असल्याने तिला धरूनच घसाऱ्यावरून खाली उतरत होतो नाहीतर कित्येकवेळा ढुंगण टेकवायला लागले असते. आता त्या दांडावरून दुसऱ्या नाळेत प्रवेश केला. परत दगडगोट्यांचा खेळ करून नाळेच्या शेवटच्या टप्प्यात आलो. नाळ संपल्यावर ज्यांचं घर लागेल अशी माहिती मिळाली होती, नेमके तेच नामदेव कुडेकर वर पिंपरगणेत जाताना भेटले. ते भेटले त्याच जागेवरून नेमका तो ओढा सोडून डाव्या अंगाच्या वाटेवर वळायचे होते. जर कुडेकर या जागेवर भेटले नसते तर आम्ही त्या नळीच्या ओढ्यातूनच चालत राहिलो असतो आणि आग ओकणाऱ्या सूर्याच्या भट्टीत भरकटत बसलो असतो. आता आम्ही जी नाळ उतरून आलो होतो तीच नाळ कुडेकर ४० डिग्रीच्या तापमानात वर चढणार होते. हातात पाण्याची बाटलीही दिसत नव्हती. दोन्ही हात रिकामेच दिसत होते. उत्सुकतेने त्यांना पाण्याविषयी विचारलं तर खिशात हात घालून छोटीशी पाण्याची बाटली दाखवली. (कुडेकरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नाळेत मध्येच एके ठिकाणी पाणी आहे, पण ते आंम्हाला नाळेच्या खाली भेटल्याने पाण्याचे ठिकाण पाहू शकलो नाही) त्यांच्याकडून पुढील वाटेची माहिती घेऊन निघालो. ओढ्यातून बाहेर पडल्यावर, गवत जळून गेल्यामुळे काळा ठिक्कर पडलेल्या दांडावर आलो.
दोनधडधडीत वाटा दिसत होत्या. एक डावी आणि दुसरी ओढ्यात उतरणारी उजवी. डावी घेतल्यावर, ती खाली न उतरता कड्याला समांतर पदरात जात होती. परत मागे फिरलो, मग उजवी पकडून खाली ओढ्यात उतरलो आणि वाट संपली. मनात शंका होतीच म्हणून परत दांडावर आलो.
आधीच्या उजव्या वाटेखालीच आणखी एक वाट काळ्या पडलेल्या मातीत गुडूप झाली होती. बस तीच पकडून चालत राहिलो आणि एकदाचे सिद्धेश्वरवाडीत पोचलो. संपूर्ण वाटेवर सिकाडा किटकांच्या गगनभेदी आवाजाने कल्लोळ माजवला होता, समोरील झाडं किटकांनी भरून गेलं होत. काही क्षणासाठी अक्षरशः डोकं उठलं होत. बहुतेक मिलन काळ असावा, कारण भैरवनाथ नाळ आणि आताची शिदोबा, या दोन्ही नाळेत दोन्ही दिवस यांचा आवाज भरून राहिला होता.
सिद्धेश्वरवाडीत आंबवणेंच्या घरातून एक मुलगा पुढचा दुधनोलीला जाणारा डांबरी रस्ता दाखवायला सोबत आला. पुढे बेंढार वाडीत पोचण्यापूर्वी झाडांच्या सावलीत गावकरी शिदोबाचा नवस फेडून मेजवानी करत होते. भर उन्हात जाताना पाहून आपल्या मटण मेजवानीत आम्हालाही सामील करून घेतलं. अशीही खूप भूक लागली होती त्यामुळे सपाटून खाल्लं आणि आणखी २ किमी च अंतर डांबरी सडकेवरून चालत दुधनोली गाठली. आम्ही शिदोबाकडे न जाता दुधनोलीच्या दिशेने गेलेलो पण शिदोबाने आपला प्रसाद मात्र आपल्या लेकरांकरवी आमच्यापर्यंत पोचवला. दुपारच्या तापलेल्या आसमंतात दुधनोलीच्या तिठ्यावर विशेष रहदारी नव्हती. नशिबाने एका बाइकवाल्याने आम्हाला देहरीपर्यंत लिफ्ट दिली. अंगाची लाहीलाही होणे म्हणजे काय ते या ट्रेकमध्ये चांगलंच अनुभवलं.

















No comments:
Post a Comment