Sunday, December 1, 2024

गाळदेवी घाट गाणीची वाट

http://ahireyogesh.blogspot.com/2020/08/galdevi-ganichi-vaat.html

       

     ‘गौरकामथ’ मध्ये प्रसादच्या घरी गाडी लावत आदरतिथ्य लाभ घेऊन भिवगडाच्या दिशेने निघालो. गावाबाहेर लागूनच सह्याद्रीची रांग तिच्या एका धारेला चिकटून उभा असलेला ‘किल्ले भिवगड’. 

इथल्या आजूबाजूच्या परिसरावर तसेच पुरातन घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी थोडक्यात टेहळणीसाठी अत्यंत उपयुक्त, अंगी पाण्याची टाकी काहीशी तटबंदी असलेला छोटेखानी भिवगड. याच्याच अल्याड पल्याड ‘गौरकामथ’ आणि ‘वदप’ हि गावं. गावात भिवगड दिशादर्शक पाटी लावलेली आहेच, बाहेर पडताच ओढ्याला समांतर अशी मळलेली वाट. 

काही अंतर जाताच पुरातन मारुतीची मूर्ती. तिथूनच वर चढाई काही ढोर वाटा चकवतात पण किल्ला जिथे सह्यधारेला जोडला गेला आहे त्या खिंडी सारख्या भागाची दिशा धरून सुटायच फार अवघड नाही मुळीच. वीस पंचवीस मिनिटांत तिथे पोहचलो येथेच पलिकडच्या वदप गावातून येणारी वाट मिळते. दोन्ही वाटा इथे एकत्र येऊन किल्ल्यावर जातात तर सरळ पूर्वेला धारेवरची चढाई ही घाटमाथ्यावरील ढाक गावात जाते. हाच ‘गाळदेवी घाट’. 

        भिवगडला राम राम करून घाटाला भिडलो. पहिले टेपाड चढून लहानशा सपाटीवर नाश्त्यासाठी ब्रेक घेतला. श्रावण महिना असूनही पाऊस मात्र हिरमुसलेला, निळ्या आकाशात कृष्ण धवल ढगांची नुसतीच पळापळ. उन वाढायच्या आत माथा गाठायचा या उद्देशाने झपाझप पावलं उचलली. दहा पंधरा मिनिटांच्या अंतराने एक वाट आडवी उजवीकडे गेलेली नजरेत आली. आधी म्हणालो तसे गाळदेवी घाट ही सरळसोट धारेवरची चढाई कुठेही फारसं उजव डाव आडवं प्रकरण नाही. बारणे, गौरकामथ, वदप ते ढाक येथील गावकरी मंडळींची नेहमीची वाट. बघू काय ते ? मूळ वाट सोडून फार विचार न करता आडव्या वाटेला लागलो. पुढे वाट दरीच्या कडेकडेने रानात जात ओढ्यात आली पाऊस कमी झाल्याने पाण्याला फारसा प्रवाह नव्हता. हा ओढा म्हणजेच हल्ली गर्दी होऊ लागलेला वदपच्या धबधब्याची वरची बाजू. इथून ओढ्याला डावीकडे ठेवत चढू लागलो पण पुढची वाट जरा गुगली, अगदी नाहीच मिळाली तर आल्या पावली माघारी जाऊ. थोडा प्रयत्न करून पुन्हा ओढ्यात आलो तोच एक जण लहान मुला सोबत दिसला. त्याला विचारले, ओढ्या पलीकडे झाडीतून एक वाट वळसा घेऊन वर गेलेली.  'वर गेल्यावर सपाटीवर काही घरं आहेत ते पुढचा रस्ता सांगतील' अस म्हणाला. वाह काय नशीब अगदी परफेक्ट टायमाला हा भिडू भेटला. झाडीभरली चढाई पण अगदी अंगावर येणारी, धापा टाकत मोकळ्या मैदानावर आलो. 

तुकडा तुकड्यात लावणी केलेली शेती तर समोर तीन चार झोपड्या. थोडी मोकळी जागा समोर दरी पाठीमागे झाडी भरला डोंगर काय ते लोकेशन. झोपडी समोर छोटेसे पण स्वच्छ अंगण. तिथे बसून समोरचा नजारा तो काय वर्णावा.. खाली घाटाचा पाहरेकरी भिवगड मग वदप, वेणेगाव, कर्जत आसपासची गावं दूरवर माणिकगड, कर्नाळा, इर्शाळ, प्रबळ पासून माथेरान, पेब, चंदेरी ते मलंगगड ताहूली सुध्दा स्पष्ट दिसत होते. 

हवा खुपचं स्वच्छ असल्याचा परिणाम. झोपडी जवळ जात आवाज दिला पण प्रतिसाद नाही. सुनिलने एका लहान मुलाला पाहिलं जवळ गेलो तर तो हि आत पळून गेला. पुन्हा आवाज दिल्यावर काही वेळाने तो लहान मुलगा बाहेर आला, त्याच्या मागे अडीच तीन वर्षांचा मुलगा.

 झोपडीतील मोठी माणसं रानात तर काही खाली गावात गेलेली, नऊ ते दहा वर्षाचा रोहित आपल्या लहान भावाला एकटाच सांभाळत होता. म्हातारे व लहान मुलांवर घर सोडून पोटासाठी मोठी माणसं बाहेर पडतात, डोंगर वाटेतील वस्तीवर धनगर पाड्यावर हे चित्र नवीन नाही. रोहितने पुढची वाट दाखवली. रानात शिरून नागमोडी चढ पार करत मोकळं वनात आलो, उजवीकडे दरी तर डावीकडे धारेवर गाळदेवी घाटाची वाट बरीच उंच त्यापलीकडे घाटमाथा नजरेत. 

थोडक्यात आम्हाला ही वेगळी वाट मिळाली तर. काही अंतर जातो तेच मागून ओढया जवळ भेटलेले दोघे येताना दिसले. नाव.. गोपाळ वाघमारे सोबत त्याचा लहान भाऊ संदीप. चर्चेला सुरुवात केल्यावर समजले आम्ही ज्या वाटेवर होतो त्या वाटेला ‘गाणीची वाट’ असं म्हणतात. याच वाटेवर पाण्याची टाकी आहेत हे ऐकल्यावर तर उत्सुकता आणखीनच वाढली. आस्ते कदम चढाई करत पाऊण तासात टाकी जवळ आलो. 

मोठ्या कातळाखाली बारामाही पाण्याचं एक नैसर्गिक खळगे त्याच प्रवाहावर दगड सिमेंटचा वापर करून ओळीत बांधलेली दोन टाकी. पुरातन नसून अलीकडील काळात बांधलेली पण कधी ते गोपाळला माहित नाही. इथून पुढची वाट दाट रानातून, सौम्य चढण मग सपाट चाल वळसा घालत गाळदेवी घाटाच्या वाटेला मिळाली. शेवटची पंधरा मिनिटांची चढाई संपवत माथ्यावर आलो.

         डोळ्यांना सुखावणारं सर्वत्र ग्रीन कार्पेट साध्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जिकडे पाहावे तिकडे हिरवगार गवत वाऱ्यावर डोलत होते. 

दक्षिणेला राजमाची ते नागफणी, खंडाळा परिसर सहज नजरेत. मुख्य वाटेने मधला झाडीचा टप्पा पार करून वरच्या माळावर आलो काही अंतर जाताच डाव्या हाताला गारूआई चे मंदिर. 

मागच्या काही वर्षांपूर्वी मंदिर नव्याने बांधलं आहे. समोर दगडी दिपमाळ, तुळशी वृंदावन, काही जुनी शिल्प तर आसपास पडलेल्या काही जुन्या समाधी शिळा. याच मंदिरा जवळ उजवीकडे शेतात पत्र्यांच्या खोपटात बहिरी देव. सारा परिसर एकदम प्रसन्न. मंदिरा समोर पठारावर भात शेतीची कामं जोरात सुरु होती. हाताशी वेळ होता म्हटलं आलोच आहोत तर भिवा काकांची भेट घेऊन येऊ. दोन वर्षांपूर्वी ‘कुठराई’ ‘अवसरी’ घाटाचा ट्रेक केला होता तेव्हा काकांनी ‘पालीचा धोंड’ या वाटेने खाली हुमगाव जाण्यासाठी सुचवलं होतं, तो ट्रेक खरंच अफलातून झाला होता. 

जुनी आठवण सांगितल्यावर काकांनी ओळखलं आणखी काही वाटा बद्दल नव्यानं समजल. सह्याद्री रांगेवर जोडलेला ढाक किल्ला त्याचा प्रसिध्दी पावलेला बहिरी घेऊन पूर्व पश्चिम पसरलेले हे मोठे पठार. साहाजिकच पठार जेवढे मोठे तेवढ्या वाटा अधिक. उत्तरेला पेज नदीच्या खोऱ्यात हुमगाव पोटल, दक्षिणेकडे सांडशी माणगाव सालपे तर पश्चिमेला वदप गौरकामथ भाग. कधीकाळी अनेक राबती घरं असलेलं ढाक आजमितीस उरलीत फक्त सात ते आठ घरं. ढाक झाले पेठ गाव, पदरवाडी या भागातला ‘खवा’ पूर्वी खूप प्रसिद्ध पण आता मुळातच घरांची संख्या कमी जो तो उद्योग धंद्यासाठी बाहेर पडला, शेती म्हणा पशुधन हे सारं कमी होत गेलं. भिवा काकांना आम्ही आलो त्या गाणीची वाटेबद्दल विचारले, पूर्वी पासून हेच नाव वापरात, वदप गौरकामथ कमीत कमी वेळेत जाण्यासाठी गाळदेवी घाट तर जनावरं काही मोठं अवजड समान ने आण साठी गाणीची वाट सोयीची. वाटेतील पाण्याचं टाके डोंबिवलीतील कुण्या भल्या गृहस्थाने काही वर्षांपूर्वी बांधली. गाणी हे नाव वेगळंच वाटलं, उलट मला तर गाळदेवी हे नाव गारूआई गारुदेवी यांचा अपभ्रंश होऊन तर झालं नसेल असंही वाटतं. असो.. काकांचा निरोप घेऊन मंदिरात येऊन विसावलो. मध्येच पावसाची हलकी सर येऊन गेली. 

समोर ढाक किल्लाच्या माथ्यावर विरळ हलके ढग ये जा करत होते. सोबत आणलेले जेवण करून बराच वेळ तसेच पडून राहिलो. कुसुर पठाराकडे झेपावलेली डोंगर रांग, मावळ भागातील पवन चक्की आणि समोर हाकेच्या अंतरावरील ढाक... एकदम निवांत..   

       परतीला गाळदेवी घाटाची वाट धरली. सरळसोट धारेवरून उतरणारी वाट दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये चिंचोळी वाट. अश्याच एका टप्प्यावर उतरताना जे काही दृष्य पाहिलं त्याला तोड नाही. दक्षिणेला नागफणी पासून सांक्शी, माणिक, कर्नाळा, पश्चिमेकडे इरशाळ, प्रबळ, मोरबे धरण, माथेरान ते चंदेरी, ताहुली, मलंगगड तर उत्तरेला सह्यधार त्यातून डोकावणारे तुंगी त्या पलीकडे थेट सिद्धगड पर्यंतचा अफाट पसारा. आम्ही तिघेही अनिमिष नेत्रांनी तो न्याहळत बसलो. फोटो पेक्षा तो पॅनोरमा मनातच कायमचा कोरला गेला.

        भिवगड व गाळदेवी घाटाचा ट्रेक काही वर्षांपूर्वी केला होता. त्यावेळी चढाई उतराई ही एकाच वाटेनं म्हणजे गाळदेवी घाटाने झाली होती. यावेळी तसेच ठरवलेलं पण खरंतर एका वाटेने जाऊन दुसऱ्या वाटेने येणं हा प्रकार नेहमीचा आणि जास्त आवडीचा. कदाचित त्यामुळेच हे घडून आलं असावे ? एक काहीशी आड वळणाला जाणारी वाट आम्ही धरतो काय... त्याच वाटेला पुढे जातो काय...  तोच अचानक वाट दाखवणारा भेटतो काय... पुढे वाटेवरच्या खुणाही गवसतात... वेगळ्या वाटेची फर घडते..  कसं जुळून येत हे सारं ? हि तर सह्याद्री कृपा !!

 

योगेश अहिरे

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...