Sunday, December 1, 2024

करपदरा व उंबरदरा

http://ahireyogesh.blogspot.com/2022/02/karapdara-umbardara.html


       
        कोकणकड्यावरून सुर्यास्त अनेक वेळेस पाहिला. पण या वेळेस मात्र बेलपाड्यात बसून रंगमंचासारखा पसरलेला भव्य कोकणकडा त्यावर बरसू लागलेल्या सायंकाळच्या छटा पाहणं खासा अनुभव. ओढ्याच्या काठावर लहानसे भवानी मंदिर. गावापासून काहिसं दूर, आजूबाजूला चांगली झाडी. 

मंदिर परिसर स्वच्छ प्रसन्न विशेष म्हणजे बाजूलाच पाण्याची हापशी. मुक्कमाला एकदम भारी जागा. निवांतपणे हे सारं पाहत राहिलो. माघारी फिरलो तेव्हा मावळतीला लाल गुलाबी रंगाची उधळण. 
घरी आलो फ्रेश होऊन पुन्हा फोनचं नेटवर्क शोधत गावाला चक्कर. रात्री मनोजने कोंबडीचा बेत ठरवला. एक नंबर चविष्ट रूचकर जेवण दोन घास जास्तच गेले.

 रात्री ठिक ठिकाणी पेटवलेल्या शेकोटीचं ऊब घेत गावकरी सोबत नव्या जुन्या आठवणींना उजाळा देत भरपूर गप्पा टप्पा रंगल्या. झोपायला अंमल उशीरच झाला.
    सकाळी अलार्म वाजल्यावर जाग आली खरी पण थंडीत उठायचं धाडस होईना. वाटलं जाऊ दे ती तंगडतोड मस्तपैकी देऊ ताणून. बघू काय ते नंतर. पण काही मिनिटातच तडक उठलो. सर्व काही आवरतं घेत, खाण्यापिण्याचं सोबत घेऊन सातच्या सुमारास बेलपाडा उर्फ वाल्हिवरे तून निघालो. सोबत होती अश्विनी आणि मनोज. नजर पुन्हा एकवार रोहिदास कोकणकडा सीता डोंगरावरून फिरली. काही वर्षांपूर्वी केलेला नळीच्या वाटेचा ट्रेक आठवला.
http://ahireyogesh.blogspot.com/2018/11/nalichi-vaat-rajnaal.html?m=1
या वेळी मात्र नळीच्या वाटेला न लागता. आम्ही जाणार होतो, साधडे / करपदरा व उंबरदराच्या वाटेला

 सकाळच्या गारेगार वातावरणात चालीने जोर पकडला. त्यातच कुठनं तरी मागाहून येत एक भुभू आमच्या पाठी धावत आला. किती हाककला तरी जाईना. तसे बहूतेक वेळी एखादा असा भेटतोच. तीन तिघाडा काम बिघाडा नको त्याला पण आमच्यात सामील करून घेतले. त्याला बजावून सांगितले भुभू रे चाल बरीच आहे नंतर कुईकुई करू नकोस. तरी शेपटी हलवत तो आलाच.   
        हरिश्चंद्रगड उजवीकडे ठेवून वरच्या अंगाला जाऊ लागलो. काही अंतर आडवं जात खालच्या बाजूस समोर केळेवाडीची घरं दिसू लागली. रानातल्या विहिरीवरून उजवी मारली. साग, ऐन तशीच काही आंब्याची झाडे. भुर्रकन उडत जाणारे पाकोळ्या, साद घालणारे बुलबुल तर एखादी डहाळी पकडून बसलेला कोतवाल. गड मागे पडून सामोरी आली ती न्हाप्ता, हपाट्याचा कडा व सादडे घाटाची बाजू. पुढे जात वळसा घेत सादडे घाटाची खिंड स्पष्ट नजरेत आली. सुरूवातीस लहानसा झाडीचा टप्पा मग वाट डावीकडील धारेने चढू लागली. 


वाटेत मोठ्या ओढ्यात पहिला थांबा घेतला. वेफर्स, राजगिरा लाडू आणि तिळगूळ खाऊन घेतले. भुभूला बिस्किट दिलीत तो पण खुश झाला. पध्दतशीर पणे प्रशस्त मळलेली वाट मजल दरमजल करत चढाईची मजा घेऊ लागलो. 

घाटात एका ठिकाणी पावठ्या खोदलेल्या दिसल्या. खाली मागे वळून पाहिलं तर केळेवाडी दूरवर नाणेघाट भैरवगड पासून दौंड्या पर्यंतचा भाग सहज नजरेत. तासाभरात सादडे घाटातील मुख्य बारमाही पाणी असलेले उंबराचे पाणी या ठिकाणी आलो.
 हे पाणी साधारण घाटाच्या मध्यात असेल. घाट उतरत असताना बहुतेक जणं हे पाणी पिऊन सरळ नाळेतील झाडीतून उतरू लागतात पण तसे न करता या उंबराच्या पाण्यातून लागलीच उजवीकडील आडवी वाट धरायची. अन्यथा वाट चुकलात समजा. हे सारं लिहीण्याचं कारण ही जागा लक्षात असणं. असो... आता सुरू झाली ती पहिल्या गिअरची चढाई अगदी नागमोडी वळणं. रानातला गंध असलेली शुध्द हवा फुफ्फुसात भरून घ्यायची आणि  चालू पडायचं. अर्ध्या तासात आम्ही सादडे घाट व करपदरा घाट या दोघांच्या जंक्शन वर आलो. 
उजवीकडील वाट झाडीतून वर चढत सादडे घाटाच्या नाळेच्या टप्प्यांत जाते तो पार केला कि उजवी मारून हरिश्चंद्रगड तर सरळ पलीकडील बाजूस उतरून पाचनई / पेठेची वाडी. आम्ही मात्र नियोजन नुसार करपदरा घाटाला लागलो. 
डावीकडे वळून आडवी वाट घेतली. काही ठिकाणी अगदीच किरकोळ कातळ टप्पे आणि घसारा. वाट मात्र चांगलीच मळलेली. सकाळची कोवळी किरणं खात उभा असलेला न्हाप्ता इथून भारीच दिसतो. 
आता सुरू झाली ती नाळेतील चढाई दगड धोंड्यातून जसे जमेल तसे वर जायचे. मध्येच भुभू उड्या मारत येई, तर माकड वानरांचा आवाज आला तर त्यांच्या मागावर जाई. कुठेही जरी घुसला तरी आमच्यात बरोबर येई. 
मागे मी  सादडे घाट व करपदरा केला होता त्यावेळी करपदरा घाटाच्या या अंतिम टप्प्यात एक लाकडाची मोळी आधाराला लावलेली यंदा मात्र नव्हती. पावसामुळे पडझड होऊन मोठ्ठाली दगड नाळेत इकडे तिकडे झाली. 

अशातच एका दगडाचा आधार घेऊन सहज चढून गेलो. नाळेतून बाहेर येत डावी मारली आता होती ती अगदीच लहान अशी सोंडेवरील चढाई. समोर झाडी भरला माथा सहज दृष्टिक्षेपात. 

पण सोंडेवरून मागं वळून पाहता आम्ही आलो ती नाळ, सादडे घाटाचे सरळसोट कातळकडे, त्याला लागून असलेले काही सुळके. 
न्हाप्त्याची दुकली आणि जोडीला भन्नाट वारा. माथा गाठून झाडीत शिरल्यावर अगदीच गारेगार वाटलं. जीपीएस मध्ये पाहिलं तर ऊंची २१६५ फूट. बेलपाड्यातून निघून घाटमाथा गाठायला आम्हाला रमत गमत तीन तास लागले. करपदरा हि वाट पेठेची वाडीतील मंडळी अजूनही खाली कोकणात केळेवाडी,  बेलपाडा, न्याहडी भागात जाण्यास वापरतात. पेठेची वाडीची  वाट सोडून,  कारवीच्या रानातून हपाट्याच्या कड्यावर आलो. समोर नाप्ता तर मागे कलाडगड. सोबत आणलेलं खाऊन घेत तसेच भुभूला पण खाऊ घालून, मस्त पैकी निवांत बसून राहिलो.. कड्यावरून निघावेसे वाटत नव्हते. 
पण काय करणार जावे तर लागणार दुर्गम उंबरदरा घाटाची उतराई जी करायची होती. अकराच्या सुमारास चालू पडलो. काही अंतर जाताच रूंद कच्चा रस्ता आडवा आला. हल्ली पाचनई पेठेची वाडी हून लोकं मोटरसायकल घेऊन कड्यावर येतात तसे गाडीच्या टायरचे ठसे अनेक ठिकाणी दिसले. असो..
       आता न्हाप्ता डावीकडे ठेवून वळसा घालून उंबरदार गाठायचे होते. गवताळ पठारावरून ठळक अशी वाट घेतली अर्थातच दिशा अचूक. पंधरा वीस मिनिटं चाललो तोच एक ओढा आडवा आला. 
बारीक अशी स्वच्छ पाण्याची वाहती धार. अर्ध्या रिकाम्या झालेल्या बाटल्या व पिशव्या भरून घेतल्या. जसजसे पुढे जात होतो तसा मागून हरिश्चंद्रगड उठून दिसू लागला. बालेकिल्ला, तारामती व बैल घाटाची वाट सारं नजरेत. 


 कलाडगड तर उजवीकडे हाकाच्या अंतरावर. अर्ध्या तासाच्या सपाट चाली नंतर शेती केलेली, पेंढा रचलेले खळं दिसू लागली. काही अंतर जाताच भुंकण्याचा आवाज तो ऐकत आमचा भुभू त्या दिशेने पळत गेला. झाडीतून घरांची छपरे डोकावली. मोठ्या झाडाखाली मिटींग मध्ये बिझी असलेल्या म्हशी, इकडून तिकडून बागडणारी शेळी बकरी. कूक कूक कोंबडी टिम. सात आठ उंबर्याची हि न्हाप्ताची वाडी. इथली लहान मुलं आमचा अवतार त्यात माझी दाढी पाहून रडत पळून गेली. 
औट घटकेचा थांबा घेऊन पुढे निघालो. नीट जावा, वाट धसली हाए. मोरं जात राहा, हय धोपट वाट सोडू नका. असा प्रेमळ सल्ला द्यायला विसरले नाहीत. एक मोठा ओढा अर्थातच कोरडा ओढा दगडी पूलावरून पार केला. इथे घाटावर एक गोष्ट चांगलीच म्हणावी अशी ती म्हणजे वन विभागाने घातलेले बांध. पाणी अडवा पाणी जिरवा. त्यामुळेच येथे जनावरांना मुक्त आंदण मिळतय. 
आता समोर होती ती झाडीभरली उतरती सोंड. मनोज म्हणाला या पलीकडे आपल्याला जायचं आहे. खरचं मनोजचा या भागातील भूगोल एकदम पक्का. मुळा खोर्याचं वारं खात पलीकडे आलो. आता स्पष्ट दिसू लागली ती भैरवगड घनचक्कर गवळदेव कात्राबाई कंरोदा आजोबा रेंज. 
नाप्ताच्या पल्याड बाजूस असलेल्या सोंडेला वळसा घालून वरच्या बाजूने चालू लागलो. पूर्वेस खाली दरी पल्याड पेठेची वाडी दिसली. २००८ साली जेव्हा हरिश्चंद्रगड ते रतनगड केला होता. या वाडीतून मुळा नदी पात्रातील वर कुमशेत कढे जाणारी वाट खूपच आवडली होती.. काही अंतर जाताच कारवीच्या रानातून शिरत डावी मारली. सरळ जाणारी वाट कुमशेत कडे गेली. हा काही मुख्य रूट नाही या भागात एखाद दुसरा गाय बैल शेळी बकरी चारणारा कुणी दिसला तरच अन्यथा सारा भाग निर्मनुष्य आहे. साधारणपणे दिड दोनशे फूट कारवी व झाडीतून चढाई करून उंबरदराच्या ओपनिंग ला आलो. 
अंदाजे दोन हजार फूट सरळसोट उतरणारी ती रौद्र नाळ पाहतच राहिलो. खाली दूरवर मेर्डी बांडशेत आसपासची गावं थेट नजरेत. पहिलाच वीस ते पंचवीस फूट कडा ढासळलेला, दिलीप भाईने सांगितल्यानुसार रोप सोबत घेतला होताच. झाडाला बांधून खाली फेकून अंदाज घेतला. गेल्या काही वर्षांत पडझड होऊन हि सुरूवातीची वाट ढासळली आहे अर्थातच त्यामुळे रोप असणं गरजेचं. व्यवस्थित निरीक्षण व सुरक्षित बाबी झाल्यावर. 


अश्विनी पहिल्यांदा खाली गेली. हे सारं भुभू पाहत होता अश्विनी खाली उतरल्यावर तो कड्याच्या दोन्ही बाजूला पळत जाऊन खाली उतरता येईल का बघू लागला, पण त्याला काही जमत नव्हते. विचित्र आवाज काढत पुन्हा आमच्या जवळ आला. माझं उतरून झाल्यावर, मनोजने त्याला उतरवायचा प्रयत्न केला पण तो उलट मनोजला चावू लागला. थोडावेळ ट्राय मारला पण गडी उतरेनाच. मग शेवटी मनोज उतरला. सारं आवरून उतरायला घेतलं. चार पावलं टाकतोय तोच घसारा आपली चुणूक दाखवू लागला. 
सुरूवातीच्या या अरुंद नाळेत दगडांचा खच पडलेला त्या खाली सारी भुसभुशीत मुरूमाची माती. एक पाऊल टाकलं तर सरळ घसरत खाली, काठीचा काय तो आधार पण त्यासाठी पण बरीच कसरत.
 तरी सुध्दा काही ठिकाणी पार्श्वभाग आपटलाच. कारण वाटेचा उतार अत्यंत तीव्र. बाजूच्या भिंती स्लेट सारख्या ठिसूळ दगडांचा हाच सारा तो खच. कसंतरी एक एक करून पुढे जाऊ लागलो. जोवर पुढचा सुरक्षित ठिकाणी जात नाही तोवर मागचा उतरायचा नाही कारण सोबत पडझड होऊन घरंगळत जाणारी दगडं. कपाळमोक्ष होऊन अपघाताची शक्यता जास्त. काठी, जिथे मिळेल तिथे खुरटी झुडूप व शक्य होईल तिथे कड्याचा आधार घेत अत्यंत सावकाश उतरत होतो. भुभू वरून सारी आमची कसरत पाहत होता. मनात म्हणला असेल बरं झाल या वेड्या मंडळी सोबत उतरलो नाही ते. आम्ही खालच्या टप्प्यात उतरल्यावर मग तो दिसेनासा झाला. पहिले तीन चारशे फूट उतरायला आम्हाला एक तास लागला. 
आता आली ती मोठी पण काहीशी हालेडूले दगडाची वाट, पण दगडापेक्षा विट मऊ अशीच आमची स्थिती. अस्तेकदम तोल सांभाळत उतरत व्यवस्थित ठिकाणी ब्रेक घेतला. फळं खजूर बिस्किट खाऊन एनर्जी आली. पुन्हा उतराई, आता मात्र मोठी टिपिकल नाळेतील दगडधोंडे. काही अंतर जात मोठा फाॅल जो चाळीस पन्नास फूट सहज असेल. उजवीकडे उभा कडा त्यामुळे डावीकडे काहिसं वर जात झाडीतून घुसखोरी केली. काही पावलातच अस्पष्ट पण वाट मिळाली. वाटेत काही ठिकाणी कधीकाळी कारवी कापल्याच्या खुणा. पंधरा ते वीस मिनिटात परत नाळेत आलो. 
नाळेत एक मात्र पाहिलं ते म्हणजे उंबराची लहान मोठी झाडे भरपूर प्रमाणात त्यात जवळच बहुतेक ठिकाणी पाण्याची बारीक वाहती धार. मनोज तर बोलून गेला उंबराची झाडं म्हणून उंबरदरा तर करपाची झाडे तो झाला करपदरा आणि सादड्याची झाडं मग तो सादडे घाट. बरंच खाली आल्यावर डावीकडे अगदीच स्पष्ट मळलेली वाट,  विरळ रानातून उतराई करत मोकळ मोकळवनात सपाटीवर आलो. मागे वळून पाहता भव्य असा उंबरदरा.. 
अडीच हजार फूट उंचीचा हा घाट उतरून इथवर यायला फार पळापळ न करता आम्हाला चार तास लागले. आता पुढचा पल्ला मोढळवाडी मग खिंड पार करून केळेवाडी मार्गे बेलपाडा / वाल्हिवरे. अंदाजे पाच ते सहा किमी चाल अजून बाकी होती. 
आधीच विरळ असलेल्या रानात चक्क मशीन लावून झाड कापणी सुरू होती. काळू नदीच्या खोर्यातील या भागातही आता प्लाॅटिंग सुरू झालंय. असो..  न्हाप्ता ला वळसा घालत त्याची वेगळ्या कोनाड्यातून रूपं पाहत जात होतो. 

भरपूर वेळ चाललो तरी मोढळवाडी काही दिसेना. वाटेत रानात एक दोघे भेटले, बोलणं झालं. हि मंडळी उंबरदरा ने सद्य स्थितीत ये जा करतात. शेवटच्या टप्प्यात त्यांचा चांगली वाट करायचा विचार आहे जेणे करुन रोप न घेता सुरक्षित चढता उतरता येईल. खरच गावकरींचा हा नेहमीचा मार्ग तो चांगलाच सोयीचा हवा. उनं उतरून सावल्या लांबून पायात गोळे येऊ लागले.
 पुढे मोकळवनात एके ठिकाणी उलगडला तो पाथरा घाटापासून ते न्हाप्ता पर्यंतचा पॅनोरमा. काळ्या बसाल्टचा तो पत्थर सांज सोनेरी किरणात न्हाऊन निघाला. मनसोक्त फोटो काढले तरी मन भरेना. पण वेळ पाहून मार्गस्थ होणं महत्वाचं होतं. काही मिनिटातच गाई गुरांचे शेणाचे पो व शेती दिसू लागली चला आता गाव जवळ आले तर. गावात जाऊन वाटेला लागलो तर फेरा पडून अंतर वाढेल म्हणून मनोजने एका शेतातून डावी मारली. 
पुढे जात उजवीकडे मोढळवाडीतील घरे दिसली. दुरूनच राम राम करून समोरील खिंडीची दिशा धरली. 
 पाच सहाशे फुटाची झाडीभरली खिंड ओलांडून पलीकडे उतरलो. वाटेतला ओढा पार करून वर चढून रानात त्यापुढे मोकळवनात आलो. आता समोर होती ते सिंदोळा, गुण्या, उधळ्या, भोजगिरी, देवदौंड्या ते थेट भैरवगड नाणेघाट जीवधन पर्यंतची रांग. 
ते पाहतच केळेवाडी गाठली. एव्हाना सुर्यास्त होऊन गेला होता. आकाशातील लाली मग शांत गुढ संधीप्रकाश सारं शांत निवांत अनुभवत अत्यंत समाधानी मनाने बेलपाड्यात ट्रेक यशस्वी करून परतलो. 
जीपीएस चेक केलं तर जवळपास बारा तासात वीस किमीची चाल. परत निघताना राहून राहून त्या भुभूची आठवण येत होती, घाटावर राहणार की तो खाली परतणार. कुठेतरी वाटत होतं की तो नक्की खाली येणार.. दोन दिवसानंतर दुपारी मनोजचा फोन आला, "सर तो कुत्रा आला बरं का खाली गावात परत" ....खरंच मुक्या प्राण्याचे पण दिशाज्ञान कमालीचे असते यात शंकाच नाही. 

विशेष आभार.. दिलीप वाटवे, अजय शेडगे व मनोज खाकर 


                                              योगेश चंद्रकांत आहिरे

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...