Sunday, December 1, 2024

चोरपायरी आणि सातपायरी..

http://ahireyogesh.blogspot.com/2024/01/chorpayari-satpayari-ghat.html
        ऐन समयासी हेमंत पावला व आम्ही ताम्हिणी कडे कूच केले. भल्या पहाटे स्टार्टर मारून पाली विळे मार्गे ताम्हिणी घाट चढून हाॅटेल शैलेश पाशी गाडी लावली.
 आदरवाडीतील मामा सोबतीला होते. यंदा घाटवारी ठरवली होती. ती ताम्हिणी घाट परगण्यातील, चोरपायरी व सातपायरी या जुन्या वापरातील घाटवाटांची. 
      आता ही सातपायरी चोरपायरी घाट वाटांनी नावं. नियमित हाडाच्या ट्रेकर्स ला माहित आहेत पण नवखे मंडळी तसे या वाटांबद्दल अनभिज्ञ. प्रत्येक भागात घाट वाटेला वेगवेगळी नाम विशेषणं पुर्वापार पडली आहेत.
डांग खान्देश बागलाण भागात बारी असे म्हणतात. मोरबारी भितबारी कांचनबारी वाघबारी तर अलंग मदन कुलंग थोडक्यात इगतपुरी च्या दक्षिणेकडील घाटघर कुमशेत भागात गुयरीदार ऊंबरदार तर माळशेज आहुपे भिमाशंकर भागात नांगरदार भोरांडेदार खुट्टेदार शिदोबा दार भैरवनाथ दार तर शिवथर रायगड घेर्यात बोराट्याची नाळ सिंगापूर ची नाळ तसेच गायनाळ आग्यानाळ गोपेनाळ सुपेनाळ पुढे जावळी कादांट खोर्‍यात रानकडसरी अंगठेसरी तेलसरी आणखी दक्षिणेस रत्नागिरी कोल्हापूर परिसरात जावळी पाज तिवरे पाज गोठणेपाज वर्हाडाची पाज फोण्याची पाज. सध्या जेवढी विविध नावं आठवली तितके लिहले, सांगायचे तात्पर्य हे, जरी सह्याद्री अखंड असला तरी प्रांतीय विभागानुसार वेगवेगळ्या नावाने या घाटवाटा, नाळा व खिंडी ओळखल्या जातात. अनेकदा एकाच वाटेला घाटावरची मंडळी व कोकणातली मंडळी वेगवेगळ्या नावाने संबोधतात... असो..पुरे झाले नामपुराण! 
         मामांसोबत चर्चा करून आम्ही उतराई चोरपायरी घाटाने तर चढाई सातपायरी घाटाने असे ठरवले. आदरवाडीतील घरं व शेतं मागे टाकत उत्तरेला निघालो. सकाळी हवेत कमालीचा गारवा त्यामुळे पावलं झटपट उचलली जात होती. 
उजव्या हाताला आदरवाडी समोरचा विंझाई डोंगर, पल्याड दिपदरी तर समोर ईशान्येस हौदाचा डोंगर. समोरील दरी पल्याड सवत्या घाटाची वाट तर समोर भिरा जलविद्युत प्रकल्प वाला लेंड घाट त्याच्या मोठ्ठाल्या  पाईपलाईन थेट दरीत उतरत होत्या. 
बराच वेळ हे सारं पाहत राहिलो. मोठी आंब्याची झाडं व घाटमाथ्या लगतची करवंदाची जाळी पार करत अर्ध्या तासातच एका बंगालच्या गेट मधून वाट पश्चिमेला उतरू लागली. दिड दोनशे फूट उतरून मोकळवनात आली. आता उलगडला तो पश्चिमेकडील कोकण प्रांत ते मावळातील हिरडी तेथील खजिन्याचा डोंगर वर म्हतोबा डोंगर पर्यतचा नजारा. खाली पाहिलं तर मुख्य रांगेला चिकटून एक मध्यम डोंगर त्याला ही गावातली मंडळी डूंगी म्हणतात. त्याच डूंगीला उजवी कडे ठेवत सरळ रेषेत कोकणातील पाटणूस. 
      थोडाफार सुका खाऊ तोंडात टाकून पुढे निघालो. खालच्या टप्प्यात कातळातून आडवं जात समोर आला तो मानवनिर्मित पावठ्या व नैसर्गिक खोबण असलेला सरळसोट कडा. 
अंदाजे पंधरा ते वीस फुटाचा तो राॅकपॅच सावकाश उतरलो. 
पिवळ्या गवतातून काही ठिकाणी पाय घसरायची भिती, कारण सकाळंच पडलेले दव त्यामुळे गवत काहिसे ओलसर. 
कातळटप्पा संपवत वाट तीव्र उतरणीला लागली, थोडीफार स्क्री पण जोडीला कारवीचा आधार. 
तसेच उतरत डूंगीच्या खिंडीत आलो. डावीकडे समांतर जात बांबूच्या वनातून, टप्प्या टप्प्याची उतराई थेट मोठ्या ओढ्यात घेऊन आली. 
ओढ्याला उजवं डावं करत वाट शोधत शोधत पुढे सरकायचे. 
उतार संपवत एका माळरानावर आलो. मळलेली वाट पाटणूस च्या दिशेने गेलेली तर डावीकडील काहीशी अस्पष्ट अशी जंगलातून आडवी जात चढ उतार, दोन तीन डोंगर घळी व दरी पार करत सातपायरीच्या दिशेला. निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात आली ते या चोरपायरी भागात पाण्याची वाणवा होती. आम्हा दोघांकडे माणशी तीन लीटर हून अधिक पाणी होते पण वाट शोधत वेळेचे गणित जमवत डावीकडच्या वाटेने जाणे मला योग्य वाटेना. दुसरे एक ठळक कारण आम्ही होतो ते पाटणूस जवळ तर सातपायरी घाटाची सुरूवात कोकणातून विळे पासून पाटणूस ते विळे हे अंतर सात ते आठ किमी रस्ता तर रानातून नाही म्हटले तरी पाचएक किमी सहज असणार. त्यात वाट मळलेली नाही चुकामूक झाली तर वेळ व श्रम दोन्ही वाढतात. मुख्य म्हणजे ताम्हिणी भागात गाडी रस्ते झाल्यापासून या वाटांचा वापर फारच कमी झालाय. सारासार विचार करून मी पाटणूस जायचे ठरवले. 
 माळरानावरून उजवीकडे चालू लागलो आता डूंगीचा डोंगर ऊंच वाटू लागला त्यामागे सह्याद्रीची मुख्य रांग. कुठून कशी उतराई केली ते सारं नजरेत. 
या खालच्या रानात सागवानी झाडं मात्र भरपूर त्या पानांची कुरकुर खास लक्षात येणारी. पंधरा मिनिटात आदिवासी वस्तीवर आलो. 
पुढे वीस मिनिटात पाटणूस गाठले. ताम्हिणी आदरवाडी भागातून आम्ही आलो तो चोरपायरी तसेच सवत्या व लेंड घाटाने पाटणूस भागात येता येते. मागच्या दशकापासून देवकुंड धबधब्यासाठी पाटणूस भिरा भागात भयंकर गर्दी वाढलीय. गेल्या ग्रीष्म ऋतुत सावळ घाट उतरलो होतो तेव्हा येताना देवकुंड ला वाट वाकडी केलेली. सध्याचे देवकुंड व कधीकाळी अनेक वर्षांपूर्वी प्रसिध्दी न पावलेले देवकुंड यातील फरक अती मानवी हस्तक्षेप मधून सहज जाणवला. असो... पाटणूस ला पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या, थोडावेळ आराम. विळे साठी पिकअप मध्ये लिफ्ट मिळाली. 
भर उन्हात डांबरी रोडची कंटाळवाणी चाल वाचली. दुपारी दिड च्या सुमारास विळे ला आलो. अलीकडे दहा पंधरा मिनिटांवर विळे आदिवासी वस्ती लागते तिथून सरळ सह्याद्रीचा पहाड जवळ करू लागलो. 
आमचे बहुतेक ट्रेक सकाळी चढाई तर दुपारनंतर उतराई असेच असतात. पण आज मात्र विरूद्ध स्थिती होती. ऐन उन्हात ती माळरानवरची चाल मग पुढे मुख्य चढाई, आत्ताच घामाच्या धारा वाहू लागल्या. 
वाटेतले दोन ओढे पार करत डावीकडे वळालो. पुढे आणखी जाताच, भला मोठा ओढा आडवा आला. या ओढ्यात मात्र कमी का असेना पण वाहतं पाणी होतं. 
लहानसे टेपाड चढून वरच्या बाजूला आलो. आता ओढ्याला उजवीकडे ठेवून चाल. जसे आत जाऊ लागलो तसा झाडोरा व सावली मिळू लागली. ओढ्याच्या रूंद पात्रात मोठ्या दगडी धोंड्याना शेंदूर फासलेला. 
वरती व खाली दोन्ही बाजूला वाहत्या पाण्याचे डोह. वरच्या मुख्य डोहात पाण्याची बारीक धार तिथली शांतता छेदत होती. या भागातील स्थानिक आदिवासी ठाकरांचा हा देव. हळद कुंकू अगरबत्ती नारळाच्या करवंट्या पाहून कुणी कधी पुजा केली असावी. निमुळता होत घेलेल्या डोहाच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या प्रवाहाने कातळ कापून काढलेला. 
पावसाळ्यात हे नक्कीच मनोहरी असणार यात शंकाच नाही. त्याच भिंतीच्या सावलीत स्वच्छ डोहाजवळ जेवायला थांबलो. 
जेवण अर्थातच घरून आणलेले. भरपेट जेवण करून अर्धातास मस्त ताणून दिली. भर उन्हात अशी रानातील पाणवठ्याची जागा, हवेतील शितल गारवा, अधूनमधून आवाजाने स्वतःची चुणूक दाखवणारा तांबट.. निघायला जीवावर आलं होते. 
ट्रेक पूर्ण करायचा हेच मनाला बजावून निघालो. ओढ्याला डावीकडे ठेवत जाणारी पहिलीच चढाई जीवावर आली. काही अंतर जाताच बर्‍याच आतमध्ये दोघं धुणी भांडी करताना दिसले. आम्हाला ही अशावेळेस अचानक पाहून तेही स्तब्ध झाले. रामराम शामशाम झाल्यावर समजले या इथवर भर रानात धनगरांची दोन घरं आहेत तिथले हे रहिवाशी. ढोरवाटा चुकवत दिशेनुसार मळलेली वाट घेतली दोन टप्प्यांत वाट चढून एका मोठ्या धबधब्या समोर आली. 
अजूनही बारीक वाहती धार. थोडक्यात या भागातील लहान मोठे धबधबे मिळून हाच मोठा मुख्य ओढा ज्यात फेब्रुवारीपर्यंत पाणी असते. त्यामुळेच सातपायरी हा ट्रेक पावसाळ्यात जसा प्रसिद्ध होतोय त्याच प्रमाणे हा भर उन्हाळ्यात देखील रानमेवा खात करता येण्यासारखा. मोठ्या धबधब्याला उजवीकडे ठेवून चढाई सुरू केली. मुरूमाचा घसारा संपून दगड धोंड्याची वाट. या भागातील जंगल चांगलेच दाट. 
वाटेत काही झाडांच्या फांद्यांवर लाल पिवळ्या केशरी रिबीन बांधलेल्या पावसाळी हौशे नवशे गवशे ताम्हिणीतून इथवर हा धबधबा पहायला येतात. वीस एक मिनिटात वरच्या पदरात दाखल झालो. मागे वळून पाहिलं तर कातळ कापत जाणारा भला मोठा ओढा, त्याचे ठिकठिकाणी जमा झालेले पाण्याचे डोह उन्हात चमकत होते. आम्ही सुरूवात केली तो पाडा तर बराच दूर मागे पडला. साधारण निम्म्याहून अधिक चढाई संपली होती. समोर एक घळ तिरक्या रेषेत खाली उतरली होती. मामा म्हणाले, तिथूनच आपल्याला वर जायचे आहे. 
पदरात पिवळ्याधम्मक गवतातून जाताना भारीच वाटत होते. समोरच्या ओढ्यात काही steps वा पायरा वाटाव्या अशीच नैसर्गिक रचना. आपण माकडनाळ व नळीच्या वाटेला जाताना जशी जायंट स्टेप पहातो अगदी तसाच प्रकार पाण्यामुळे तयार झालेला. या अशा पायरी रचनेमुळे तर याला सातपायरी म्हणत असतील काय ? असेच वाटून गेले. एकेक भल्या मोठ्या पायर्या चढून त्या तिरक्या घळीत आलो. समोर पूर्ण दगडांची रास व ती झाडीभरलेली घळ. पावसात इथे धोधो पाणी असणार मग वाट कशी ? डाव्या हाताला उंबराजवळून वाट दिसली मुख्य धारेपासून अंतर राखत वाट अगदी परफेक्ट वर जाऊ लागली. घाटवाटेतील हा आदर्श टप्पा म्हणता येईल. फर्स्ट गिअर ची चढाई दम काढणारी निघाली. घळीतून बाहेर येत वाट पुन्हा डावीकडे टेपाडावर चढू लागली. कधी आडवं तर कधी तिरकं तर कधी उभ्या रेषेत ती चढाई संपवून सपाटीवर आलो. इथं बरीच मोठाली दगड पसरलेली. कुण्या मुळशी पुण्यातील धनवान माणसाने प्लाॅट पाडून ते विकायला सोयीचं व्हावं म्हणून JCB आणला होता पण तो याच जागेवर अनेक महिने बंद पडला खुप प्रयत्न करून ही सुरू झाला नाही. अशी माहिती मामांनी पुरवली. इतर महत्वाच्या भागांसारखाच इथलाही सह्याद्री विकला गेलाय..असो. JCB रस्ता फारच मोठा वळसा घालून जात होता तो चुकवण्यासाठी मामांनी झाडीतून शाॅर्टकट काढला पण त्याची चढाई पण बरीच निघाली. पुढे माथ्याच्या अगदी समीप मामांनी बारमाही पाण्याचा झरा दाखवला. मनसोक्त गारेगार पाणी पिऊन हात तोंड धुवून जरा बरे वाटले. 
अल्प घटकेचा तो थांबा आवडून गेला. पुन्हा शेवटचा चढ संपवत एकदाचे माथ्यावर आलो. आता सरळ दक्षिण दिशा धरून JCB रस्त्याने चाल. माथ्यावरील शांत परिसर, डावीकडे पश्चिमेस कोकण प्रांत आम्ही आलो ती वाट. 
सोबत आकाशात सुरू झाला तो मावळतीच्या रंगांचा खेळ. फोटो काढत त्याही पेक्षा मनाच्या चक्षूत ते साठवत आम्ही चालत होतो. 
बराच वेळ चालल्यावर कुत्र्यांच्या भुंकण्याने गाव जवळपास आल्याची जाणीव झाली. आणखी एक मोठा चढ चढून शेतं लागली ती पार करून एकदाचे आदरवाडीत ट्रेक पूर्ण करून दाखल झालो. संधीप्रकाश दाटला होता. समोर विंझाई चा डोंगर त्यात भलताच गूढ वाटत होता. हापशी वर फ्रेश होऊन, मामांनी दिलेल्या कोरा चहाने चांगलीच तरतरी आली. पुढच्या मोहिमेचे मनसुबे ठरवत मामांचा निरोप घेऊन निघालो.. घाट उतरल्यावर चांदण्या रातीत नजर पुन्हा पुन्हा सह्याद्रीकडे जात होती. लेंड घाटाची पाईपलाईन, त्यावरील दिवे आम्हाला खुणावत होते हे सांगायची गरज नाही.. 

कृतज्ञता : दिलीप वाटवे, प्रिती पटेल

                                         योगेश चंद्रकांत आहिरे 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...